शकून-अपशकून!

सकाळी सकाळी गणपतीसाठी फुलं काढायला गेलो तर जास्वंदाखाली घूस मरून पडलेली. आकारानं डुकराच्या पिलाएवढी. बघून दचकलोच. वाड्यात या मंडळींनी बराच उच्छाद घातलाय, पोखरून नुकसान करून ठेवलंय, त्यामुळे तिच्यावर राग होता, असतोच; पण तरी कुणाचाही मृत्यू अंगावर येतोच. एरवी कुणाच्या नजरेलाही पडू नये म्हणून दक्ष असणारी घूस अशी पडलेली बघून मग कसंतरीच झालं. नेमकं गणपतीच्या काळात, तेही जास्वंदाखाली ती दिसावी यामुळे अस्वस्थही व्हायला झालं. अपशकून वगैरे मनात येत राहिलं.

घरात जिथे गणपती बसवलाय अगदी त्याच्या नेमकं मागे जास्वंदाचं झाडै. फक्त मध्ये एक भिंत आहे, म्हणून झाड वाड्यात आणि गणपती हॉलमध्ये अशी विभागणी झाली आहे.

पुढे आरती होईपर्यंतही घूस डोक्यात होती. दुपार झाल्यावर मग घेतलं कुदळ आणि फावडं. आणलं उचलून तिला सन्मानाने आणि दिली समाधी परसातल्या लिंबाच्या झाडाखाली. तिचा देह लिंबाला अधिकची शक्ती देईल. कदाचित तिचा मृत्यू होणं आणि लिंबाला पोषक खाद्य मिळणं यामागे सृष्टीचं काही गणित असेल. ते काहीही असो, आता झाड आणखी बहरू लागेल, डुलू लागेल. झाडाची फुलं घुशीच्या उपकाराची गाणी गातील, त्याचा दरवळ दूरवर पसरेल. रसाळ लिंबे तिच्या योगदानाची आठवण करून देतील.

आपल्याला वाटत असलेला अपशकून दुस-या कुणासाठी शुभशकूनही असू शकतो!

टिप्पण्या