श्यामराव नावाची चळवळ

बरं नाहीये म्हणून ज्येष्ठ मित्रानं आपल्याला भेटायला यावं, मनसोक्त गप्पा माराव्यात. पुढचे काही प्लॅन ठरवावेत. त्यांच्या वाढदिवसाची पार्टी ठरवावी आणि तोपर्यंत बरं होण्याची अधिकारातली धमकी द्यावी. कपबशा उचलून किचनमध्ये नेवून ठेवाव्यात. दुस-या एखाद्या दिवशी ‘काळजी करू नको, आम्ही सगळे तुझ्या पाठिशी आहोत.’ असा मेसेज करावा आणि चारेक दिवसात स्वत:च जग सोडून जावं. तब्येतीमुळे त्यांच्या अंत्यदर्शनालाही आपण मौताद व्हावं, हे फार जीवघेणं असतं.... 

जीवनमृत्यू ही जगरहाटी असते वगैरे कळतं आपल्याला, ते सांगायला सहज असतं. खूप वर्षांपासून आपल्यातलाच एक भाग झालेला माणूस गेल्याचं कळणं अवघड असतं पचायला. कुठल्याही शस्त्रक्रियेने काढता येत नाही हा आतला भाग. तो ठणकत राहतोच, आपण असेपर्यंत. 

अशी माणसं खरं तर जात नसतात; ती असतातच आपल्या पाठिशी, त्यांच्या मृत्यूपश्चातही.

..........

कोरोनानंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमाला गेलो. प्रवेशद्वारावर श्यामराव भेटलेच नाहीत. यापुढे ते कधीही भेटणार नाहीत, हे पचायला फार अवघड. इतक्या वर्षांंची सवय आता मोडून घ्यावी लागणार.

शहरात कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, मग ते पुस्तक प्रकाशन असो, व्याख्यान असो, दैनिकांच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम असो किंवा मग कुणा परिचितांपैकी एखाद्याच्या घरचं कार्य असो, श्यामराव कायम हसतमुखानं प्रवेशद्वारावर असत. तसंच, तिथंच त्यांना पाहण्याची सवय होती. प्रत्यक्ष कार्यक्रमापेक्षा तिथे येणा-या मंडळींना भेटण्यात आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात श्यामरावांना अधिक रस असे. त्यांच्यामुळे आणि त्यांच्यासोबत मसापच्या कित्येक कार्यक्रमांना हजेरी लावली; पण थोडा वेळ झाला की, श्यामराव शेजारून अचानक बहाणा करून गायब झालेले असत. बाहेर उभे राहून कुणाशी तरी गप्पा मारत असत. श्यामराव एक निराळंच रसायन होतं. त्यांचे बहुतेकांशी कौटुंबिक नाते होते. आपल्या कुटुंबातलाच एक माणूस वाटावा एवढे ते प्रत्येकाशी समरस होत. 

......

श्यामरावांचा माझा ऐंशीच्या दशकापासूनचा परिचय. अगदीच पहिल्यांदा विद्यापीठात शिकत असताना, दासू आणि विकाससोबत विद्या बुक्समध्ये गेलो आणि श्यामराव भेटले. पहिल्याच भेटीत हा माणूस आपला जुना परिचित असल्याचीच भावना. त्यांची ओळख झाली आणि पुस्तकाच्या दुकानात कुणीतरी आपल्या ओळखीचं आहे याचा फार गर्व वाटायचा तेव्हा. तिथे मग कायम जाणं येणं व्हायचं. विद्या बुक्सच्या शेजारी पिंपळाचं झाड होतं आणि त्यावर पक्ष्यांचा कायम किलबिलाट असे. नवी पुस्तक चाळणे आणि तो आवाज ऐकत राहणे हे फार भारी वाटायचं तेव्हा. हळूहळू मग विद्या बुक्सच्या मामांशी पण संवाद होऊ लागला, तरीही त्याला वर्ष लागलं. मामा माणूस पारखल्याशिवाय फारसं बोलत नसत. त्यांच्या शशीकांत आणि श्रीकांतशी मात्र सख्य होतं.

श्यामरावांनी काही काळानंतर मग त्यांच्या राजहंस प्रकाशनाचं स्वतंत्र कार्यालय सुरू केलं. मग तर काय, रोजच सकाळी किंवा संध्याकाळी त्यांच्याकडे हजेरी असे. पुस्तकांप्रमाणेच पुस्तकांसंदर्भातल्या विषयांवरही चर्चा चाले. त्यांना पुस्तकांविषयी एखादी पंचलाईन मिळाली की, त्याचं ते माझ्याकडून लेटरिंग करून घेत आणि ऑफिसात लावत. त्यात त्यांनी लिहिलेली पुस्तकांवरची कविताही होती. त्या कवितेचं पोस्टर करण्याची त्यांची फार इच्छा होती. ती राहूनच गेली. त्यांच्यावर श्रीकांतने लिहिलेल्या साठीच्या कवितेची मात्र मनोजने कॅनव्हासवर छान प्रिंट काढून आणली होती. 

.......

बब्रूचा स्तंभ सुरू झाला तेव्हा त्यातल्या निवडक वाचकांपैकी श्यामराव एक होते. पुढे त्याचं पुस्तक निघावं असं ठरलं तेव्हा श्यामरावांनी माझी आणि साहित्यसेवाचे अरुण कुलकर्णी यांची ओळख करून दिली. बाकी कुणी प्रकाशक भाषेमुळे पुस्तक काढायला तयार नव्हते. अरुण कुलकर्णी म्हणाले, काढतो, मलाही आवडलंय; पण एक अट आहे. कव्हर कसं, कोण करणार, पुस्तक कधी छापणार, प्रुफ रिडिंग कोण करणार असले प्रश्न विचारायचे नाहीत. वर्षभरात त्यांनी पुस्तक काढलं, ते पुण्यात छापलं गेलं. मीही कधी प्रश्न विचारले नाहीत. मात्र पुण्यातून त्याचे गठ्ठे आणल्यावर पहाटे पाच वाजता त्यांनी त्याची पहिली प्रत माझ्या हातात दिली. पुढे त्या पुस्तकाला दत्तू बांदेकर पुरस्कार मिळाला, तो घेण्यासाठी मी आणि श्यामराव गेलो होतो. पुढे बब्रूची बाकी पुस्तके जनशक्तीने काढली. मागच्या जानेवारीत बब्रूला पंचवीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा श्यामरावांनी सण्डे क्लबमध्ये जोरदार कार्यक्रम केला. तत्पूर्वीही कोल्हटकर पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी भव्य कार्यक्रम केला होता. सांगण्याचं तात्पर्य, कौतुकात श्यामरावांचा कायम पुढाकार असे. प्रेम करायचं तर मनापासून. माझ्या प्रमाणेच इतरांचेही भरपूर कार्यक्रम त्यांनी घेतले. सण्डे क्लबचा असा सकारात्मक वापर त्यांनी केला.

.......

जुनी गोष्टै. अच्युत गोडबोलेंचं किमयागार नुकतंच आलं होतं. त्यांचा एक कार्यक्रम राजहंसतर्फे औरंगाबादेत ठेवला होता. श्यामरावच्या कार्यालयात आम्ही नेहमीप्रमाणे बसलो होतो. कार्यक्रमाविषयी चर्चा चालू होती. लोकांना फोन चालू होते. आमच्यात दोन व्यापारी क्षेत्रातली मंडळी होती. खरं तर त्यांचा पुस्तकांशी काही संबंध नव्हता. ती मंडळी श्यामरावांच्या ओळखीतली. निमूटपणे ते चर्चा ऐकत होते. श्यामराव त्यांनाही म्हणाले, या कार्यक्रमाला. त्यांनीही हो म्हटलं. पण ते येणार नाहीत हे स्पष्ट ओळखू येत होतं. मग थोड्या वेळाने श्यामराव त्यांना म्हणाले, गोडबोले फार मोठा माणूसै, दिवसाला साठेक हजार सहज कमवतात ते. त्यांना फार आमंत्रणं असतात व्याख्यानासाठी. परदेशातल्या विद्यापीठात त्यांची पुस्तके अभ्यासाला आहेत. आपल्यासाठी मात्र ते फुकट येताहेत. श्यामरावांचं ऐकून दोघेही चमकले. भले पुस्तकात रस नसेल; पण दिवसाला साठ हजार कमवणारा माणूस बघायला का होईना ती मंडळी कार्यक्रमाला येणार हे श्यामराव ओळखून होते. मी चकित होऊन त्यांच्याकडे पाहात होतो.

......

मंगेश पाडगावकरांनी अनुवादित केलेलं महाभारत येणार होतं. त्याची सवलत योजना चालू होती. श्यामराव ब-यापैकी प्रचारात होते. अर्थात आम्हालाही त्यांनी पटवलंच होतं. आमच्याकडे बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. बहिण म्हणाली, यावेळी आहेर म्हणून आपण चांगली पुस्तके देऊत. तू निवडून आण. लगेच महाभारतची सवलत योजना आठवली. म्हटलं, महाभारताचे दोन खंड आहेत, शिवाय पाडगावकरांनी अनुवादित केलेत आणि सवलतीतही आहेत. बजेट किंचित वाढेल; पण पाहुणे मंडळीना संग्राह्य पुस्तक मिळेल. तिला ही आयडिया आवडली. श्यामराव तयारच होते. लगेच शंभरावर प्रतींची ऑर्डरही नोंदवून टाकली. प्रत्यक्ष पाहुण्यांना हा आहेर देण्याची वेळ आली तेव्हा कुणीतरी म्हणालं, लग्नात कुठे महाभारत देतात का? महाभारत कशामुळे घडलं माहीत नाही का? झालं, वाटलं आपण असा काही विचारच केला नाही. आता कसं व्हावं? पण बहीण काही म्हणाली नाही. तिला त्यात काही वावगं वाटलं नाही. तिने कुणाला जुमानलं नाही. महाभारत वाटूनही तिच्या मुलीचा संसार चांगला चालू आहे.

.........

असंख्य खरेदीदार वाचक असतात की, त्यांचं नावही चर्चेत नसतं, ते कुठल्या वर्तुळात नसतात, कार्यक्रमाला फारसे दिसत नसतात; पण पुस्तकांचे शौकिन असतात. त्यांचा वैयक्तिक पुस्तकांचा संग्रह साहित्यक्षेत्रातील मान्यवरांना लाजवणारा असतो. पण प्रत्यक्षात मात्र अशी माणसं आपल्या वाचनाची, पुस्तकाची कधी चर्चा करत नसत. त्याचं भांडवल करत नसत. श्यामरावांकडे अशा माणसांचा राबता असे. ते असेच कधी तरी येत आणि फार काही चौकशा न करता नव्याने आलेली पुस्तके चाळून यातली पाहिजे ती पुस्तके घेवून निमूट निघून जात. वैद्यकीय, बँकिंग, कोर्ट वगैरे निरनिराळ्या क्षेत्रातली ही मंडळी असत. त्यांचं मला भारी कुतूहल होतं. त्यांच्यावर आणि त्यांच्या संग्रहावर मालिका करावी असा आमचा विचार होता; पण तो प्रत्यक्षात आला नाही. श्यामरावांनाही अशा निमूट वाचकांचं भारी कौतुक होतं. 

श्यामरावांचं कार्यालय म्हणजे साहित्य, संस्कृती, कला क्षेत्रातील रसिकांसाठीचा अड्डा होता. बाहेरगावावरनं आलेली लेखक-प्रकाशक मंडळी असोत की शहरातील त्यांचं भेटण्याचं हे ठिकाण होतं. श्यामरावच्या ऑफिसला आठवड्यातून किमान भेट हे सांस्कृतिक सक्तीची गोष्ट झाली होती. त्यामुळे मंडळीचीr येथे चक्कर असेच असे. दिल्लीहून व्यंकटेश केसरी आणि मुंबईहून सुरेंद्र जोंधळे आले की डॉ. सुहास जेवळीकरांसोबत इकडे फेरफटका मारत. त्यांच्याकडचे अनुभव ऐकायला मजा येई. राधाकृष्ण मुळी सुटीवर आले की, त्यांची हमखास संडे क्लबला हजेरी असे. स्वत: श्यामराव पत्रकारांचा सोर्स होते. त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या निमित्ताने पत्रकारांची उठबस असायची. पुस्तकप्रेमी संपादक-पत्रकार तर हमखास त्यांच्याकडे भेटत. काही फोन मात्र ठराविक वेळीच येत तेव्हा ते गमतीने म्हणत, बहुतेक आज कुणीतरी मोठा लेखक गेला असणार, त्याशिवाय यांचा फोन येणार नाही. दरवेळी असे होते असे नव्हे; पण तोही एक संपर्कस्वभावाचा भाग होता. संमेलन असो, कुठलं वादग्रस्त विधान असो किंवा साहित्य क्षेत्रातील कुठलीही घटना असो श्यामरावांकडे माहिती मिळणार याची सर्वांना खात्री असे. नसेल तर ती मिळवून पेपरना पुरवण्यात श्यामरावांना कोण आनंद होत असे. एरवी भेटी होणे अशक्य अशांच्या भेटी श्यामरावांच्या कार्यालयामुळे होत, त्या संवादातून काही चांगलं आकारालाही येई. त्यामुळे श्यामराव नावाची एक छोटीशी चळवळ होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

......

श्यामराव हॉटेलाच्या बाबतीतही फार दक्ष असायचे. एै-यागै-या हॉटेलात त्यांना चालायचं नाही. आम्ही पुण्याला मसापमध्ये उतरायचो. सकाळी नाष्ट्यासाठी आजूबाजूला हॉटेलं होती; पण श्यामराव तिथे जावू देत नसत. तिथून ते पायी काढत आणि वाडेश्वरला नेत. अमोल पालेकर वगैरे मंडळी इथे येतात असं त्यांचं ठरलेलं विधान असायचं. आम्ही खूपदा तिथे गेलो; पण पालेकर कधी दिसले नाहीत. औरंगाबादेतही त्यांचं रथी ठरलेलं. पुण्याहून शशीकांत फणसे आलेले असोत, मुंबईहून कधीतरी विवेक गिरधारी आलेला असो किंवा मग कविता महाजन त्यांचं हे रथी ठरलेलं असे. चांगली दोनतीन तास गप्पा रंगत. कविता गेली, श्यामरावही गेले. मध्यंतरी फणसे, विवेक येवून गेले; पुन्हा निमित्ताने येतील; पण विनाश्यामराव मैफलीचा आनंद आता खचितच असेल.

.......

नानासाहेब चपळगावकरांकडे किंवा सुधीर रसाळसरांकडे आणि अलिकडे प्रवीण बर्दापूरकरसरांकडे ते आले की तिथून ते माझ्याकडे येत. कधीमधी वहिनींना यवतमाळच्या गाडीत बसवून देण्यासाठी दग्र्याजवळ येत तेव्हाही ते जाताजाता माझ्याकडे येत. मग आपसूक आपण चहापाणी विचारणार, ते लगेच नाही म्हणणार. आपण विचारलंच नाही तर ते स्वत:च म्हणणार, वहिनी चहा वगैरे ठेवू नका हं, आताच नानासाहेबांकडे झालाय. हे सांगताना त्यांचा टोन वेगळाच असे. नानांकडे चहा झालाये हे तुम्हाला सांगता यावं म्हणूनच चहा विचारतोय असं मग मी गमतीने त्यांना म्हणे. ते दिलखुलास हसत. श्यामराव निष्कपटी, सरळसाधा माणूस, अशा गोष्टीत त्यांना आनंद मिळत असे.

विद्या बुक्सचे मामा पिंपळापुरे आणि राजहंसचे दिलीप माजगावकर हे त्यांचे श्रद्धास्थानं. माजगावकरांच्या लाईफस्टाईलचं त्यांना फार आकर्षण होतं. त्यांची गाडी, त्यांचा शोफर, त्यांचं लेखकांशी वर्तन, त्यांच्या स्टाफविषयीचं त्यांचं ममत्व यावर ते भरभरून बोलत. खास करून त्यांच्या शोफरचं वर्णन तर असं असे की, जुन्या काळातल्या सिनेमात हिरो गाडीतून उतरताना कॅमे-यात त्याचा बूट घातलेला एक पाय दाखवत तसं काहीसं आम्हाला माजगावकरांबद्दल वाटायचं.

......

श्यामरावांमुळेच अनेक बड्या लेखक मंडळींची जवळून ओळख झाली. ते आवर्जून अशा ओळखी करून देत. त्यांच्यामुळेच मसापमध्ये उठबस वाढली. अध्यक्ष कौतिकराव ठालेसर, के. एस. अतकरे यांच्याकडे ब-याच संध्याकाळ जात. अलिकडे सण्डे क्लबमध्येही त्यांच्यामुळेच नानासाहेब, रसाळसर, बर्दापूरकरसर, जयदेव डोळेसर, नेमाडेंच्या कादंब-या इंग्रजीत आणणारे संतोष भूमकरसर आणि निशीकांत भालेराव यांच्याकडून जुनं बरंच ऐकायला मिळायचं. त्यांच्या अनुभवाचं आणि त्या कथनाचं मला कायम आकर्षण होतं.

...

माझ्या बैठकीत भगवान गौतम बुद्धाची विपश्यनेसाठीची एक प्रतिमा लावलेलीये. खूप वेळ निरखून बघितलं की, एक भव्य बुद्धमूर्ती त्यातून आकाराला येते. फार पूर्वी दोनेक वेळेस मला ती दिसली होती. त्याला फार एकाग्र व्हावं लागतं. नंतर मीही तेवढं बघणं सोडलं. श्यामराव मात्र घरात आले की, बसण्यापूर्वी त्या फ्रेमसमोर काही वेळ उभे राहणार आणि मला लगेच दिसलं म्हणून मग स्थानापन्न होणार. मी दरवेळी म्हणायचो, इतक्या लवकर कसं दिसतं तुम्हाला की मला डिवचायसाठी म्हणताय? ते हसायचे. आता श्यामराव नाहीत. बैठकीत तसं उभं राहणारं आणि मिश्किल हसणार कुणी नाही. परवा ती प्रतिमा मी आतल्या खोलीत लावली. 

श्यामरावांना जावून महिना झाला, तेव्हा पहिल्यांदा घराबाहेर पडलो आणि त्यांचं कार्यालय गाठलं. श्यामराव गेल्याचं कळालं होतं; पण ते मेंदूत शिरतच नव्हतं. सारखं वाटायचं, ते कुठेतरी सुटीवर गेलेत. आज उद्या येतील. ते गेल्यावर, त्यांच्या अंत्यसंस्काराला नसल्याने त्यांचा नेहमीचाच चेहरा समोर यायचा. बाहेर कुठं जायचं म्हटलं की, चला, श्यामरावांना फोन लावा, ऑफिसात आहेत की नाही बघा असं वाटायचं. कारण गेले वीसेक वर्ष असा संवाद श्रीकांत, शाहू, मनोज यांच्याशी व्हायचा आणि आम्ही त्यांच्या कार्यालयात जमा व्हायचो. तिथे केवढ्या टिंगलटवाळ्या व्हायच्या. खेचाखेची व्हायची. नंतर पुढच्या काळात मात्र ते रविवारपुरतं बदललं आणि तिथे संडे क्लब स्थापन झाला. पण बाकीचे वार तेच चालायचं. तर ते वळण पक्कं बसलं होतं. म्हणून मग आधी ते आठवायचे आणि मग नंतर लक्षात यायचं, ते नाहीत. मग म्हटलं, ते गेल्याचं आपण पटवून घेतलं पाहिजे. वहिनीही कार्यालयात असतात असं कळालं होतं. गेलो तेव्हा नेमकं कुणी नव्हतं, आत जायची हिंमत होईना. त्यांच्या टेबलाच्या उजव्या बाजूची खुर्ची माझी फेव्हरेट होती. पटकन जावून तिथे आधी जावून बसायचा माझा प्रयत्न असे. ती खुर्ची रिकामी दिसली;पण मग ऑफिसच अंगावर आलं. पुस्तकं पोरकी व्हावीत असं कांहीसं फिलिंग होतं. क्षणभर उभं राहून बाहेर झाडाच्या कटट्यावर बसलो, सोबत शाहू होता. काही वेळाने मग श्यामरावांचा मुलगा अप्रूप भेटला. आतिथ्यात श्यामरावच. त्याच्याशी बोलल्याने खूप रिलॅक्स झालं. सारा ताण निघून गेला.

....

श्यामरावांच्या एकूण यशात शुभांगी वहिनींचा मोठा वाटा होता. त्यांच्याही स्वभावामुळे अनेकजण जोडले गेले. दासू, अंजली, श्रीकांत आम्ही कित्येकदा त्यांच्या घरीच गप्पांची मैफल जमवून असायचो. तिथे खाण्यापिण्याची चंगळ असायची. चेष्टामस्करीला उत आलेला असायचा. मिनूच्या लग्नापूर्वी तिने केलेल्या रेसिपींचाही खाण्यात समावेश असायचा.

......

जाता जाता: संण्डे क्लबमध्ये एखादा विषय चर्चेत असे आणि अचानक हसण्याचा किंवा गाण्याचा आवाज येई. तो असे श्यामरावांच्या मोबाईलचा. एखाद्या चर्चेत रस नसला की ते मोबाईल स्क्रोल करीत आणि अचानक एखादा व्हिडिओ लागे. सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत. आम्हाला वाटे नानासाहेब समोर बसलेले आहेत, त्यांना कसं वाटेल; पण तोही सवयीचा भाग झाला. त्याचं फारसं कुणाला काही वाटत नसे; पण बैठक संपली, बडी मंडळी गेली की, आम्ही त्यांना त्यावरनं डिवचत असू. तेही हसत आणि चर्चेला वळण वेगळंच लागलं होतं, अचानकच मोबाईलचा व्हिडिओ सुरू झाला वगैरे कारणे देत. मग अजून गमतीदार संवाद वाढत. 

त्यांच्या पश्चातही आता सण्डे क्लब चालू ठेवलाय; पण त्यात आता असेच मोबाईलमधून अनपेक्षित आवाज येणार नाहीत.  श्यामराव, आम्हाला तो डिस्टर्बन्स आवडायचा, खरं तर आम्ही त्याची वाट पाहायचो! 

टिप्पण्या