नदीकाठ
झुळझुळ वाहणारी नदी, तिच्या काठावर एखादं मंदीर, दूरवरून दिसणारा त्याचा कळस. पाठ्यपुस्तकांनी काय काय रम्य चित्र डोक्यात घातलेलं असतं आपल्या.
बेट्याचं, एक तर आपल्याकडे नद्यांना पाणी नाही. पावसाळ्यात त्या कशाबशा डबक्याडुबक्यातून वाहू पाहतात. कुठंमूठं झुडपांनी डोकं वर काढलेलं असतं. बसच्या खिडकीतून आपण डोकावतो. नेमकं तेव्हाच काठावरच्या शेडमध्ये ढणढण चिता पेटलेली असते. बस्स!
सगळ्या स्मशानशेड रस्त्याच्या कडेला, पुलाशेजारीच का असतात? जेव्हा केव्हा खिडकीतून बघावं तेव्हा त्या शेड उठून का दिसतात?
...
अंधार पडायला लागलेला असतो, जरासा पाऊस पडून गेलेला असतो. आपली बस जात असते. पूल येतो. तिथला कार्यक्रम संपून गेलेला असतो. माणसांची पांगापांग झालेली असते. एक, इवलिशी धग आपला ठेका टिकवून असते. त्या धगीच्या अंधूक प्रकाशात आपल्याला किंचितशी हालचाल जाणवते. जणू, तो अंतयात्रेकरू अलगद उठून पाय-यांवर पाण्यात पाय सोडून बसलाय. त्याचं सारं लक्ष पैलतिराकडे लागलेलं आहे...पैलतीर अंधारात बुडून गेलाय...
आपली बस खडाडाक खडाडाक करत पुलावर उचक्या देत असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा