उंदीर आणि लिंबाचं झाड

आईवडिल गावाकडून आले. बॅग ठेवताच वडिल म्हणाले, मी पहिल्यांदा आंघोळ करून घेतो. बसमध्ये फारच घाणेरडा वास होता. जाता जात नाहीये अजून.
आई म्हणाली, मळीचा वास असाच पाठलाग करत असतो. रस्त्यात साखर कारखाना लागतो ना.
वडलांचं म्हणणं पडलं की, तो वास मळीचा नव्हता. दुसराच सडका कसला तरी होता. बस धूतही नाहीत एस्टीवाले.
वास नेमका कशाचा होता यावरनं दोघांचं लुटूपुटूचं भांडण झालं आणि वडिल आंघोळीला निघून गेले. तसं लगबगीनं आई उठली आणि जिन्याकडे गेली. मीही तिच्या मागोमाग गेलो. जिन्याखालची प्लॅस्टिकची पिशवी माझ्या हातात देत ती म्हणाली, कुठं लावलं आहेस लिंबाचं झाड? मी तिला मागच्या बाजूला घेवून गेलो.
लिंबाच्या झाडाशेजारी तिने मला माती उकरायला सांगितली. मी उकरली. मग तिने त्या प्लॅस्टिकच्या पिशवीचं रबर काढलं. आत आणखी एक पिशवी, त्यात आणखी एक पिशवी. चारेक पिशव्या एकात एक होत्या. एकेक पिशवी वेगळी करताना उग्र घाणेरडा वास सुटला. तो वाढत जावू लागला. सरतेशेवटी ती म्हणाली, पिशवी बुंध्याशी मोकळी कर आणि माती लोटून दे. मी कसंबसं श्वास रोखून धरला आणि पिशवी उपडी केली तर त्यात मेलेला उंदीर. मी लगेच माती लोटून घेतली.
ती म्हणाली, तुझ्या लिंबाच्या झाडाला वाढ नाही असं मागच्या वेळी म्हणाला होतास ना? म्हणून त्याच्यासाठी आणलंय. इकडं यायचं ठरलं आणि दोनच दिवस आधी हा मरून पडलेला दिसला. आनेशा सापडलाच तर घातला त्याला पिशवीत. तिथं गावाकडं भरपूर असतात. इकडं शहरात कुठं मिळणार तुला? लिंबाच्या झाडाला मेलेल्या उंदराचं खत चांगलं असतं असं म्हणतात.
आमचं काम होईपर्यंंत वडिल आंघोळीहून आले. त्यांच्या नाकात बसलेला तो वास आता गेला होता. मी हसून तिच्याकडे बघितलं. तीही नुसतीच हसली. मग मी वडिलांना म्हटलं, गावाकडून येताना आजी नातवांसाठी कायकाय बांधून आणत असते, पोरांसाठी आणते. हिने तर झाडांसाठीही खायला आणलंय. त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. मी काही बोलणार तर तिनं डोळ्यानंच दटावलं.
ती एस्टी बस, बसमध्ये नाकाला रुमाल लावून अस्वस्थ बसलेले वडील, शीटच्या खालच्या बाजूला दडपून ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी, तिचं एक टोक आंगठ्यानं आल्लाद दाबून धरलेली आणि नाकं मुरडणा-या इतर प्रवाशांकडे काव-या नजरेनं बघणारी आई हे चित्र मला डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागलं.
.....
तर पुढची गोष्ट अशी की, नंतर काही दिवसांनी लिंब फोफावला. त्याला पांढरी फुलं दिसू लागली. नंतर छोटी छोटी लिंबंही लागली. ती मोठी होऊ लागली. तस तशी नजरेच्या टप्प्यात येऊ लागली. गावाकडं आईने लावलेल्या झाडाला तीनेकशे लिंबं निघत होती. आता याही झाडाला तशीच लागू लागली म्हणून मी खुश होतो. जवळपास प्रत्येक फांदी लिंबांनी लदबदून गेली होती. ती पिवळसर व्हावी म्हणून आम्ही वाट पाहू लागलो तर लिंबाची वाढ थांबेचना. वाढत वाढत ते चांगलं संत्र्याएवढं होऊ लागलं. त्यांच्या ओझ्यानं झाड अक्षरश: झुकून गेलं. नंतर पिवळसर झाक आलेलं एक फळ चिरून पाहिलं तर आंबटढ्याण; बेट्याचं ते निघालं इडलिंबू. नर्सरीवाल्याने लिंबाचं म्हणून मला इडलिंबूचं झाड चेपून दिलं होतं.
इडलिंबू तर इडलिंबू. त्याचंही कौतुक होतंच. हौशेनं ते भरपूर वाटून झाले. नातेवाईक, मित्र अगदी भाजीवाल्यालाही देऊन झाले. ज्यांना दिले त्यांचा नंतर फोन यायचा, याचं काय करायचं? त्याची रेसिपी काय? मग कुणाकुणाच्या सांगण्यावरनं त्याचं लोणचं केलं. इतरांनाही सांगितलं. काही लिंबांचं सरबत केलं; पण त्याला खंडीभर साखर लागायची. त्याचा रस बाटल्यात साचून ठेवावं म्हटलं तर एकदीड लिंबाच्या रसात आख्खी बाटली भरून जायची. एवढ्या बाटल्या भरून करायचं काय? आता ह्या इडलिंबांचं करायचं काय? हा प्रश्न होता.
किडनीस्टोनसाठी इडलिंबू हा जालीम उपाय असल्याचं असंच मग एकेदिवशी कळालं. मग काय, ओळखीपाळखीचे, मित्रातले, त्यांच्या नात्यातले असे कुणी किडनीस्टोनने बेजार आहे काय याची चौकशी सुरू केली. काहींना डॉक्टरांनी त्याचा सल्लाही दिला होता; पण ते बाजारात मिळत नव्हतं. माझ्याकडे आहे म्हटल्यावर तर त्यांना भरून यायचं. अर्थात मलाही. एखाद्याला किडनीस्टोन आहे म्हटलं की, कोण आनंद व्हायचा तेव्हा!
.....
असो. त्या काळात फेसबुकवर आवक-जावक असती तर कितीतरी लिंबं ‘व्हर्चुअलि’ का होईना संपून गेली असती; पण आता ते झाड नाहीये. कृपया इडलिंबूची चौकशी करू नये!
(आईला भेटायला एकदा मुक्ता बर्वे आली तेव्हा सलीलने टिपलेले छायाचित्र. या लिंबाचं लोणचं फार चांगलं असतं वगैरे सांगत तिच्याही बॅगमध्ये मी चार लिंबं कोंबली होती.)
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा