गाव सोडावं लागलं तसं

गाव सोडावं लागलं तसं आईवडिलांनी घरातले देव, टाक, नवरात्र वगैरे सणंवारं मोठ्या भावाकडे सुपूर्द केले आणि देवाधिकातून अंग काढून घेतलं. तुम्ही खूप वर्ष केलं, आता वय झालंय, मानवणार नाही म्हणून उपासतापासही नको असं आधीच सगळ्यांनी त्यांना पटवून सांगितलं होतं. वयोमानाने त्यांनी ते ऐकलंही. त्यांच्या खोलीत एक दत्ताचा तेवढा फोटो आहे. सकाळी आणि रात्री झोपताना नमस्कार करायला तेवढा पुरेसा असतो.

काही तरी काम असावंच म्हणून सकाळी अंगण झाडणे आणि संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावणे एवढे दोन कामं आईने स्वत:कडे ठेवले आहेत. बस्स!
शहरात बोलायला कुणी नाही. येणारे-जाणारेही कमी. मग या काळात त्यांनी प्रारंभी दैनिके आणि नंतर काहीसे धार्मिक ग्रंथ वाचण्याचा सपाटा लावला. काही दिवस गेले आणि मग त्यांना करमेना झाले. आईच्या बेडशेजारी एक कपाटै. त्यात तिची औषधाची पोतडी असते. तर एकेदिवशी त्या कपाटातला सर्वात वरचा कप्पा तिने रिकामा केला. तिथे छोटा पाट, त्यावर स्वच्छ कापड टाकून त्यावर एक देवाचा फोटो लावला. तिला तो काही दिवसांपूर्वी घरातच सापडला होता. काही दिवसानंतर त्या पाटाच्या आजूबाजूला अगरबत्ती, समई, तेलाची बाटली, आगकाडीची पेटी वगैरे दिसू लागलं. म्हटलं, आपल्या घरात देव आहेतच, पुन्हा तुमच्या खोलीच वेगळे कशाला? ते म्हणाले असू दे, इथल्या इथं बरं असतं. तेवढ्या लांब जाववत नाही.
वडिल मग सकाळी उठले की, कंपाउंडच्या आतच घराभोवती चकरा मारू लागले. तेवढेच पाय मोकळे. एका बाजूने निघायचं आणि शेवटी आंब्याच्या कट्ट्यावर जावून बसायचं. काही दिवस ते चाललं. फिरायचंचै तर रिकामीच कशाला चक्कर म्हणून त्यांनी हातात एक कॅरिबॅग घेतली आणि फिरण्याच्या रस्त्यात लागणारी फुलं गोळा करायला सुरूवात केली. येताना वडिल फुलं घेवून येतात म्हणून आईही खुश. तिच्याकडच्या फोटोतला देव मग सजू लागला. जास्वंद, चाफा, कुंदा काकडा फिरण्याच्या रस्त्यात येतात. त्यातली वेलींची फुलं सहज हातात येतात, मात्र जास्वंदाची फुलं नेहमीच खालच्या फांदीवर असतील असं नाही. बरं हे सगळं मी उठायच्या आधी व्हायचं. मला कळाल्यावर मग ते फिरायला निघण्याच्या आत जास्वंदाच्या फुलाची फांदी खाली ओढून ठेवण्याचं एक काम मी सुरू केलं, जेणे की, त्यांच्या हाताला ते सहज यावं.
.....
तर असा हा दिनक्रम चालू होता. मध्यंतरी सगळी फुलं संपून गेली होती. कुठंमुठं एखादं अबोली किंवा गोकर्णाचं मिळायचं. पण आता कुंदाला बहर आला आणि देवाचे दिवस पालटले. वडिलांचाही फिरण्याचा उत्साह दुपटीने वाढला. तर काल असंच सकाळी फिरायला निघालो म्हणून सांगण्यासाठी ते आईला शोधू लागले तर ती जागेवर सापडेना. कुठे गेली असेल?
सध्या फुलांनी वेली लगडलेल्या आणि हाताला सहज येणारी फुलं त्यामुळे वडलांना कधी एकदा फिरायला जातो असं झालेलं. उत्साह वाढलेला. ती फुलं आणायची आणि आईला द्यायची यासाठी जणू ते अधिर. अस्वस्थ होत शेवटी ते निघाले तिला शोधायला. ते दिसले नाहीत म्हणून मी निघालो पाठोपाठ तर ते दोघेही मांडवाखाली. वडिलांच्या आधीच आई तिथे पोहोचलेली, कुंदाच्या ओढीनं. तिच्या एका हातात काठी, त्याला कॅरीबॅग लटकावलेली आणि त्याच फुलंचा फुलं. तिच्या दुसऱ्या हातात झाडू.

खरं तर वडिलांनाच ती फुलं आणायची होती आणि आईला द्यायची होती, मग ती त्यांच्या खोलीतला देव सजवणार होती. त्यांचा तो ठरलेला दिनक्रम होता; पण तो आज हुकला. आईची ओढ तिला रोखू शकली नाही. काही क्षण वडिल खट्टू झाले असणार; पण तरीही आपल्या कामावरचं अतिक्रमण त्यांनी फार मनावर घेतलं नसावं. आता उद्याची वाट आहे. बघा, कोण आधी पोहोचतं ते!
सध्या त्यांच्या खोलीतला तात्पुरता देव, मूळ देवांपेक्षा पॉवरफुल झालाय. त्याने आख्खा कप्पा व्यापून घेतलाय. रोज फुलांची आरासै त्याला आणि खोलीभर फुलांचा घमघमाटै. तुलनेत आमचे देव फुरंगटून बसलेत आताशा😀

टिप्पण्या