ते आणि त्यांचा ‘ण’!

या सद्गृहस्थांची आणि माझी प्रत्यक्ष ओळख तशी अलीकडची. ते उस्मानाबादचे. गेल्या तीन वर्षात आमच्या ब-याच भेटीगाठी झाल्या. निरनिराळ््या विषयांवर गप्पा झाल्या. मात्र काही दिवसांपूर्वी सहज गप्पात मी त्यांना उस्मानाबादेत पूर्वी असलेल्या एका पुरस्काराविषयी विचारले. पन्नास बावन्नच्या काळात तेथे विद्यार्थीप्रिय असलेले शिक्षक किशनराव शेकदार यांच्या नावाने नंतरच्या काळात एक पुरस्कार दिला जात होता. त्यांच्या विद्यार्थ्यांनेच तो सुरू केल्याची बातमी मी फार पूर्वी मराठवाडा दैनिकात बघितली होती.

किशनराव शेकदारांचे नाव काढताच ते गृहस्थ भरभरून बोलू लागले. ते नेमके शेकदारांचे विद्यार्थी निघाले आणि त्यांच्याच पुढाकाराने तो पुरस्कार सुरू झाला होता. किशनराव शेकदार मूळचे करकम्ब, ता. पंढरपूर. जि. सोलापूरचे. ते उस्मानाबादेत पेठ शाळेत मुख्याध्यापक होते. शेकदारगुरुजींचे एक मित्र होते, त्यांचे नाव हजरत वरुडे मास्तर. या दोघांच्याही नावाने वेगवेगळा पुरस्कार ठेवण्यात आला होता. भुजंगराव नलावडे शिक्षणाधिकारी असेपर्यंत तो पुरस्कार सुरू होता. वगैर माहिती त्यांनी दिली.

शेकदारगुरुजींच्या डोक्यावर मुंडासे असे. ते कडक शिस्तीचे होते. त्यांचा उच्चारात कर्नाटकी हेल होता. त्यांचे आमच्या घरी येणेजाणे होते, वडिलांशी त्यांची मैत्री होती, वगैरे माहिती देतादेताच त्यांनी त्यांच्या शिकवण्याची एक आठवणही सांगितली. विद्यार्थ्यांच्या ‘ण’ आणि ‘न’ च्या उच्चारावर शेकदारगुरुजींचे बारीक लक्ष असे. विद्यार्थ्यांची हनुवटी धरून ते दोन्हीतला फरक शिकवीत आणि तो घोकून घेत. त्यामुळे त्या काळातल्या आम्हा विद्यार्थ्यांचा ‘ण’ आजही कसा खणखणीत आहे हे त्यांनी अभिमानाने सांगितलं. त्यांच्या उच्चारात तो मोठा ‘ण’ जाणवतही होताच.

खरं तर मराठवाड्यात ‘न’ आणि ‘ण’ ची भानगड आहेच. मराठवाड्यावर निजामाचं राज्य होतं. इथे उर्दूचा प्रभाव होता. उर्दूत ‘ण’ नसल्याने मराठवाड्यातही ‘ण’ नाही असाही तर्क कोणीकोणी मांडत असत. आम्ही तर गमतीने म्हणतो की, तुम्ही कितीही शुद्ध ‘ण’ उच्चारा, तो आमच्या कानात शिरण्यापूर्वी त्याचा हवेतच ‘न’ होतो. ही आताची गोष्ट झाली; पण त्या काळात शेकदार गुरुजींची ‘ण’ वरची मेहनत ऐकून मलाही अभिमान वाटला.

सगळं बोलून झाल्यावर त्यांनी मला विचारले की, तुम्ही किशनराव शेकदारांना कसे ओळखता? मी म्हटलं, ते माझे आजोबा. आईचे वडिल. त्यांना धक्का बसला. ते डोळे विस्फारून माझ्याकडे बघू लागले. मी म्हणालो, तुमच्यापेक्षा अधिक धक्का मला बसलाय. माझी आई ऐंशीत आहे. तिचेच विद्यार्थी आता आजोबा वगैरे झालेत आणि एवढा मोठा काळ उलटून गेल्यानंतर तिच्या वडलांचा विद्यार्थी मला जेष्ठ मित्राच्या रुपात भेटावा यापेक्षा वेगळे भाग्य कोणते?
....
मूळ गोष्ट अशी की, माझी जीभ कधीच ‘ण’ उच्चारायला धजावत नाही. ती मराठवाड्याशी एकनिष्ठ आहे. ती वळतच नाही. तिला प्रमाण भाषेचे चोचले मानवत नाहीत. जास्तच बळजोरी केली तर जो आहे तो ‘न’ही धास्तावतो आणि मग ‘न’ आणि ‘ण’ च्या मधलंच काहीतरी बि-हाड तोंडातून बाहेर येतं.

आता जेव्हा केव्हा आमच्या गप्पा होतात, तेव्हा त्या सद्गृहस्थांच्या तोंडून येणारा प्रत्येक ण मला अस्वस्थ करतो. हा आपल्या आजोळचा ण असल्याची आणि त्यावर आपला पहिला हक्क असल्याची जाणीव होते. एवढा सहजासहजी तो आपल्याकडून कसा सुटला याची खंतही वाटत राहते. असो.

ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्रगडकरांच्या निमित्ताने मला आजोबांचा ‘ण’ भेटला. त्या ‘ण’ ला मन:पूर्वक ‘नमन’!
......

(update)

आजोबांचा 'ण' आईला भेटतो तेंव्हा....

१२ मे २०१९ रोजी मातृदिनी ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्रगडकर त्यांच्या पत्नीसह आईला भेटायला आले आणि गप्पांची सुरेख मैफल जमली. गजेंद्रगडकरांकडून आपल्या वडलांबद्दल ऐकताना आईच्या चेह-यावर एक दुडूदुडू धावणारी मुलगी दिसायला लागली. एरवीची ऐकायला कमी येण्याची तक्रार कोसो दूर पळून गेली. एकूण सारं भारावून टाकणारं वातावरण.

टिप्पण्या