जमिनीवरचे पाय......



तुमच्याकडे एखादी चांगली वांगली घटना घडली की, तुम्ही दिवसभर त्यात अडकलेले असता. नंतर मात्र सगळा गोतावळा जातो आणि तुम्ही एकटे उरता. तुम्ही पुरते कंटाळून आणि थकून गेलेले असता. तेव्हा उशीरा रात्री तुमच्याकडे येणारा, तुमचा थकवा घालवण्यासाठी तुम्हाला बाहेर घेवून जाणारा एखादा कौटुंबिक मित्र किंवा नातेवाईक असतो. कधी एकटा, कधी जोडीने ही मंडळी हमखास येणार, लॉंगड्राईव्हला घेवून जाणार आणि आपल्यालाच बोलायला लावणार. बाहेरच कुठे तरी मग उशीरापर्यंत जेवणखाण, गप्पा आणि मग रिलॅक्स झाल्यावर ते घरी आणून सोडणार. ते स्वत: मात्र दिवसभर कुठल्या कामात होते, किती बिझी होते याबद्दल शब्दही नसतो. थकल्याची एक खूण दिसत नाही आणि आपलं ऐकण्यातला उत्साह तसूभरही कमी नसतो. नंतर आपल्याला कळतं की, ते दिवसभर कुठल्यातरी प्रवासात होते किंवा कंपनीच्या कुठल्यातरी हेक्टीक बैठकीत गुंतून होते.

आपण एरवी बाहेर आपल्याविषयी कितीही मौन बाळगून असलो तरी आपल्याला एखादं ठिकाण असं हवं असतं की, तिथं मोकळेपणाने मत मांडता येईल, चेष्टामस्करी करता येईल आणि प्रसंगी फुशारक्याही मारता येतील. खरं तर बोटावर मोजण्यासारखी अशी एकदोन घरं असतात. बाहेर काही न बोलणार्यांसाठी अशा जागा ऊर्जा असतात. तर असा एक परिवार माझ्या नशिबात आहे. तो परिवार म्हणजे ऋचा इंजिनिअरिंगचे उमेश दाशरथी आणि कुटुंबिय. ............
नव्वदच्या दशकात सुरुवातीला माझ्याकडे बजाजची कावासाकी फोर एस होती. पहिल्या काही लॉटमधली. त्याच्याच सांगण्यावरनं घेतलेली. तो आणि मी तीसेक वर्षांपूर्वी त्याच गाडीवर त्याच्या एका अत्यावश्यक कामासाठी औरंगाबादेतून पुण्याला गेलो होतो. तेव्हा त्याच्याकडे बजाजची स्कूटर होती. त्यानं नोकरी सोडून नुकतंच बजाजचं सर्व्हिस सेंटर उघडलं होतं. एकदिवस त्याच्या सर्व्हिससेंटरवर गप्पा मारत बसलो होतो तेव्हा तो म्हणाला, ‘पुण्याला जायचंय, चलतोस का?’ आम्ही निघालो. प्रचंड पाऊस कोसळत होता. त्याला कुठल्याही परिस्थितीत तिथे पोहोचायचं होतं. असं एकदोनदा आम्ही कुठं त्या गाडीवर गेलो असू. तो प्रवास अविस्मरणीय होता. कारण त्यानंतर तेवढा वेळ पुन्हा तो कधी सापडलाच नाही.
हा मधला पंचवीस ते तीस वर्षांचा काळ त्याने कधी मागे वळून पाहिलंच नाही. प्रचंड आणि अखंड मेहनत, नव्या वाटा शोधत त्याने मोठी झेप घेतली. सर्व्हिस सेंटर चालवत असतानाच काही काळ त्याने इंजिनिअरिंग कॉलेजात प्राध्यापकी केली. नंतर कंपन्यांसाठी फॅब्रिकेशनचं काम केलं. तत्पूर्वी त्याने १९८७ मध्ये श्री इंजिनिअर्स नावाने एका फर्मची स्थापना केली होती. १९९० मध्ये आदिश सर्व्हिस सेंटर उघडलं. १९९३ मध्ये रोहित इंडस्ट्रिजची स्थापना करून उत्पादनाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला.१९९८ साली ऋचा इंजिनिअर्स, २००० मध्ये रोहित एक्झॉस्ट सिस्टम्स प्रा. लिमिटेड, २००७ मध्ये ऋचा टेक्नॉलॉजिस हा महत्वाकांक्षी निर्यात प्रकल्प सुरू केला. २००९ मध्ये मेटल होम फर्निशिंगमध्ये उतरला.
तो तसा पहिल्या पिढीचा उद्योजक. घरी पार्श्वभूमी शिक्षण क्षेत्राची. वडिल मार्तंडराव दाशरथी शिक्षण क्षेत्रात अधिकारी होते. हा मात्र उद्योगाकडे वळला. पहिल्या पिढीचा असल्याने त्याला जी काय मेहनत करावी लागली ती आम्ही टप्प्याटप्प्याने पाहात आलो आहोत. ओळखीत आणि परिवारात दूरदूरपर्यंत उद्योगात कुणी नाही, पर्यायी त्यातली रिस्क, त्यातल्या खाचाखोचा, कामगारांचे प्रश्न यांचं कुठलं ज्ञान नाही, त्यामुळे या क्षेत्रात नव्या माणसाने उभं राहणं तसंं जिकरीचं होतं. तो संघर्षाचा काळ, त्याची सततची धडपड हे दिसायचं, कानावर पडायचं. आपला स्ट्रेस समोरच्याला दिसू नये, त्याचं दडपण कुणावर येवू नये याची उपजतच सवय असल्याने त्याच्या नव्या कामाबद्दल, उचललेल्या धाडसी पावलाबद्दल त्याच्याकडून कळायचं काहीच नाही. नंतर कधीतरी कळायचं; पण बरंच उशीरा. तद्वतच नातलगांचंही. बहुतांशी मध्यमवर्गिय. नव्वदच्या दशकात त्यांचं उद्योग क्षेत्रात प्रमाण कमी होतं. जे होतं ते नोकरी म्हणून. श्रमिक म्हणून. त्यामुळे त्यांच्यासाठीही त्याच्या कामाचा आवाका, त्यातली प्रगती हे कुतूहलाचा विषय होतं. कधीतरी त्याच्या उद्योगाचा नवा विस्तार अचानकच कळायचा आणि ते आणखी वाढायचं. दोन्ही बाजूचे मानसिक आंदोलनं अशा वेळी मजेशीर असतात.
तो जगण्यात एवढा कंपनीमय आहे की, गेल्या कित्येक वर्षात मी कंपनीच्या कपड्यांशिवाय त्याला इतर कपड्यात पाहिलं नाहीयेय. त्याने कंपनीच्या कामानिमित्ताने विदेशात एवढे दौरे केले असतील; पण अभावानेच त्याने तिकडच्या पर्यटनस्थळाला भेट दिली असेल. आता त्याची दुसरी पिढीही उद्योगात आली आहे. मुलगा रोहित रोबोटिक्समध्ये काम करतोय. त्याच्या राघव, सेवक या रोबोटची बरीच चर्चा आहे. त्याच्याबद्दल पुन्हा कधी.......
ऋचा इंजिनियरिंगच्या वाढीसोबतच त्याचं मध्यमवर्गियातून उच्च मध्यमवर्गियात आणि नवश्रीमंतात, श्रीमंतवर्गात जाणं जवळून बघत आलोय मी. या बदलात त्याच्या माणूसपणात तसूभरही फरक पडलेला नाही, अगदी दूरदूरपर्यतचे नातलग, अगदी त्यांच्या तिसर्या पिढीपर्यत त्याने जपले आहेत. छोट्या छोट्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली आहे. तोच जिव्हाळा कंपनीच्या कर्मचार्यांबरोबरही. पंचवीस वर्षापूर्वी त्याच्यासोबत कंपनीत सुरुवातीचे जे कर्मचारी होते, त्यातले बहुतांश अद्यापही त्याच्यासोबतच आहेत.
आजघडीला ऋचा इंजिनियरिंगचे ११ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत, त्यातील सहा औंरंगाबादेत आहेत तर एक युनिट साणंद (अहमदाबाद), एक युनिट पुण्यात तर कर्नाटकातील होसूर आणि म्हैसूर येथेही प्रत्येकी एक युनिट एक आहे. त्यातून बजाज अॉटो, व्होक्सवॅगन, टीव्हीएस मोटर्स आणि टाटा मोटर्सला पुरवठा केला जातो. त्याच्याकडे प्रत्यक्षरित्या कार्यरत कर्मचार्यांची संख्या अंदाजे ५००० असेल. त्याच्या उद्योगाची जवळपास १५०० कोटींची उलाढाल आहे.
उद्योग क्षेत्रातल्या अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आलं आहे. पेंग्विन प्रकाशनाने त्याचं ‘मॅनेजर्स डायरी’ हे उद्योगावरलं एक पुस्तकही प्रकाशीत केलं आहे. अलिकडेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी त्याची निवड झालीये.
कोरोना काळातील संकटात ज्या काही उद्योजकांनी झळ सोसली; पण कामगारांवर वाईट वेळ येवू दिली नाही त्यापैकी हा एक.........
आता अलिकडे कधीतरी कौटुंबिक कारणाने त्याचा फोन येतो, तो तीनतीनदा विचारतो, ‘आहे ना वेळ, बोलू का दोन मिनीट.’ खरं तर आपल्या मनात उत्तर येतंच, ‘वेळ नसायला काय धाड झालीये. इथंच तर पडूनै.’ पण आपण म्हणत नाही. ही मजेची वेळ नसते.
अगदीच नव्याने तो उद्योगात पडला होता, तो आमच्यासाठी रम्य काळ होता. त्याकाळी आम्ही बरीच मजा केली. दिवसभराच्या कामाने तो थकून आलेला असायचा. त्याला कधी कधी करमणूक हवी असायची. मग मी व्हिसीआर आणि एखाद्या विनोदी नाटकाची कॅसेट किरायाने आणायचो. रात्री उशिरापर्यंत मग आम्ही नाटकं बघत बसायचो. तेव्हा बहुतेक नाटकं शेवटपर्यंत मी एकट्यानेच बघितली असावीत, कारण नाटक अर्ध्यावर आलं की दिवसभराच्या थकव्याने त्याचे डोळे झाकायला लागत. परिवारातले आणखी कुणी असेल तर मग नाटकांऐवजी उशिरापर्यंत गप्पांच्या मैफली जमायच्या. नंतर काही दिवसांनी मग हे सगळं थांबलं आणि तो भेटणं दुर्मीळ झालं. तसे राहायला आम्ही एकाच कॉलनीत; पण भेटीत अंतर खूप पडत गेलं. त्याला कारणही तसंच होतं. त्यानं उद्योगात स्वत:ला पूर्णत: झोकून दिलं होतं.
त्याला पूर्वीपासून वाचनाची प्रचंड आवडै. त्याचं स्वत:चं ग्रंथालय आहे. या उद्योगउभारणीच्या काळात त्याने वाचनाला कधी वेळ काढला याचं मला कुतूहलचै; पण ते मी अद्याप शमवलेलं नाहीयेय. कधी तरी विचारेन...........
मधल्या काळात एकदा बब्रूसाठी बी रघुनाथ पुरस्कार मिळाला तेव्हा त्याने संपूर्ण कुटुंबाला पंचतारांकित हॉटेलात पार्टी दिली होती. खरं तर ज्या हॉटेलात जाताना दचकायला व्हायचं, तिथल्या एका हॉलच्या काचेवर आपल्या नावासहित स्वागताचा बोर्ड लागलेला पाहून काय वाटलं असेल ते मीच जाणो. दुसर्या वेळेस असाच त्याने मोठा कौटुंबिक सत्कार घडवून आणला होता. असे आनंदाचे क्षण त्याच्या सहवासाने परिवारातल्या बहुतेकांना दिले आहेत.
मात्र त्याच्या ऋचा इंजिनियरिंगला २५ वर्ष झाल्या निमित्ताने किंवा तो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा वरिष्ठ उपाध्यक्ष झाला त्यानिमित्ताने नातलगांकडून एक कौटुंबिक कार्यक्रम करायचा राहिलाय याची रुखरुख लागून आहे.
माझ्याकडे तसं त्याचं बरंच बाकी आहे. बघू त्याला कधी वेळ मिळतो.

टिप्पण्या