पोहण्याच्या गोष्टी!
गावाकडं पोहायला शिकणं म्हणजे टास्क असतो. एक तर त्यासाठी विहीर पाहिजे, म्हणजे तुमचं शेत असायला पाहिजे. दुस-यांच्या विहिरी धुंडाळत फिरणं म्हणजे शिव्या खाण्याचा कार्यक्रम असतो. सहजासहजी कुणी त्यांच्या विहिरीत आपल्याला उतरू देत नाही. मालकापैकी कुणी असेल तरच. नसेल तर मग शिव्या सहन करून, शेतमालक जागेवर नाही पाहून विहिरीत उतरावं लागतं. एकदोन मोसम गेल्यावर मग कुठं तुम्ही पारंगत होता. मग तासंतास पाण्यावर नुसतंच पडून राहण्याची कला तुम्हाला आत्मसात होते.
आमच्याकडे नदीकाठाची जी शेतं होती, तिथल्या विहिरींना ब-यापैकी पाणी असे. त्यातल्या काही मोठ्या रुंद होत्या.
अगदीच सुरुवातीला आमच्या चुलतकाकांच्या शेतात आम्ही पोरं जायचो. ते गावाशेजारीच होतं. अगदी घराजवळून त्यांच्या शेतातलं दिसायचं. त्यांच्या विहिरीशेजारी मोठी सिमेंट टाकी बांधलेली होती. पाचेक फूट उंचीची असणार ती. आम्ही साडेचार वगैरे. त्यात उभ्यानं पोहता यायचं. टाचा वर केल्या की पायही टेकायचे. दम लागला की काठाला धरायचं. विहिरीतून पाईपने टाकीत पाणी पडायचं आणि तिथून खाली दांडातून वाहत पिकाला जायचं. आमचं दोनचार जणांचं टोळकं होतं. मोटर सुरु झाल्याचं दिसलं की, आम्ही तिकडं पळायचो. चुलत्यांना कळालं की ते काठी घेवून तिकडे येत. ते शेताकडे येताना दिसताच आम्ही धूम ठोकायचो.
थोडं मोठं झाल्यावर मग विहिरीत सुरू केलं. एक रुंद विहीर होती. बहुतेकजण तिथंच यायचे पोहायला. मित्राचा मोठा भाऊ होता. ते सगळे विहिरीत, मी काठावर. तो म्हणाला, तुला खरंच पोहायला शिकायचं असेल तर आताच्या आता थेट उडी मार खाली. उडी मारली की खाली जाशील, मग श्वास न घेता पाण्याला खाली दाब, पक्षी पंख हलवतात तसे हात हलव मग वर येशील. मी आहेच खाली. केली डेरिंग, मारली मग उडी. मारले हात, आलो वर. पण मग पुढे? तर त्याने धरलं आणि म्हणाला, कंगण्याला धरून जरा दम घे, पुन्हा इकडे ये. हळूहळू शिकशील तरंगायला. मी तिथल्या मोटरच्या पाईपलाच धरून उभा राहिलो तर शेजारी साप, हिरवा. तंतरलीच. पण गेला निघून.
नंतर मग गावातल्या बहुतांशी विहिरी पालथ्या घातल्या. ओळखीतली एकही विहीर नाही की ज्यात उतरलो नाही. विहिरीत पोहणं म्हणजे बहुतांशी उभ्यानेच. हातं मारून विहार करायला स्वीमींग पूलसारखी तिथे जागा नसते. आता विहिरींना तेवढं पाणी नाही. उतरण्यासारख्या त्याही राहिल्या नाहीत. बNयाच धसल्यात. गावातले शाळकरी पोरंही फार विहिरीत उतरताना दिसत नाहीत.
...
विहिरीत पोहायला शिकलेले आणि स्विमिंग पूलमध्ये पोहायला शिकलेले यांच्यात, गेअरची गाडी आणि बिनागेअरची गाडी चालवण्या-यांइतका फरक असतो. विहिरीत उतरायला सोयी नसतात. उडी जरी मारली तरी चढताना कंगण्यावरनं कसरत करावी लागते. विहीर पोहण्यासाठी बांधलेली नसते. तुलनेत स्विमींग पूल सोयीने पूर्ण असतो.
स्विमिंग पूलमध्ये कुणी मुटका मारताना दिसला की, समजायचं तो विहिरीत शिकलाय पोहायला!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा