वॉकिंग व्हिडिओ आणि जगपरिक्रमा

 
सकाळदुपारची वेळ कशीही जाते; मात्र संध्याकाळनंतर भयंकर अस्वस्थ व्हायला होतं. अशावेळी रिकामपण असू नये. कुणी ना कुणी सोबत गप्पा मारायला असावं, एकदा का दहा वाजून गेले आणि जेवून झोपलं की, सकाळपर्यंत नोफिकीर.

मग म्हटलं, टीव्ही आणूयात. त्यात वेळ रमून जाईल. ते म्हणाले, पण आता मालिका बघवत नाहीत आणि बातम्यांनी अजूनच अस्वस्थ व्हायला होतं.

त्यावर उपाय म्हणून मग जरा मोठा फोरके टीव्ही घेतला; पण टीव्हीचं कनेक्शन घेतलं नाही. वायफाय आणि युट्युब जिंदाबाद!

म्हटलं, आता तुम्ही काहीही सांगा, ते लावूयात. त्यांनी पहिल्यांदा काही जुन्या सिनेमाची नावं सांगितली. बार्शीपासून ते आग्य्रापर्यंत कुठल्या कुठल्या टॉकिजमध्ये तरूणपणी त्यांनी एकत्र पाहिलेल्या सिनेमाची ती नावं होती. ते ते सिनेमा लावले; पण त्यात ते फार काळ रमले नाहीत. 


ते म्हणाले, आता दत्ताचं काही तरी बघू. त्यांनी गावाकडं दत्तमंदिर बांधलेलं, त्यांची दत्तावर अपार श्रद्धा. अर्थातच मग कुरवपूर, पीठापूर, गाणगापूर, नरसोबाची वाडी, गिरनारसह दत्ताची अनेक ठिकाणची परिक्रमा झाली. अगदी माहूरगडापर्यंत येवून ते काही दिवसांत संपलं.


मग त्यांना आवडेल असं युट्यूबवर कायेय हे शोधणं आलंच. शोधता शोधता सापडला राहुल देशपांडे आणि महेश काळे यांचा संयुक्त कार्यक्रम. पूर्वी कधी तरी दिवाळी पहाट म्हणून झालेला. आवाज आणि शुटिंग भलतंच भारी. त्यांना तो एवढा आवडला की, तो ब-याचदा रिपीट लावण्यात आला. नंतर नंतर तर प्रेक्षकांत त्यांना काही ओळखीची मंडळीही दिसू लागली. अच्छा म्हणजे कार्यक्रम औरंगाबादेतच झालेला होता. आदल्या वर्र्षीचा, अभ्युदय फाउंडेशनचा. त्या कार्यक्रमाला ते गेले होते; पण जागेअभावी लांबवर कुठून तरी त्यांनी तो फक्त ऐकला होता. तो आता प्रत्यक्ष पाहता आला होता. धन्यवाद निलेश राउत. अर्थातच तिथून मग काही दिवस घरात भावगीतांचेच कार्यक्रम चालत राहिले. कुमार गंधर्व, आनंद भाटे, शंकर महादेवन नंतर आईची फर्माइश म्हणून सुमन कल्याणपूर. या मंडळींच्या गाण्यांत त्यांनी चिंब भिजून घेतलं. कित्येक वर्षाची ऐकण्याची भूक अशी भागत गेली.


तर मग एकेदिवशी ते म्हणाले, आता गाणे खूप झाले, टीव्हीवर भारतातले मंदिरं असतील काय? आम्ही तशी बरीच बघितलीयेत, काही बघायची राहिलीयेत. मग सुरू झाली मंदिरांची सफर. पद्मनाभ मंदिरापासून दक्षिणेतील बहुतांशी मंदिरं झाल्यावर कंबोडियातलं अंगकोरवाट शिवाय इंडोनेशियातलं बाली, अशी भरपूर मंदिरे फिरून झाली. अगदी श्रीलंकेतला रावणाचा तथाकथित राजवाडाही बघून झाला. रावण आंघोळ करायचा तो धबधबाही झाला. त्याने सीतेला जिथे डांबून ठेवलं होतं, तिथे बांधलेलं सीतेचं मंदिरही झालं. 


नंतरच्या एका लिंकमध्ये इस्कॉनचे व्हिडिओ आले. देशोदेशीचे इस्कॉनचे गोरे भक्त, त्यांचं तल्लीन होवून रामनामाचा गजर करणं, त्यांचं मायापूरचं गुरूकुल, तिथं शिकणारी बाहेरच्या देशातली गोरीगोमटी मुलं वगैरे कुतूहलाची गोष्ट घरात बरेच दिवस मुक्काम ठोकून राहिले. दरम्यान अक्षरधामची मंदिरेही बघून झाली. अक्षरधामचे भगवेवस्त्रधारी स्वामी अबुधाबीच्या मशिदीत वावरताना आणि तिकडचा राजा इकडच्या मंदिरात फिरतानाही बघून झालं. नंतर स्वर्गारोहणी, वैष्णोदेवी, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगासागर, पशुपतीनाथ, अमरनाथ यातली काही त्यांनी प्रत्यक्षात बघितलेली. पण मग पुन:प्रत्ययाचा आनंदही घेतला. बरीच स्थळं बघितलेली असली तरी द्रोण कॅमे-यातून जे काही दिसतं ते अद्भूत असतं. याच दरम्यान त्यांनी नर्मदा परिक्रमा, मानसरोवरची परिक्रमाही करून घेतली.

.....

एक दिवस मुलगा म्हणाला, आता जरा वेगळं बघा, असं म्हणून त्याने त्यांची धार्र्मिक यात्रा थांबवली. आधी त्यांना समुद्राखालचं जग दाखवलं. ते रंगीबेरंगी मासे, निरनिराळे समुद्री जीव बघताना ते छोट्या मुलागत हरखून गेले. नंतर मग दाट जंगलं, त्यातले नाचणारे निरनिराळे पक्षी, विविध प्राणी बघून झाले. जगातले सर्वात जुनी झाडं, सर्वात अवघड रस्ते वगैरे सेरिजही झाली. त्यातून जरा बाहेर आलं की, मग नंतर सलग दोनतीन दिवस स्पेसबद्दलचे व्हिडिओ झाले. स्पेसमधून आपली पृथ्वी कशी दिसते.. वगैरे वगैरे. ते म्हणाले, उगाच इतकी वर्ष त्या मालिका आणि बातम्यातल्या किरकि-या बघत दिवस घालवले, हे बाकीचं जग किती सुंदरै. हे कधी पाहायला मिळालं असतं?


हे सगळं लावायचं फक्त संध्याकाळीच, दिवसा नाहीच. तेही त्यांचा हरिपाठ झाल्यावर. दहापर्यंत कार्यक्रम संपले की, रात्री त्याच विचारात झोपी जायचं. दुस-या दिवशी संध्याकाळपर्र्यत त्याचा आसर राहायचा. दुस-या दिवशी मग दुसरं काही. परिणामी एरवीच्या सगळ्या काळजी, चिंता युट्युबच्या या कार्यक्रमाने पळवून लावलेल्या असायच्या.

......

तर हे बघता बघता, एकेदिवशी अचानकच संत एकनाथांवरचा सिनेमा समोर आला. तो बघितला तर मग पाठोपाठ सगळेच संत येत गेले. त्यांची लिंक येत गेली. झालं पुन्हा त्यांची यात्रा धार्मिकतेकडे वळली. नंतरचे पंधरा दिवस यच्चयावत संत बघून झाले. संत तुकारामही त्यांना १९३७ चा विष्णूपंत पागनीसांचाच हवा होता. तोही झाला. तर एक दिवशी बहुतांशी संतही संपून गेले. त्यांची रात्र मस्त झोपेत जायची. एकच गोष्ट व्हायची, सकाळी माझ्याशी आई एकाच वाक्यात बोलायची, ‘आपलेच लोक भलते बदमाशैत, केवढा त्रास दिला संतांना.’ बस्स. 

संतांनी मुक्काम हलवल्यावर मग मुलगा म्हणाला, तुमचा बहुतांशी देश बघून झालाय, आता जरा जग फिरा. बाकीचे देश आणि तिथली शहरं बघा. जपानपासून मग त्यांचा प्रवास सुरू झाला, रोज किमान दोन तरी देश व्हायचे. हे पर्यटन पंधरा दिवसांवर चाललं. सुदैवाने युट्युबवर खूप शहरांचे वॉकिंग व्हिडिओ आहेत. टीव्ही फोर के असेल तर आपणच शहरात फिरतोय याचा भास होत राहतो. तर बसल्या बेडवर पाय पसरून त्यांनी पाचपंचवीस देश असे पालथे घातले. बहुतांशी निसर्गरम्य देशांचा एरियल व्ह्यू बघून झाला. चीन, जपान, दुबईमधल्या बागा पायी फिरून झाल्या.

पुढे पुढे त्याच त्या गगनचुंबी इमारती त्यांना एकसारख्याच वाटू लागल्या. अंगावर येवू लागल्या. प्रश्न होता, आता काय दाखवावं? तेवढ्यात साउथचा एक धार्मिक सिनेमा युट्यूबवर दिसला. दक्षिणेतल्या सिनेमाचा सेट आणि त्यांच्या शुटिंगला चॅलेंज नाही. ते बघायला भारी वाटतात. तर तो महाभारतावरचा सिनेमा होता, तो प्रचंडच चालला आमच्याकडे. मग आपोआपच तिकडच्या असल्या सिनेमाची लिंक येत गेली. 

तूर्त तामिळ, तेलगू वगैरे भाषेतले धार्मिक सिनेमे आमच्याकडे हाउसफुल आहेत.... आता त्यांच्या खोलीतून तमिळ आणि तेलगु वगैरे संवाद आम्हाला उशीरापर्यत ऐकू येत असतात. 

.....

नव्या काळात युट्युब हे वयस्करमंडळींसाठी वरदानै. वॉकिंग व्हिडिओ हे अफलातून आहे. ज्येष्ठांना ते दाखवलंच पाहिजे.

परवाचं एक उदाहरण असं- मध्यंतरी खंडोबाचं नवरात्र होतं. त्यांचा कित्येक वर्षाचा नियम खंडोबाच्या दर्शनाला साता-याला जाण्याचा. प्रकृतीमुळे आता अशक्य. अशातच युट्युबवर ते मंदिर सापडलं, अगदी ताजं चित्रिकरण. बस्स! तो जो काय आनंद होता त्यांच्या चेह-यावर तो अवर्णनीय. डेक्कन पोलने हे घरबसल्या दर्शन घडवलं. धन्यवाद सारंग टाकळकर आणि महेश देशमुख, चित्रिकरणासाठी. 

.......

तुमच्या बघण्यात आणखी काही असेल, वयस्कर; जरा धार्मिक वृत्तींच्या मंडळीसाठी, त्यांच्या आवडीला शोभेल असं काही तर ते कृपया सांगावे!

टिप्पण्या