हक्काचं स्मशान आणि पांडबाचा आंबा!

मध्यंतरी गावाकडून मित्राचा फोन आला, पांडबाच्या आंब्याखालची माती कोणीतरी उकरतेय म्हणून. ती माती विटभट्टीसाठी नेली जात होती. मित्र पुढे म्हणाला, माती फारच चांगलीये. तुमच्या स्मशानातली आहे. लक्ष दे!
पांडबाचा आंबा. त्याला आम्ही केळ्या म्हणायचो. त्याचं फळ लंबुळकं म्हणून तो केळ्या. केळ्या लागायचा चांगला; पण दिसायला भेसूर. भूतबंगल्यातल्या झाडासारखा. त्याच्या फांद्या काळ्याठीक्कर, खपल्या निघालेल्या होत्या.
कित्येक वर्षांपासून एखादा पुराणपुरूष उभा आहे आणि सा-या परिसरावर त्याची करडी नजर आहे असा काहीसा भास त्याच्याकडे बघतांना व्हायचा. पाचपंधरा भूतांचं निवासस्थान त्याच्यावर असेल काय असं वाटायचं. पूर्वी त्याच्या आजूबाजूची जमीन आमची होती म्हणे! त्या केळ्याच्याच शेजारी स्मशानभूमी होती.
मी गावी राहायला आलो तेव्हा सहावीत होतो. नव्या शाळेत मित्र मिळत गेले. त्यापैकी ब-याच जणांची शेतं पूर्णेच्या काठावर होती. गावची पांदी थेट नदीपर्यंत जायची. नदी ओलांडून पुढे रस्ता जात होता. तिथेच नदीचं नागमोडी वळण होतं. त्या वळणावर डाव्या बाजूला तो स्मशानाचा तुकडा होता.
नदीला भरपूर पाणी होतं. त्या प्रवाहातून चालत चालत आम्ही मित्राच्या शेतात गेलो. तिथून काठाकाठाने केळ्याकडे. ते माझं केळ्याचं पहिलं दर्शन. त्याची भली मोठी उंची, आक्राळ विक्राळ फांद्यांनी अंगावर काटाच आला. त्याला डहाळ्याही कमी होत्या. भरलापुरला वाडा अचानक ओस पडल्यावर उरलेला म्हातारा जसा उग्र दिसायला लागतो तसाच वाटला तेव्हा.
केळ्याला फळ कमी होतं. अढी घालावी एवढा आंबा त्याला कधीच आला नाही. एखादी दुसरी कैरी उगाच आणून देवळीत ठेवून द्यायची. पूर्वजाचा फोटो ठेवल्यागत. बस्स! केळ्या खोडापासून उंच होता. त्यावर चढायला सहसा कोणी धजावायचं नाही. मी पाहिलं तेव्हा त्यावर वानरांची टोळी बसलेली होती. तिथून त्यांना कोणी हुसकावत नसावं. त्यांची बहुतांशी मुक्कामाची जागा तिच असल्याचं मला नंतर कळालं.
त्याच दिवशी केळ्याकडं पाहता पाहता मला मित्रापैकी कोणीतरी सांगितलं, ही तुमची स्मशानभूमी आहे. मी भांबावून बघितलं. तिथं नदीकडेच्या उतरत्या भागात राख पसरलेली होती. तिचा आंबूस वास येत होता. बाजूला झाडाझुडपांची गर्द जाळी होती. चाळीसेक वर्षापूर्वी कोणातरी पूर्वजाला तिथं अग्नी देण्यात आला होता. माझ्या अंगावर दरदरून घाम आला. मला ती राख तेव्हाचीच असल्यासारखं वाटलं. गेल्या कित्येक वर्षात तिथं पत्रिका ठेवण्याची प्रथा होती.
कोणाकडेही मंगलकार्य निघालं की, पूर्वजांना पत्रिका देण्याची तेव्हा पद्धत होती. पत्रिका वाटायला सुरुवात करण्यापूर्वी आधी देवापुढे एक पत्रिका ठेवली जायची आणि दुसरी या केळ्याखाली, पूर्वजांसाठी. नंतरच उर्वरित पत्रिका वाटल्या जायच्या.
......
मित्राचं म्हणणं असं होतं की, आमच्या मालकीची माती आहे तर मग मीच तिथं विटाची भट्टी का टाकू नये? वाटल्यास त्या विटांत घराच्या दोन खोल्या वाढवता येतील. जळणाचा प्रश्नच नाही. केळ्या आहेच. चारेक भट्ट्या सहज चालू शकतील एवढा लाकूडफाटा आहे त्याचा.
पुढे खूप दिवस मित्राशी काहीच संपर्क झाला नाही; पण डोक्यात फारच विचित्र गुंतागुंत झाली. उगाच दरदरून घाम यायचा. फारच कसंतरी वाटू लागायचं; पण नेमकं काय वाटतंय ते कळायचं नाही. आपलं स्मशान, तिथली हक्काची माती, पूर्वजांनी तिथे लावलेलं आंब्याचं झाड. त्याच पूर्वजांना कधी काळी तिथे दिलेला अग्नी, त्या मातीच्या आपण विटा पाडायच्या, त्यासाठी त्यांनीच लावलेल्या झाडाचा लाकूडफाटा वापरायचा. दोन खोल्या वाढवायच्या..... विचारानं मेंदुचा भुगा व्हायचा.
आपल्याला नसेल शेती; पण हक्काचं स्मशान आहे गावात अजून.
तो केळ्या आता राहिला नसल्याचं परवा गावाकडं कळालं. कित्येक वर्ष त्यानं त्या स्मशानावर सावली धरली होती. त्याच आंबूस राखेत, तिथल्या मातीत तो पूर्वजांशेजारी विसावला. शाळेत असताना आम्ही सुरपारंबी खेळायचो. एकदा केळ्यावर खेळुयात म्हणून कोणीतरी तेव्हा टूम काढली होती. ती सपशेल फसली होती. केळ्यानं कुणालाच आपल्या अंगाखांद्यावर चढू दिलं नाही. खेळू दिलं नाही. स्मशान झाडांना वैराग्य आणतं का कायकी!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा