वडिल गेल्यानंतरची आई!
एकेदिवशी सकाळीच तिने बोलावून घेतलं आणि म्हणाली, ‘ये, असा जवळ बैस.’ मी पलंगावर तिच्याशेजारी बसलो. अचानकच डोक्यावर हात ठेवून ती म्हणाली, ‘मला कळतंय, तुमच्या डोक्यावरचं छत्र हरपलंय. आता तुम्ही सगळे एकमेकांना धरून राहा. तब्येतीची काळजी घ्या. तू सगळ्यात लहानैस; पण आधीच म्हातारा होतो आहेस.’
नंतर मग वडिलांच्या पलंगाकडे हात करून म्हणाली, ‘ते तर मार ऐटीत निघून गेले, एकटीवर सगळं सोडून. जराही विचार केला नाही...’ तिचा तो लटका राग वडलांवर असतो, नेहमीसारखाच. तिचा हा राग आता त्यांच्यापर्यंत पोचणार नाही याची तिला जाणीव आहे; पण अधूनमधून रागावतेच आहे. तिला खूप रागवून काढायचै त्यांना. तिचे कितीतरी प्रश्नैत नव्याने त्यांच्यासाठी. तिचा ज्योतिषांवरही रागै. कधीकाळी तिला एका ज्योतिषाने तुम्ही आधी मृत्यू पावाल म्हणून सांगितलं होतं, ती बिनधास्त होती आणि झालं ते हे असं. सहासष्ट वर्षाची साथ अशी तुटली. तरीही अधून मधून एकटी असताना ती स्वत:लाच प्रश्न विचारते, असं झालं कसं? ज्योतिषी एवढे चूक कसे असू शकतात? नंतर मग आपला हात उगाच उलटा फिरवते. आधी तू गेली असतीस तर त्यांना जगणं अवघड गेलं असतं असं सांगितलं की, मग ती शून्यात पाहते. कोरोना काळात त्या दोघांना स्वतंत्र खोल्यांत वेगळं ठेवलं होतं तर वडिल भयंकर त्रासून गेले होते. एकटेपणाच्या भावनेने ग्रासून गेले होते.
वयाच्या चौदाव्या वर्षी ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. तेव्हापासून ती उभीये ते अगदी अद्यापही. आता वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षातही सकाळी ती वडलांना शिरा करून द्यायची, रात्री त्यांच्या पायांना तेलमालिश करायची. त्यांना हवं नको ते पाहायची. त्यांच्यासाठीचं तिचं कामच आता संपून गेलं आहे. आता करायचं काय असा समोर प्रश्नच उभाये. गावाकडं इतकी वर्ष सोबत काढली, कोरोनाने इथं आणलं. पण सतत गावाचा धोषा लावलेला, तिथल्या माणसांच्या कायम आठवणीत व्याकूळ होणारी, आपलं काही बरंवाईट झालं तर गावाकडेच न्या म्हणून बजावणारी ती आता गावाकडे जायला सपशेल नकार देते आहे. दत्तराय एकटे आहेत असं कारण सांगून एकेकाळी गावाकडं निघून जाणारी ती आता दत्त एकटायेचं कारण सांगत नाहीयेय.
..........
यापूर्वी वडिल तीनदा अॅडमीट झाले आणि परत आले. ते अॅडमीट झाले की ती दत्तरायाला वेठीस धरायची. पन्नास वर्षाहून अधिक काळ गुरुचरित्राचं नियमीत पारायण केलंय त्यांनी, दत्तात्रय नेतातच कसं त्यांना म्हणून ती फुरंगटून बसायची. दत्तरायांनी तिनदा ऐकलं. त्यांना परत आणलं. पॅरेलिसिसच्या अॅटॅकमधून बरं केलं. चौथ्या वेळेस त्यांचाही नाईलाज असावा.
.........
सासर आणि माहेर अशा दोन्हीकडून आता सगळ्यात मोठी तिचै, त्यामुळे ज्याच्यासमोर रडावं असं कुणी राहिलेलं नाहीयेय. सगळी मुलं सेवानिवृत्त झालीत; नातूच चाळीशी पार करताहेत; पण ती लेकरंचैत. त्यांच्यासमोर कसं रडायचं, धीर सोडायचा? अगदीच भेटायला बहिणभाऊ आले, तेही तिच्याहून लहानच; पण तेव्हा तिने रडून घेतलं. आता ती अडवून धरते रडणं सगळं. एकदाच तिचा बांध फुटला होता.
वडिल हॉस्पीटलात दाखल होण्याच्या दिवशीची गोष्ट. दुपारी त्यांनी पलंगावर पडल्या पडल्या तिला दत्ताची भरपूर गाणी म्हणून दाखवली. त्यात ‘निघालो घेवून दत्ताची पालखी’ही होतं. संध्याकाळी त्यांना अचानक दाखल करावं लागलं आणि आठ दिवसांत ते गेलेही. ते गेल्यानंतरचे भकास दिवस हळूहळू सावरू लागले तेव्हा नातंवडांनी दत्ताची भजनं ठेवली. ‘निघालो घेवून...’ सुरू झालं. एव्हाना शांतपणे ऐकत बसलेली ती गाण्याचे बोल म्हणती झाली आणि तिने आलापही घेतला. एवढ्या वर्षात तिला असं कधीच कुणी पाहिलं नव्हतं. सगळे आचंबित होण्याचीच वेळ. आलापाचं नंतर विलापात आणि पुढे टाहोत रूपांतर झालं. ओंजळीत चेहरा झाकून मग ती खूप वेळ हुंदके देत राहिली. बस्स! त्यानंतर इतरांसमोर फार क्वचितच डोळे वाहिले तिचे. तिला कधी काळी तिच्या वडिलांनी गाणं शिकवलं होतं. वडिलांनाही गाण्याचा नाद. छंद एकानेच जपायचा म्हणत तिने गाणं गुंडाळून ठेवलं होतं, ते असं सहासष्ट वर्षानंतर पहिल्यांदाच समोर आलं.
तसं ती आता बर्यापैकी सावरलीये. तिने वडिलांचे सूत्र हातात घेतलेत. ती सकाळी पहिल्यांदा पेपर वाचते. रात्री टीव्हीवर धार्मिक बघत राहते. आता तिला ते एकट्याने बघावं लागतं. चमत्काराचा आनंद घ्यायला आता वडिल सोबत नसतात. मध्यंतरी ती रामायण पाहात होती आणि ऐन दिवाळीतल्या भागात सीता वनवासाला निघाली होती. घरोघरी दिवाळी साजरी होतेय, फटाके वाजताहेत आणि टीव्हीतली सीता वनवासाला निघालीये. टीव्हीवरचं पुराण आणि वर्तमानकाळ याचं तिला भान नसतं असं नाही. पण मग तो भाग याच वेळी का यावा, हे दु:ख शेअर करायला वडिल नाहीत याचं तिला वाईट वाटतं. ती हताशपणे पलंगाकडे पाहते आणि काहीतरी पुटपुटते.
आल्यागेल्या लहानमुलांना, पहिल्यांदाच येणारांना पैसे द्यायचे तिला सूचत नाही. खरं तर वडिलांना तीच सुचवायची, पैसे द्यायला लावायची. ती सांगेल तसं ते द्यायचे. आता जबाबदारी तिच्यावर आलीये असं तिला वाटतं. मग भावंडापैकी कुणाकडं तरी ती पैसे ठेवते. अमूक याला द्या, एवढेच द्यायचे की आणखी द्यायला हवेत असं तिच पुन्हा विचारते. आपण चुकतो आहोत काय? असं उगाचंच तिला वाटत राहतं.
या घरात शिफ्ट होताना तिने हट्टाने खिडकीजवळचा पलंग मागून घेतलेला. खिडकीतून सकाळी तिथे उन येते. एरवी सकाळी वडलांना ती तिथे बसवायची. तिथेच बसून वडील नामस्मरण करायचे. आताशा ती सकाळी त्या वेळात उन्हाचा कवडसा सोडते आणि वडलांच्या पलंगावर काही वेळ बसते. पुन्हा गुरूवार, शनिवार ते वाचत असलेले धार्मिक साहित्य त्या दिवशी वाचायला घेते. वडिलांविषयी बोलताना ती कधीच भूतकाळात बोलत नाही. त्यांना चावता येतं, त्यांच्या हिरड्या अजूनही मजबूत आहेत असंच ती म्हणते, होत्या म्हणत नाही. वडिल फुलं आणून द्यायचे, भाजी निवडायला बसायचे. आता ती दोन्ही कामं तिच्यासोबत करायचा मी प्रयत्न करतो. तिला कळतंय सगळं, ती बघते, म्हणते, नीट निवड. पानं सरसगट काढू नयेत, नाजूक काड्या राहू द्याव्यात पानांना. वडिलांवर रागवायची तसा तिचा सूर होतो; पण पुन्हा ती समजावणीच्या स्वरूपात बोलू लागते. घरी काही कार्यक्रम म्हटलं की, सगळ्यांत आधी तयार होवून, झ्याक कपडे घालून बैठकीत बसायची त्यांची सवय. मध्यंतरी एक कार्यक्रम होता घरासमोर अंगणात तर सकाळीच आवरून नवी साडी नेसून बाईसाहेब तयार. बरं येणार्यातलं कुणी तिला भेटायला येणार नव्हतं, तिच्या खोलीत कुणी येणार नव्हतं; पण ही तयार. घडीघडी वडलांची आठवण ती काढत बसत नाही; पण तिच्या कृतीतून मात्र ते सतत दिसत राहतं. त्यांची कमी जाणवू नये यासाठी तिची धडपड चालू असते.
जरा आजारी पडली की ती मौनात जाते. मुली भेटायला आल्या की त्यांना परतीचा आग्रह धरते. त्यांना पण संसारै, माझ्यात अडकल्या तर त्यांच्या घरचे काय म्हणतील याची तिला चिंता असते. घरात कार्याच्या हालचाली सुरू झाल्या की, आपल्या आजारपणामुळे काही बाधा तर येणार नाही याची तिला काळजी वाटते. आपल्यासाठी कुणीतरी घरी अडकून पडलंय याची तिला खंत वाटत राहते. त्यासाठी आपण पुन्हा उभं राहावं म्हणून तिचा प्रयत्न चालू असतो. वडिल गेल्यापासून तिने किचन सोडलं होतं, ती आता पुन्हा चहा करायला शिकली आहे. एखाद्या दिवशी कुणी उठायच्या आत किंवा रात्री उशीरा ती ही प्रॅक्टीस करते. कुणी आपल्याला हे करू देणार नाही हे तिला माहितीये. एका पहाटे मीच तिला पाहिलंय. तिला ऐकू येत नाही; पण चाहूल लागते. तिने त्यादिवशीच सकाळी मला बोलावून घेतलं, शेजारी बसवून म्हणाली, मी चहा केल्याचं कुणाला सांगू नकोस. मला जमतंय थोडंथोडं, करू देत जा.’ खरं तर पहाटेच तिची वकील मानसकन्या चहा घेवून येत असते. वडिल असतानापासूनचा तिचा खाडा नसलेला तो दिनक्रम. त्यांच्या पश्चातही चालू आहे.
वडिलांच्या पश्चात तिला उभं राहायचै. परिवारात कुणी किरकोळ आजारी पडलं तरी त्यांचं आजारपण तिला करायचै. लेकरांना पडेल ती मदत करायचीये. ते असते तर हॉस्पिटलात घेवून गेले असते, जरा बरी झाले की, मी येते तुमच्यासोबत दवाखान्यात असं ती बोलून दाखवते; मात्र स्वत:साठी दवाखान्यात जायचं म्हटलं की, अंगात त्राण नाही म्हणून ती हटून बसते. ते नसताना आता दवाखान्यात जावून स्वत:वर इलाज करून घेणं तिला अपराधी वाटत असेल काय? वडिल असताना, दोघांनाही ऐकू येत नसताना त्यांचं कधी अडलं नाही, ते गेल्यानंतर आता सावधगिरी म्हणून तिने श्रवणयंत्र वापरावं ही सगळ्यांची अपेक्षा आपल्यालाही मग चुकीचीच वाटू लागते.
वडिल गेल्यानंतर सैरभैर झालेली आई नेमकी उमजत नाही कधीच.
तिचं शांतपणे बघत राहाणं, उगाच कपड्यांच्या घड्या करण्यात मन रमवणं, देवघर फुलांनी सजवत बसणं, कुणी काही बोललेलं न समजताही त्याकडे नुसतं हसून बघत राहाणं भयंकर अंगावर येत राहातं. जगरहाटी म्हणून आपण विषय संपवणं एवढंच हातात असतं आपल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा