रचनेतील बाधा!

आपल्याला आवडणारा विषय, आवडणारा लेखक आणि त्यात पुस्तकाची साईज ऑड म्हणून आपण पुस्तक त्वरित घेतो. अशी पुस्तके पहिल्यांदा फार भारी वाटतात. कपाटाच्या रचनेतही त्यामुळे बदल जाणवतो. दिसायलाही मस्त दिसतं. तीच ती उभी रांग कंटाळून गेलेली असते. ती रांग जरा कमी करून समोरच्या बाजूला ऑड साईजची पुस्तके आडवी ठेवली की जरा बरं आणि वेगळं वाटायला लागतं. हुरूप येतो.

इथपर्यंत ठिक असतं; पण जसजशी ऑड साईजच्या पुस्तकांची संख्या वाढू लागते तसंतसं रुटीन साईजचं महत्त्व अधिक जाणवायला लागतं. कारण ही ऑड साईज एक नसते. ऑड ऑड करत त्याची उतरंड बनते. एखाद्या दुस-या कप्प्यात ते असेल तर ठिकै, सगळीकडेच उतरंडीचं थैमान माजलं की, त्यावरची धूळ झटकणे हा एक वेगळा ताप होवून बसतो. बरं ती विषयापेक्षा आकारानुसार ठेवावी लागल्याने तोही एक वैताग असतोच.

माणसं असो किंवा पुस्तकं, त्यांच्यात ऑडची संख्या मर्यादितच असावी नसता त्यातली गंमतच निघून जाते आणि फुकटची किटकिट मागे लागते.

अर्थात ग्रंथालये किंवा भरपूर कपाटं असणारांची गोष्ट वेगळी!

.....

एका ग्रंथालयाला नवीन पुस्तकं घ्यायची होती. संस्थाचालकाच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली तर तो म्हणाला म्हणे, एवढे कपाटं भरून पुस्तकैत आपल्याकडं, दरवर्षी घेतोच पुन्हा. आधी ते सगळे वाचून संपले असतील तर नवे घ्या.

संस्थाचालकाचं ते वाक्य ऐकलं तेव्हा मी फार हसलो होतो. खरं खोटं काहीही असो, पण ते पक्कं डोक्यात बसलं. घरातल्या पुस्तकांकडे पाहिल्यावर ते मला प्रकर्षाने आठवतं. आपण खरंच जेवढी घेतली आहेत तेवढी वाचलीयेत का? त्यातली बरीच न वाचता आपण पुन्हा दुसरीकडून वेगळीच पुस्तके आणतो वाचायला. दुसरा प्रश्न पडतो की, आणलेली सगळी वाचावीतच असं कुठं असतंय. उदा. आपण कोश वगैरे तत्सम संदर्भ ग्रंथ आणून ठेवलेत. ते कुठं इथून तिथून वाचत असतात काय? कुणी विचारलं, काय वाचन चाललंय तर आपण म्हणणार काय, ‘विश्वकोशाचे पाच खंड वाचून झालेत, सहावा वाचतोय.’

बरं वाचलेली सारी पुस्तके आठवतातच असं नाही होत. काही विसरल्यागत होतात, मग ती पुन्हा वाचायची काय? बरं वाचून झालेली पुस्तके घरात किती दिवस तशीच ठेवायची? मागे एकजण म्हणाला, मी नवीन एक पुस्तक घेतलं की, आधीच्या संग्रहातलं एक काढून टाकतो. कारण त्यांच्यासाठी दोनच कपाटं आहेत. त्याशिवाय आता जागा उरलेली नाही. म्हणून एकाला जागा दिली की, दुस-याला काढावंच लागतं. काही अंशी पटलंही मला ते. मागे एकदा एकाने दान केलेल्या दुर्मीळ पुस्तकांची अवस्था पाहिल्यावर भरून आलं होतं.

.....

आपल्याकडे दहापाच जगज्जेती पुस्तकैत. ती बहुसंख्येने वाचली गेलीयेत, त्याच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघाल्याहेत. अगदी ज्यांनी फार पूर्वीच वाचणं सोडून दिलंय, त्यांनीही ती वाचलीयेत. वर्षोनुवर्ष या पुस्तकांचा संदर्भ कुणाच्या ना कुणाच्या तोंडून येत असतो. त्यातलं एकही पुस्तकं आपण वाचलेलं नसतं. आता ते झेपणारं नसतं. ती एक बाजू कधीकधी वेदना देते. दुसरीकडे प्रचंड वाचन असणारी मंडळी आहेत, ते काही संदर्भ देतात तेव्हा त्यातली काही पुस्तकं आणि नावं अशी असतात की, ते कधी आपल्या कानावरही आलेलं नसतं. च्यायला, मग आपण वाचलं तरी काय आजपर्यंत असा प्रश्न पडतो. 

(फोटो: धूळ झटकून पुन्हा लावेपर्यंत, जरा मोकळा श्वास घेण्यासाठी निरनिराळ्या ठेप्यावर वस्तीला असलेली मंडळी. ऐकणा-याला, त्यांच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो)

टिप्पण्या