देहधर्म, देहावसान आणि देहदान!
घरी त्या आणि मी दोघेच. बायको बाहेर गेलेली, मुलगा क्लासला. त्यांच्या सोबतीला म्हणून मी थांबलेलो.
त्यांच्या खोलीतून आवाज आला, ‘मला उठायचंय.’ आवाज खणखणीत. मला बैठकीत ऐकू यावा असा. मी पुस्तक बाजुला टाकून त्यांच्या खोलीत गेलो. पाठीशी हात घालून त्यांना उठवून बसवलं. भिंतीशी लोड, त्यावर उशा मांडून मागे टेकवलं. मग त्या म्हणाल्या ‘टीव्ही लावून द्या.’ मी टीव्ही सुरू केला. आता रात्री दहापर्यंतची निश्चिंती.
महिनाभरातून कधीतरी माझ्यावर हा प्रसंग यायचा. बायको त्यांना सोडून क्वचितच बाहेर जायची. तर पुन्हा असाच एकदिवस मी सोबतीला थांबलेलो. तसंच उठवून बसवलं. रिमोट घेवून टीव्ही लावू लागलो तर तो लागेना. सेल वीक झालेले असणार. मी ते बडवू लागलो तर त्या म्हणाल्या, ‘मी फार दिवस नाहीयेय बरं आता. ते दोघं घरात नाहीयेय म्हणून सांगतेय.’ तेवढ्यात टीव्ही लागलाच. मी पुढचं वाक्य येण्यापूर्वीच खोली सोडली.
तिस-या वेळेस मला थांबवलंच त्यांनी. मीही गप्प. मग म्हणाल्या, ‘मी गेल्यावर ही खोली मुलाला द्या. आता त्याचं दहावीये. त्याला स्वतंत्र खोली पाहिजे.’ मी म्हटलं, ‘तुमची सिरियल संपून जाईल. आज लग्नाचं दाखवणार आहेत. जाहिरातीत दाखवलंय तसं.’ त्यांनाही आठवलं. त्या म्हणाल्या, ‘लवकर लावा.’
टीव्ही लावून तिथून बाहेर पडलो; पण ते वाक्य काही पाठ सोडेना. पुस्तक- पेपर काहीही डोक्यात शिरेना. राहून राहून तेच आठवू लागलं आणि त्या गेल्यानंतरची त्यांची ती रिकामी खोली दिसू लागली. आतून रेग्झीन अंथरलेला पलंग हटवलेला, औषधांचा टेबल गायब, खिडक्या उघडलेल्या आणि खोलीतला तो विशिष्ट आजारी वास गायब झालेला, रंगरंगोटी केलेलं सगळं काही चकाचक....आणि मग एकदमच भकास वाटू लागलं. उबच गेली खोलीतली. अंगातली शक्ती गेल्यासारखंच वाटू लागलं. गोळा आल्यागत पाय जड झाले.
एकदिवस तर कमालच झाली. त्यांच्याच खोलीत बातम्या बघत बसलो होतो. घरात आम्ही दोघेच. अचानक त्या म्हणाल्या, ‘आठवलं म्हणून सांगून ठेवते, मला देहदान करायचंय.’ मी दचकून त्यांच्याकडे पाहिलं. त्या किंचितसं हसल्या आणि म्हणाल्या, घाबरण्यासारखं काही नाही त्यात. त्या दोघांनाही सांगून ठेवलंय. तुम्हाला सांगायचं राहिलं होतं.
देहदानाचा हा विचार त्यांच्याकडे मोठ्या भावाकडून आलेला. त्या पाच भावातली एकुलती बहीण. सगळ्यात मोठ्या भावाचा कायम फोन यायचा. ‘काय चाललंय बेटा’ म्हणून. त्या ऐंशीच्या, भाऊ नव्वदीत; पण बेटा म्हणणारं कुणी तरी होतं त्यांना. तो गेला आणि त्या खचल्या. त्यानं देहदान केलं, यांनीही देहदानाचा निश्चय केला. तसं सांगून ठेवलं. ते ऐकायला कसंसंच वाटायचं; पण बोलणार काय?
त्यापूर्वी एकदा त्यांच्या लहान भावाचा हैदराबादेतून फोन आला. तो इस्पितळात. कदाचित शेवटच्या घटका मोजतोय. याही अंथरूणाला खिळलेल्या. ऐकत अर्थ लावत, आठवणी सांगत चाललं त्यांचं बोलणं काही वेळ. आता प्रत्यक्षात आपली कधीच भेट होणार नाही याची स्पष्ट जाणीव दोघांनाही झालेली. भयंकर वाटलं ते बघताना. त्यांचं ते ऐकताना. काय काय आठवत असेल त्यांना. लहानपणीचे सारे दिवस....
भले माणूस अंथरुणावर पडून असेल, त्याचं सगळं करावं लागत असेल तरी ती खोली, तो पलंग एक आधार असतो घराचा. त्यांच्याकडून जागेवरनं उठणंही होत नाही; पण घरात कुणीतरी आहे याचा फार मोठा दिलासा असतो.
त्यांचा पलंग खिडकीला लावलेला. बाहेर झाडं होते. इडलिंबूचा घोस खिडकीत आलेला असायचा. पक्षांचे आवाज चालू असायचे. पाठीमागे काम करताना खिडकीत त्यांचं अस्तित्व जाणवायचं. मात्र त्या गेल्या तेव्हा तिकडे जायलाही नकोसं वाटायला लागल...
......
चिकनगुनियाची पहिली लाट लातूरात आली तेव्हा त्या तिथेच आजारी पडल्या. एकट्या राहात होत्या. काही दिवस इस्पितळात राहून त्या महिनाभरात त्यातून सावरल्या. तेव्हा माझी आई म्हणाली, ‘त्यांना आता एकटं राहू देवू नकोस. तुझ्याकडेच आणून ठेव. आमची काळजी नको. आम्ही गावाकडंच राहणार. वेळ येईल तेव्हा तिघांपैकी कुणाकडेही राहू. त्यांना मायेचे मुलगी आणि नातू. त्यांच्यात राहिलेल्या ब-या.’
त्यांनी नकारच दिला पहिल्यांदा. मुलीकडे कसं राहू म्हणून. नंतर नातवासाठी तयार झाल्या. बरे चालले होते दिवस; पण मग असंच एकदिवशी सकाळीच त्या पडल्या आणि खुबा बदलावा लागला. नातवाची शाळेची वेळ झाली की कप्प्यातून त्याचा युनिफॉर्म काढणे आणि त्याला इस्त्री करून द्या म्हणून मला आवाज देणे हा त्यांचा रोजचा कार्यक्रम. मी करतोच ना रोज इस्त्री, मग पुन्हा पुन्हा काय सांगायची गरजै म्हणून मला वैताग यायचा; पण त्यांना त्यात आनंद मिळत असावा. तर एकदिवस झटक्यात उठून ते कपडे काढतांना त्या तोल जावून पडल्या. खुब्याचं ऑपरेशन झालं. हळूहळू चालत त्यातून त्या सावरत होत्या. चालू लागल्या होत्या. मात्र असंच सकाळी वॉकर घेवून चालताना त्यांच्या समोर फरशीवरनं पाल आली, तिच्या तोंडात झुरळ होतं. दचकून त्या मागे सरकल्या. वॉकर घेवून मागे सरकल्यामुळे तोल गेला आणि पडल्या. त्यात त्यांना कंपवात. नंतर चालण्याची त्यांची हिंमतच झाली नाही. तशाच अंथरुणावर.
अंथरुणावर पडून असल्या तरी त्यांचा आवाज खणखणीत, स्मरणशक्ती तल्लख, डोळे चारचार तास टीव्ही पाहण्यासारखे व्यवस्थित आणि बाहेरच्या खोलीतलं बोलणंही स्पष्ट ऐकू यावं एवढी तीव्र श्रवणशक्ती. फक्त अंगातलं बळ गेलेलं. बायको म्हणाली, मी आईचं घरीच करणार सगळं. अंथरूणाला खिळलेल्याचा देहधर्म सांभाळणे ही सोपी गोष्ट नसते. सगळं आवरून तुम्ही दोन घास खायला बसला आहात तेवढ्यात तिकडून तुम्हाला आवाज दिला जावू शकतो. तसंच उठा, पुन्हा आटपा... बायकोने आपलं सगळं शिक्षण गुंडाळून टाकलं आणि स्वत:ला त्यांच्या खोलीतच कोंडून घेतलं. त्या पुढे तिनेक वर्ष राहिल्या. जाण्याच्या काही दिवस आधी त्यांनी तिला असंच एकदिवस जवळ बोलावून घेतलं, म्हणाल्या, लहानपणी तुझं जेवढं केलंय ते सगळे वसूल करते आहे बघ मी. तूही केवढं धीराने करते आहेस. नंतर त्यांचे डोळे भरून आले.
दिसायला त्या भारदस्त, उंचापु-या. दाक्षिणात्य खानदानी सौंदर्य. मोठे डोळे. त्यांचं माहेर तेलंगणातलं. त्यांच्या बोलण्यात तिकडचा हेल असायचा. माझ्या घरात बरेच शब्द आणि पदार्थ त्यांच्याकडून आले आणि रूळले. माहेर मोठं आणि नंतर नवराही चांगल्या हुद्यावर असल्याने त्यांच्या वागण्या बोलण्यात एक वेगळाच रुतबा होता.
बायको त्यांची एकुलती एक. त्या एवढ्या मुलगीमय होत्या की, आमच्याकडे राहायला आल्यावर त्यांनी इकडची सगळी नाती मुलीच्या पद्धतीनेच सांभाळली. माझ्या आईवडिलांना, भावाबहिणींना आम्ही ज्या नावाने हाका मारायचो, त्याच नावाने त्याही बोलायच्या. आपलं स्वत:चं वेगळं संबोधन त्यांनी कधीही वापरलं नाही.
....
बाहेर कुठलाही कार्यक्रम असो, आम्हा तिघांपैकी एकजण घरी थांबायचा. शक्यतो बायकोच. कधीतरी लग्नकार्याच्या निमित्ताने बायको दोनेक तासासाठी जायची आणि मी थांबायचो. तिचं ते दोनेक तास बाहेर जाणं त्या दोघींसाठी किमान आठवडाभर पुरायचं. मला स्मरणशक्तीची कमाल वाटायची. त्या दोनेक तासात ती जे काय जगायची त्यातला शब्द ना शब्द त्यांना सांगायची. तिथं कोण कोण भेटलं, काय म्हटलं, त्यांचे कपडे कसे होते... इव्हन अमूक एकाशी बोलताना त्याच्या आजूबाजूला कोण होतं... इथपर्यंत त्याचं डिटेलिंग असायचं. हे दोन तास कितीतरी दिवस चालत राहायची. पहिल्यांदा वाटायचं, एवढं कशाला विस्तृत सांगत बसते ही; पण त्यांच्या डोळ्यात मात्र चमक दिसायची. ती जे सांगेल ते सगळं चित्र त्यांच्या नजरेसमोर दिसत असेल. बायकोचे वडिल लवकर गेले. त्यांच्या पश्चात या दोघीच. त्यामुळे एकीने काहीतरी सांगणं, दुसरीने ऐकणं, ते नजरेसमोर आणणं ही त्यांच्या अंगवळणी पडलेली सवय असावी.
त्याच काळात आणखी एक संकट आलं. बायकोला चिकनगुनिया झाला. ती अंथरूणावर, मुलगाही तापाने फणफणलेला. तो अंथरूणावर, त्या तर बेडरिडनच. एका खोलीत तीन बेड. मी बाहेरच्या खोलीत. भयंकर घाबरल्यागत झालं होतं. एकेदिवशी मध्यरात्री त्यांच्या खोलीतून चित्रविचित्र आवाज येवू लागला. कळेना. त्या झोपेत काहीतरी बरळत असाव्यात; पण आवाजाने अंगावर काटाच आला. आता काय करावं? उठलो, लाईट लावला. मग त्या टक्क जाग्या झाल्या. काही तरी भयानक स्वप्न पडलं असावं. खूप वेळ मग तिथेच त्यांच्यासोबत बसून राहिलो. बोलत राहिलो. त्यांनीही सावरून घेतलं. बाहेरचा अंधार कमी होत गेला आणि हळूहळू उजाडू लागलं. आठवडाभरात दिवाळी होती. त्यांच्यात कुठूनसं बळ आलं, त्या म्हणाल्या, सामान आणा. पुढचा आठवडा मग त्यांच्या खोलीत फराळाचा पसारा मांडला. त्यांनी प्रमाण सांगायचं आणि मी करायचं... अगदी प्रत्येक म्हणजे प्रत्येक पदार्थ. दिवाळीनं घरावरचं मळभ हटवलं.
पूर्वी त्या माझ्याकडे येताना त्यांच्या गावावरनं साताठ बॅगा घेवून एस्टीने यायच्या. त्या पहाटे निघालेल्या असायच्या. मग दुपारी मी चौकात त्यांना आणायला जायचो. त्यांचं सत्तरीकडे झुकणारं वय आणि सोबत मात्र एवढ्या मोठ्या बॅगा. ते उतरून घेताना वेळ झाला की, कंडक्टरही किरकिर करायचा. त्याची किरकिर त्या मनावर घ्यायच्या नाहीत. तिकडूनही त्यांना असंच कुणीतरी बसवून, सामान चढवून दिलेलं असायचं. मलाही वाटायचं, कशाला एवढं सामान आणतात म्हणून. त्यांच्या गावी मिळणारे पेढे, खवा, तूप, पंढरपुरी मुरमुरे, दाळीचं पीठ, शेंगदाणे, मसाले वगैरे, शिवाय कधी आप्पेपात्र- इडलीपात्रसारखी भांडीकुंडी असं काहीही असायचं त्यात. ताकातले धपाटे आणि शेंगदाण्याची भरपूर चटणी एवढं एक त्यात मला बरं वाटायचं. ना सामान गाडीत चढवता येतं ना उतरवता येतं तरी तेवढं घेवून प्रवास करण्यामागची त्यांची भूमिका कळायला जरा वेळ जावू द्यावा लागला. पोरीकडे जातोय, तिच्या संसारात सगळं मुबलक असावं ही जी काय भावना त्यामागे असेल ते असेल; पण त्यांचं ते धाडस आता ग्रेटच वाटत राहातं. तुलनेत हातपाय धड असूनही दोन बॅगाच्या वर काही असेल तर आपली प्रवासभर चीडचीड होते. त्यांचं महत्त्व आता कळतं.
.....
जगजितसिंग गेले तेव्हाची गोष्ट. नेमक्या त्याच दिवशी आमच्या शेजारच्या एक बाई गेल्या. त्यांना नेणारा स्वर्गरथ निघाला आणि जगजितसिंगचं ‘हे राम’ सुरू झालं.
तू ही माता, तू ही पिता है।
तेरे कदमों में चारों धाम।।
हे राम.....हे राम....
गेल्या अनेक वर्षांपासून ‘हे राम’ अंत्ययात्रेच्या ओळखीची खूण झालेली. रेडिओवर जर अचानक हे गाणं लागलं तर घरभर सन्नाटा पसरायचा आणि त्वरेनं रेडिओचं तोंड आवळलं जायचं. फक्त आणि फक्त शोेकासाठीच या गाण्याची निर्मिती झाल्याचं शिक्कामोर्तब त्यावर आहे. एवढं हे ‘गाणं’ प्रत्येकाच्या मनात कोणाचं तरी ‘जाणं’ अशा अर्थाने भिनलं आहे.
त्या अंथरुणावर पडून असायच्या. रेडिओ आणि टीव्ही याशिवायचा दुपारचा वेळ त्या खिडकीतून बाहेर बघत काढत. खिडकीतून दिसणारा तुकडा आणि त्या तुकड्यात येणारे झाडंझुडपं, पक्षी एवढेच त्यांचे जग होते. झोपल्या जागेवरून आवाज, वास आणि घरातल्यांच्या स्वभावाचा अंदाज यावरून त्या अनुमान लावीत आणि तशा सूचना त्यांच्याकडून येत असत. अगदी किचनमध्ये उतू जायच्या बेतात असलेल्या दुधाचाही त्यांना अंदाज येई. त्यांचे कान तीक्ष्ण होते.
भाजीवाल्यांचे, फाटकांचे, शेजारण्यांचे, भांडेवाल्यांचे, गुरख्याचे वगैरे निरनिराळे असंख्य आवाज त्यांना पाठ होते. काही अंतरावरच मंगलकार्यालय असल्याने बँडच्या आवाजाचीही त्यात भर होतीच. तो आवाज कॉलनी दणाणून टाके. परिसरातल्यांसाठी हा त्रासाचा विषय असला तरी त्यांना मात्र तो आवाज आवडत असे. अशा वेळी त्यांच्या चेह-यावर हास्य फुलून येत. लग्नाला उपस्थित असल्यासारखेच भाव त्यांच्या चेह-यावर दिसत. पूर्वी पाहिलेल्या वराती त्यांच्या नजरेसमोर येत असाव्यात.
बाहेरून येणा-या अशा आवाजापैकीच ‘हे राम’ एक. दूरवर कोठूनही ‘हे राम’ चे स्वर ऐकू आले की, घर एकदम चडीचूप होई आणि स्मशान शांतता पसरे. नंतर मग त्या, ‘गेलं आज कुणीतरी!’ असे पुटपुटत. त्यानंतर ‘बरं झालं, सुटला बिचारा!’ असंही एक वाक्य पाठोपाठ येई. नंतर घरभर त्यांचे डोळे फिरत, परतल्यावर पुन्हा सापडावं म्हणून खाणाखुणा लक्षात ठेवल्यासारखे. हे दर अंत्ययात्रेला ठरलेलं आणि तरीही अस्वस्थ करणारं होतं. ‘हे राम’ त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून आम्ही काहीच करू शकत नव्हतो. मग आवाजाचे व्रण भरून येईपावेतो गप्प राहण्याशिवाय उपाय नसायचा.
एके दिवशी, नेहमीप्रमाणे सभोवती अशा असंख्य आवाजांची लगबग सुरू असताना त्या अचानक दचकल्या. बघितलं तर त्यांचा चेहरा भयग्रस्त झाला होता. काय झालं हे नेमकं लक्षात येईना; पण अचानकच सगळीकडे शांतता पसरल्याचं जाणवू लागलं. त्या काप-या आवाजात म्हणाल्या, ‘बँड थांबलाय, अचानक. काय झालंय बघा.....’ त्यांचं वाक्य संपण्यापूर्वीच ‘हे राम’ चे स्वर ऐकू येवू लागले. आणि एकदम धस्सं झालं. एरवी बँड थांबलाय की चालू आहे हे कोणाच्या लक्षातही आलं नसतं. लग्नाची मिरवणूक जाताना समोरून नेमकी अंत्ययात्रा आल्याने बँड गच्चकन ब्रेक लागल्यासारखा थांबला होता.
.....
त्या जाण्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट. फार तर दुस-या दिवशी संध्याकाळपर्यंतच त्यांचं आयुष्य असल्याचा अंदाजा आला होता. डॉक्टर बघून गेले होते. त्यांनीही आता नातेवाईकांना बोलावून घ्या म्हणून सांगितलं होतं. वयस्करांना सांभाळणा-या एका बाईंना त्या दिवशी बोलावून घेतलं. त्यांना अंदाज असतो. त्यांनी कानाची पाळी बघून आणि काही ठोकताळे बांधून सांगितला अंदाज.
आम्ही मग रात्री त्यांच्या खोलीतच झोपलो. मध्यरात्री कधीतरी अचानक बायको उठली आणि म्हणाली, मी आईशेजारी, तिच्या बेडवर झोपू का थोड्यावेळ? मला चर्रर्र झालं. काय उत्तर द्यावं? एका बाजूला तिच्या म्हणण्यातली आर्तता समजत होती. त्या दुस-या दिवशी गेल्या की तिच्या आयुष्यात आई ही गोष्टच उरणार नव्हती. तिच्याशेजारी शेवटचं झोपून घ्यावं ही भावना स्वाभाविक होती. दुस-या बाजूला, रात्री कुठल्याही क्षणी तो देह निष्प्राण होण्याची शक्यता होती. त्या बेडवर बायकोला कसं झोपू द्यायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता.
त्या गेल्यानंतर खूप दिवसांनी शेजारचा किराणा दुकानदार भेटला. तो सांगत होता, आज्जी छोट्याला घेवून पारावर बसची वाट पहात बसायच्या. आधी दुकानात काजूबदाम घ्यायच्या आणि बस येईपर्यंत छोट्याला ते भरवत असायच्या. त्यांचा हा क्रम पाचसहा वर्ष चालू होता.
मुलाच्या बाबतीत आता कुठलीही बरी गोष्ट घडली की, आधी तो पिंपळपार आणि त्यावर बसलेली ही आजीनातवाची जोडी डोळ्यासमोर येते. मग वाटतं, काय विचार चालू असतील तेव्हा त्यांच्या मनात. आपल्याला तर या गोष्टीचा पत्ताही नव्हता. तेव्हा जाणीव नव्हती, आता मात्र विचारानेही कालवाकालव होते.
.......
त्या गेल्या त्याला आता सात वर्ष झालीत. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. म्हणून मग त्यांची अंत्ययात्रा निघाली नाही आणि ‘हे राम’ ही वाजलं नाही. त्यामुळे त्या वेळी जे कोणी अंथरुणाला खिळले होते, त्यांच्या काळजात चर्रर्र झालं नसेल आणि त्यांनी, ‘कुणी तरी सुटलं बिचारं’ म्हणून उद्गारही काढले नसतील.
......
आजही, बँडचा आवाज आला की, तो आवाज गच्चकन थांबू नये आणि ‘हे राम’ ऐकू आलं तर ते कोणाला ऐकू जावू नये असं मनोमन वाटत राहतं. पण तो आवाज आला की, त्यांची मात्र हमखास आठवण येतेच.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा