टोपणनाव, पुरस्कार आणि नारळीकर......
रात्रपाळी होती. शहरआवृत्तीची पानं गेली होती, फक्त पहिलं पान बाकी होतं. ऐनवेळेवर येणा-या बातमीसाठी बॉटमची जागा सोडली होती. त्याला पर्यायी बातमीही होतीच. तेवढ्यात राज्य पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी कळाली. पण डिट्टेल नव्हते आलेले. बातमी तर जायलाच पाहिजे होती.
संध्याकाळी उशीरा पुरस्कार जाहीर झाले होते आणि मुंबईहून बातमीच आली नव्हती. नेटही बंद होते. मग स्थानिक पेपरमधल्या मित्रांना फोन केले. त्यांच्यापैकी एकाने संक्षिप्त यादीचा फॅक्स केला. काही मान्यवर आणि या भागातील पुरस्कार विजेत्यांची नाव असलेली ती यादी मग लावली, ज्यांचे फोटो मिळाले ते लावले आणि आवृत्ती जावू दिली आणि निवांत झालो.
पहाटे पहाटे घरी गेल्याने ढाराढूर झोपलो होतो; तर सकाळीच श्याम देशपांडेचा फोन आला. म्हणाले, अभिनंदन! मी अर्धवट झोपेत. बरं म्हणून फोन ठेवणार तेवढ्यात त्यांनी ‘पुन्यांदा चबढब’ला दत्तू बांदेकर पुरस्कार जाहीर झाल्याचं सांगितलं. त्यांनी ती लोकमतमध्ये वाचली होती. शीर्षकातच नावाचा उल्लेख असल्याने लगेच लक्षात आलं होतं.
माझा पेपर सोडून बाकीच्या वृत्तपत्रात ती बातमी होती. दुस-या दिवशी मानद संपादक मनोहर देशपांडे म्हणाले, ‘बातमी अर्धवट लागली म्हणून तुला मेमो द्यावा की पुरस्कार मिळाला म्हणून अभिनंदन करावं?
खरंच होतं ते, ज्या दैनिकातला तो कॉलम होता, त्यातच ती बातमी नाही. बरं, गंमत म्हणजे त्या पुस्तकातलं पहिलंच प्रकरण पुरस्कार कसे मॅनेज होतात यावर होतं.
...
मनोहर देशपांडे सरांनी नंतर प्रभाकर मांडे आणि अनुराधा वैद्य यांच्या उपस्थितीत दैनिकात एक छोटेखानी सत्कारही घडवून आणला. हे पुस्तक साहित्यसेवा प्रकाशनानं काढलेलं होतं. नंतर दासूचा फोन आला. म्हणाला, पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहेच; पण त्याहीपेक्षा अधिक चांगली गोष्ट म्हणजे एखादी संस्था आपल्या कर्मचा-यासाठी सत्काराचं आयोजन करते ते.
...
आपलं अभिनंदन करणारापैकी सगळ्यांनाच पुरस्काराविषयी माहिती नसते. कळालं की, तेही अभिनंदन करतातच. मग त्यापैकी कुणीतरी विचारायचं, कसला असतो रे हा पुरस्कार? कशासाठी दिला जातो वगैरे. मग मीही उडत उडत सांगायचो, अरे, ते जयंत नारळीकर वगैरेंना मिळाला नाही का, त्यापैकी. बहुधा त्याच वर्षी जाहीर झालेल्या वाङमयीन पुरस्कारात नारळीकरांचंही पुस्तक होतं. नारळीकरांना वगैरे मिळालाय त्यापैकी हा पुरस्कारै म्हटलं की, ऐकणा-याला ते फार भारी वाटायचं. 😜
...
पुरस्कार वितरण वगैरे झालं आणि चेकही मिळाला. पुस्तक बब्रूवान रूद्रकंठावार नावाने लिहिलेलं. चेकही टोपण नावाने आलेला. आता काय करायचं? बँकेला विचारलं. बघू म्हणाले. तो चेक अखेर वटलाच नाही. पहिल्या वहिल्या पुरस्काराची रक्कम मिळालीच नाही. त्याच काळात काही वादही चालू होते. गमतीत एकाने असं सुचवलं की, एरवी तेरवी ते पैसे मिळतीलच याची काही शाश्वती नाही, त्यापेक्षा अमूक एका गोष्टीचा निषेध म्हणून पुरस्काराची रक्कम शासनाला परत करत असल्याची घोषणा कर. चांगला इश्यू करता येईल. शिवाय तू पेपरवाला. चांगलं जमून येईल.
...
त्यानंतर सतरा अठरा वर्षांनी ‘आमादमी विदाउट पार्टी’ला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम मात्र आधीच जमा झाली; तरी टोपणनावाने द्यायचा तो त्रास दिलाच. पुरस्कार जाहीर झाले होते, पण माझ्यापर्यंत बातमी आली नव्हती. आकाशवाणीतला ज्येष्ठ मित्र नितीन केळकर यांचा फोन आला आणि पुरस्कार मिळाल्याचं कळालं. नंतर मात्र पोस्टमनने ब-यापैकी घाम काढला. शासनाचं पुरस्काराचं पत्रंच देईना तो. पत्र टोपण नावानेच आलेलं, फक्त केअरऑफ माझं नाव होतं. तो म्हणाला, बब्रूवान नावाचं कोण राहातं तुमच्याकडं? मी म्हटलं, अहो, माझंचै ते. तो म्हणाला, एका माणसाचे दोनदोन नावं कसे असू शकतात? शिवाय हे शासनाचं पत्रंय, स्पीडपोस्टने आलंय. साधं असतं तर दिलं असतं. किमान बब्रूवान नावाचं आधारकार्ड तरी दाखवा.
...
नंतर दादापुता केल्यावर त्याने ते दिलं; पण आता टोपणनावाचंही आधारकार्ड काढून ठेवण्याची आयडिया चांगलीये!😏

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा