देवपुत्राशी संवाद!

फेसबुक ही अफलातून गोष्टै. अशक्यप्राय किंवा कधी विचारही न केलेली गोष्ट इथे घडू शकते. ज्याचं कधी मोलही केलं जावू शकत नाही. घडून गेलेल्या या गोष्टीने आपण आतून प्रचंड खुश असतो आणि अस्वस्थही. स्वप्नातलं वगैरे वाटावं असं काही तरी प्रचंड असतं हे.

दोन वर्षांपूर्वी डॉक्टरदिनी मी एक पोस्ट लिहिली होती, ‘देवघरातले डॉक्टर’ म्हणून, डॉ. व्यंकटराव डावळे यांच्याविषयीची. पन्नासेक वर्षांपूर्वी त्यांनी आईला मृत्यूच्या दाढेतून अक्षरश: खेचून आणलं होतं आणि पुढची पस्तीस वर्ष तरी काही होणार नाही म्हणून धीर दिला होता.तिला नोकरी सोडायला लावू नका म्हणून वडिलांना बजावलं होतं. तेव्हापासून आमच्या घरात कायम त्यांचे नाव असायचे. आम्हा भावंडांपैकी कुणीही त्यांना पाहिलेले नाही. त्यांच्याबद्दल इतर काहीही माहिती आमच्याकडे नाही. त्यांचा फोटोही पाहिलेला नाही; पण उपचारापलिकडे आई आणि डॉक्टरांत त्याकाळी जो काही संवाद झाला, तो आई सांगायची आणि आमच्यासमोर डॉक्टर देव म्हणून उभे राहायचे. तो जिव्हाळ्याचा, आपुलकीचा संवाद आम्हाला जसाच्या तसा पाठ होता. ते होते म्हणूनच आम्हाला आईचं सुख मिळालं हे मग आमच्यावर ठसत गेलं.

....तर ही पोस्ट वर्षभरानंतर डॉ. डावळे यांचे पुत्र डॉ. अरुण डावळे यांच्यापर्यत गेली आणि त्यांच्याशी संपर्क झाला. डॉ. व्यंकटराव डावळेंच्या परिवारात कुणाशी आपलं बोलणं होईल हे कधी स्वप्नातही वाटलेलं नव्हतं किंवा त्यांच्या परिवाराविषयी कधी काही विचारही केलेला नव्हता. त्यांच्याशी बोलायचं म्हणजे मलाही धाकधूक होतीच; पण डॉक्टर बोलायला दिलखुलास. पहिल्याच फोनमध्ये त्यांच्याशी छान संवाद जुळून आला. बोलणं झाल्यावर ते म्हणाले, तुमच्या लेखात एक वाक्य आहे, ‘.... आणि मला आईत डॉ. डावळे दिसतात...’ मला तुमच्या आईशी बोलायचंय.

आईला आताशा वयोमानाने ऐकू कमी येतेय. त्यातही तिचं फोनशी कधी जमलं नाही. त्यापासून ती कायम चार हात दूरच असते. अलिकडे ती बोलतेही कमी. ऐंशी कधीच उलटून गेलीये तिची. कोरोनाकाळातल्या एक छोट्या अपघातापासून ती जरा जास्त थकलीये, खचलीये. आपल्याकडून आता काही होत नाही आणि यापुढे गावाकडे स्वतंत्र राहता येणार नाही म्हणून ती अस्वस्थै. परिणामी तिचं बोलणं कमी झालंय. ती डॉ. अरुण डावळेंशी बोलेल काय, त्यांचं तिला ऐकू येईल काय हे प्रश्न होतेच. तिला त्यांच्याशी बोलल्याचं सांगितल्यावर तिने आश्चर्याने पाहिलं. पहिल्यांदा तर तिला ते खरंही वाटेना. तिने इथेच राहावं म्हणून आम्ही काही बनाव करतोय काय असंही काहीसं तिच्या मनात असावं.

डॉ. डावळेंशी बोलून महिना लोटून गेला होता. दरम्यान ती अधिकच अबोल झाली होती. काल काही निमित्ताने सगळी भावंडं जमली होती, तोच योग साधून हा संवाद घडवून आणलाच. स्पीकर ऑन करून आम्ही तिच्यासमोर फोन धरला आणि दिला. डॉक्टर व्यंकटराव डावळे यांच्या मुलाचा फोन आहे म्हणताच तिचे डोळे वाहू लागले. तिला बोलणे सुधरेना, कंठ दाटून आला. डॉक्टर अरुण डावळेंचा आवाज मृदूमुलायम, आस्थेनं चौकशी करणारा आणि कित्येक वर्षांची ओळख असल्यागत भासणारा. कदाचित डॉ. व्यंकटराव डावळेंच्या आवाजाचा भास तिला या आवाजात जाणवला असावा. पन्नास वर्ष उलटून गेली, तेव्हाचा तो आवाज स्मरणात राहत असेल काय? माहीत नाही. आतून जाणवत तर असणार काही.

पहिला कढ ओसरल्यावर मग ती बोलू लागली. कितीएक दिवसाचं मौन सुटलं तिचं. ऑपरेशननंतर डॉक्टरांना पुन्हा कधीच भेटू न शकल्याची खंत तिच्या बोलण्यात होती, त्यांच्या मुलाशी बोलून ती खंत भरून निघाल्याचं ती म्हणाली. एकदा भेटायचंही आहे तिला त्यांना. प्रत्यक्षात बोलायचंय. त्यांनीही औरंगाबादेत आल्यावर भेटण्याचं आश्वासन दिलंय. हा एकूण फोनसंवाद बघणं अवर्णनीय होतं. त्यांनी मग विनंतीवरून डॉ. व्यंकटराव डावळे यांचा फोटोही आमच्यासाठी पाठवला. तो फोटो बघितल्यानंतर तिच्या चेह-यावर जो आनंद होता, तो वर्णनापलिकडचा.

जेवढा वेळ ती त्यांच्याशी बोलत होती, तेवढा वेळ तिची नजर मोबाईलवर, देवापुढे हात जोडून बसावे तसे आवाजाच्या दिशेने हात जोडलेले. डोळ्यातून अखंड पाणी झरतंय. ही नकळत, सहज घडलेली कृती, सहसा लक्षातही न येणारी.
......

आईला काही द्यावं एवढी ताकद कुठल्याच मुलात नसते; पण असं काही घडलं आणि तिच्या चेह-यावर ते दिसलं की, सार्थक झाल्यासारखं वाटतं. फेसबुकमुळे ते शक्य झालं. त्याचं महत्त्व मोठंय. एवढ्या दिवसाच्या उपस्थितीचा हा काही कमी लाभ नाहीये म्हणायचा. दिवस अगदीच वाया नाही गेले!

फोटो सौजन्य: डॉ. अरुण डावळे

‘देवघरातले डॉक्टर’ हा मूळ लेख वाचायचा असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.

टिप्पण्या