बुढ्ढीयोंके बाल....

दुपार. गल्ली सुनसान. घरी एकटाच. झोप लागून गेलेली. कुजबुजीनं जाग आली. पाहतो तो खाटेच्या पायाशी सातआठ बायाबापड्या. माझ्याकडेच बघत बसलेल्या. मी दचकून उठलो. त्या म्हणाल्या, झोप माय झोप.
........
पावसाळ्याचे दिवस. शाळेभोवती चीकचीक. परतताना केव्हातरी काटा टोचला. काही दिवसात भलं मोठं कुरूप आकाराला आलं. वडिल दौ-यावर. पाय कण्हरला. आंगात ताप भरला. दोन दिवस पावसाची झड थांबली नाही. खाटेवर नुसताच पडून. दार नुसतंच लोटलेलं.
पाऊस उघडला तशी आडावर पाण्यासाठी बायकांची गर्दी. कोणाला तरी केव्हा तरी कण्हण्याचा आवाज आला. त्यांनी घरात डोकावून बगितलं. गोष्ट कानोकान गेली. म्हणता म्हणता गल्लीतल्या बायाबापड्या एकेक करत घरात जमा झाल्या.
एका म्हातारीनं पुढाकार घेतला. माझा पाय हातात धरत तिनं निरखून बघितलं. नंतर प्रत्येकीनंच माना वर करत बसल्या जागेवरनं कुरपावर नजर भिरभिरवली. ‘लेकरू यकलं -हातं माय’ म्हणत एकीनं माझ्या डोक्यावरनं हात फिरवला. कडाकड बोटं मोडले. एक म्हातारी म्हणाली, तरीच दोन दिवसापासनं दार बंद दिसत होतं. दुसरीनं खाल्ल्यापिल्ल्याची चौकशी करत डबा मागवला.
पुढाकार घेतलेल्या म्हातारीनं गल्लीतल्या खेळत्या पोरांना आवाज दिला. दोघांना फाट्यावर पिटाळलं. नंतर बाकीच्या बायकांत आणि तिच्यात खुसूरपुसूर झाली. एकीनं कंगवा घेत, आपल्या केसांवरून फिरवला. दुसरीनेही तेच केलं. कुणी हातानेच वेणी चाचपली आणि काही वेळात काळया पांढऱ्या केसांचा पुंजका जमा झाला. प्रत्येकीनं आपापलं योगदान दिलेलं होतं.
म्हातारीनं खुणावलं तसं तिची प्रौढेली सून मान हलवत उठली. पुंजका घेऊन लगबगीनं निघून गेली. तोपर्यंत दुसरीनं कुरुपाचं रिंगण पुसून घेतलं. ठासून भरलेला बार त्याचं तोंड दाबून बाहेर काढला. पायाला भयानक ठणक लागली. मी ओठ आवळून घेतले. बायकांच्याच तोंडून स्सऽ निघत राहिलं.
पिटाळून पाठवलेले पोरं वीसेक मिनिटांत धापा टाकत आले. नागिलीच्या पानाचं पुडकं म्हातारीच्या समोर फेकत त्यांनी दारातूनच धूम ठोकली. बाहेर गेलेली म्हातारीची प्रौढेली सूनही तेवढ्यात परतली. तिच्या हातात कढई होती आणि कढईत तळलेले केस. त्याच्या विचित्र उग्र वासानं घराचा ताबा घेतला.
म्हातारी मग खाटेवर आडवी बसली आणि तिनं दुखरा पाय आपल्या मांडीवर घेतला. पदरानं पुन्हा पुसला. दुस-या एका म्हातारीनं नागिलीची पानं नीट पुसून घेतली आणि त्याचे देठं खुडत ती एकाशी एक जोडली. म्हातारीच्या सुनेनं, तळलेल्या केसांचा पुंजका कढईतून अलगद काढला आणि नागिलीच्या पानावर सारणासारखा अंथरला. त्याला पलटी मारत तो सारा मसाला कुरुपाच्या तोंडाशी बांधला.
कुरपाचा आख्खा परिसर त्या हिरव्या पानांनी बहरून गेला. मधातच पानगळ होऊ नये म्हणून म्हातारीनं त्याला धुडकं गुंडाळलं आणि पायाला खाटेवर आल्लाद निजवलं. पायात ठणक तर होतीच; पण केसांचा ओंगळस्पर्श आणि पानांचे थंड सुस्कारे यानं शरीरभर विचित्र लहर दौडत गेली. माझं लक्ष बायांवरून पायाकडं जात राहिलं. धुडक्याच्या आवरणाखाली चाललेलं पानांचं चाभरेपण आणि केसांच्या गुदगुल्या यांच्या खेळात मी पुरता गुंगून गेलो. हळूहळू डोळेही मिटू लागले. बयाबापड्या ब-याच वेळ बसून राहिल्या. दरम्यान कधीतरी मला झोप लागून गेली.

टिप्पण्या