धुराच्या पडद्यावर कावळ्याच्या घिरट्या

आदमी इतना भी केअरिंग ना हो, कि उसकी बेअरिंग ही टूट जाये...

सुन भाई...
भाई सुन,
राजूभाईकी बात सुन...
कल मुझे एक बुरा सपना आया...
बडेभाई का फोन था, कल तेरा डिस्चार्ज होरा बोलके.
दुसरे दिन तेराही फोन. मैने पूछा, ‘क्या रे आया क्या घरपें? अब बडा पार्टी करेंगे.’ और कुछ ऐसाही बकते गया मैं. उधरसे तू टोटल सायलेंट. आवाजही नहीं. स्साला, नेटवर्कका हमेशासे ऐसाही रोना है. मैने फिरसे फोन लगाया तो, बडेने उठाया. तेरा नाम लेकर बोला, ‘नो मोअर’ बोलके. बस्स! तुझ्याच फोनवर तू नसल्याची बातमी ऐकली मी भाई. तापलेली सळई घुसली कानात आरपार.
भाई, खरंच भयानक होतं स्वप्न. जाग आल्यावर तुला सांगायचं नक्की केलं होतं मी. तू हसला असतास बेफाम. ‘राजूभाई, कभीकभार अच्छे भी सपने देखते जाव’ म्हणून हैदराबादी हिंदीत काय काय बोलत राहिला असतास पुढे. मी ऐकत राहिलो असतो, कितीतरी वेळ. पण म्हटलं, स्वप्नं तर पूर्ण होऊ द्या. बुरा तो बुरा, उसको अधूरा कैसे छोडते भाई?
भाई हुआ ऐसे की, तू घर जाने की खुशी में. पँट घालून बेल्ट लावायची तुझी गडबड चालू. बाहर बडाभाई डिस्चार्ज पेपर लेकर खडा. तीनेक आठवड्याच्या तपासण्याचा तुला प्रचंड उबग आलेला. दवाखान्याचा स्टाफ मात्र तुझ्या मिश्किलीवर फिदा. बरं एवढ्या तपासण्या होऊन डॉक्टर म्हणाले, काळजीचं कारण नाही. औषधाने आराम पडेल. बस्स, फिर क्या था. भाई, या प्रसंगावर फार कहाण्या रचल्या असत्या आपण. भली टिंगल टवाळी केली असती. किमान पाचदहा कौटुंबिक मैफली रंगवल्या असत्या... पण भाई, तू बाहेरच आला नाहीस. बडा बाहर तेरी राह देखता रहा, तू अंदरसेही निकल पडा.
......
सुन भाई. तेरा नया क्वार्टर बहुत बढिया था. आपला गप्पांचा अड्डा कुठं जमवायचा, त्या सा-या जागा हेरून ठेवल्या होत्या मी रात्री. जेव्हा केव्हा आपण भेटायचो आणि कुठल्या तरी कट्ट्यावर रात्र जागवायचो तेव्हा पोलिसमामा काठ्या आपटून हुसकावून लावायचा. इथं तर काय आपलंच राज्य. कहीं भी बैठो, कितना भी बैठो. बसायलाही किती जागा. भाई, मैने कुछ जगहें तय की थी. त्या प्रचंड मोठ्या गेटमधून आत आल्यावर डाव्या बाजूला झाडांत एक लोखंडी बेंच लपलेलाय. मस्त जागाय भाई ती. त्याच लाईनीत पुढे एक बाकडं आहे. इमारतींच्या जंजाळातून येणारे- जाणारे चेहरे तिथून स्पष्ट दिसले असते. अजून एक छान जागा सापडली होती भाई मला. पसरट आंब्याचा कट्टा. दोन इमारतींच्या मधोमध. भाई, सबसे बढिया जगह है यह. बैठो, लेटो, फिर बैठो, फिर लेटो. तिथं बसून काही वेळ गप्पाही हाणल्या मी मनोमन तुझ्याशी. भाई, तू कोणत्या जागा नक्की केल्या होत्यास?
भाई, रात में हम सब भाई लोग जरा घूमने बाहर आये. बाहर बडा पान शॉप था. तेरी बहुत याद आयी. जहाँ कहीं भी हम सब इकठ्ठे होते थे वहाँ पान खाने निकलते थे. आज कैसे खाते पान, तूही नहीं था. कहीं शवागार में सोया पडा था. तेरे घर हम आये है, और तू दूर कहींपर. जैसे हमेशा की तरह कुछ काम में अटका हो. सकाळी स्वप्न तुटल्यावर तुला चांगलाच हासडून काढणार होतो मी. ‘सपने में तो जरा सीधा रहो भाई. जरा बडे भाई की इज्जत करना सीखो.’
भाई, सवेरे दस साडेदस बजे तेरी गाडी आनेवाली थी. सब तयार हो बैठै थे. बस्स, तेरा इंतजार था. बडे भाई लोग बोले, ‘उसे लेने जाना है, चलता है या यहीं पर रुकता है?’ मैंने हमेशा की तरह सोचा, सबके सब गये तो तेरे लिए सरप्राईज क्या रहेगा? मी थांबून राहिलो. तुला भेटायला कोणी कोणी येवून थांबत होते. त्यांच्यातच दडून गेलो मग मी.
भाई, जहाँ हम अड्डा जमानेवाले थे, रातभर दुनियाभरकी बाते करनेवाले थे वहीं तेरी गाडी रुकी थी. ना यह अपना गाव था, ना अपना घर. बस त्याच आंब्याच्या झाडाखाली तुझी भेट झाली. आकाशाकडे झेपावणा-या इमारती आणि उंचच उंच झाडं. त्यांच्या सावलीत जमिनीवर तू. पांढ-या कापडात पहुडलेला. भाई, एखाद्या पडक्या विहिरीत खोल खोल जात असल्याचा भास होत राहिला. मैंने सोचा, अब सपना टूटना ही अच्छा रहेगा. कमीना जादा से जादा डरावना बनता जा रहा था. फिर सोचा, रहने दो. और कहाँ तक जायेगा? सपना तो है कभी ना कभी टूटही जायेगा.
भाई, वहाँ लोग बहुत थे. यहाँ वहाँ घूम रहे थे. सब की अपनी अपनी चॉईस थी. कोणी भडाग्नीच्या वेटिंगमध्ये, कोणी आपल्यासारखंच विद्युत दाहिनीच्या रांगेत. कोणी म्हणालं, गॅसवाल्याकडं गर्दी कमी आहे. ‘भाई, इथेही लाईन? क्या दिन आये है राजूभाई’ असं म्हणून तू दीर्घ सुस्कारा सोडला असतास. पंडित किसी के लिए मंत्र पढ रहा था. तू लेटा हुआ सुन रहा था, हम नंबर लगने की राह में खडे थे. जैसे कुछ साल पहले सिलेंडर की क्यू में खडे रहते थे. नंबर आगे गया, सिलेंडर उठा के आगे रखा.
पहलेवाले का काम चल रहा था. लोग आ जा रहें थे. दूसरा नंबर तेरा. बराच वेळ तुझ्याकडे बघत राहिलो मग मी. भाई, हमसून हमसून यायला लागलं आतून. कितीतरी वेळ. चाळीस-पंचेचाळीस वर्षांतलं काहीबाही आठवत राहिलं. बचपन की बाते थी. असंच भटकता भटकता आपल्याला मोठं स्मशान लागलं होतं. भर गावात. उंच तटबंदी होती त्याला. मैने पूछा, ‘भाई अंदर क्या है?’ तू म्हणालास, ‘राजूभाई, एक आयडिया अच्छा है, हम अपना प्रायव्हेट शमशान निकालते है... यह धंदा तो बंद होनेवाला नहीं है.’ खूप हसत राहिलो मग आपण. काय काय कल्पना लढवत राहिलो. घरीही सांगितला विनोद तर त्या बाजूला कशाला गेलात म्हणून शिव्या खाल्ल्या आपण. भाई, त्या कल्पनेत तू नव्हतास गि-हाईक.
असंच आठवत राहिलं. फिर मैने सोचा, तू कैसा रिअॅक्ट होता ऐसे टाईम पर? अगर जहाँ तू लेटा है, वहाँ मै रहता और मेरी जगह तू. तो? मी प्रतिक्रियेसाठी बघत राहिलो तुझ्याकडे. आणि तू चक्क निघूनच गेलास तिथून. दिसेचनास मला. माझ्या डोक्यातलं वादळ तुझ्यात कसं शिरलं? मग वर टांगलेला बोर्ड वाचत राहिलो. आत्मा वगैरे बरंच काही होतं त्यात. भाई, अंत्यविधी ऑनलाईन पाहण्याचा बोर्डही होता तिथे. हममेंसे किसीने ट्राय भी किया. इथलीच गोष्ट इथेच बसून स्क्रीनवर कशी दिसत असेल? भाई, नंबर लागेपर्यत इतरांनी करायचं तरी काय? बाकड्याखाली दोन कुत्रे शुद्ध हरपून पडून होते. एवढ्या गदारोळात कुत्र्यांना एवढी मरणाची झोप लागते? भाई, पक्ष्यांच्या आवाजाचं एरवी भारी कौतुक असतं आपल्याला; पण काय बेकार फडफडतात ते. किती भेसूर आवाज असतो त्यांचा. त्यात चिमण्या तर अखंड धूर फेकणा-या. धुराच्या पडद्यावर कावळ्याच्या घिरट्या.
भाई, मग माझ्यातून काढून टाकलं मी तुला. म्हटलं, भूल जाओ अब. जानेवाला जाता है. तर तेवढ्यात तू पुन्हा हजर! जागेवर लेटलेला. तुझ्या सणसणीत उंचीसमोर तिरडी खुजी होती भाई. तुझे पाय बाहेर आलेले. एरवीही तुला कधी चादर पुरायचीच नाही. भाई, काय दिसत होते तुझे लांबरुंद तळपाय, नितळ. एकही भेग नाही. दोन्ही अंगठे अलगद बांधलेले. येणा-या जाणा-याचं लक्ष तिथंच घुटमळायचं भाई. त्याकडं बघताना सारखं वाटत राहिलं, ह्या पायांनी आता जराशी हालचाल करायला पाहिजे. तू ताबडतोब काहीतरी पाऊल उचललं पाहिजेस, जगू शकत असल्याचा पुरावा दिला पाहिजेस. पंधरा वीस मिनिटेच तुझ्या हातात होती. एकदा का तुला पलीकडे नेलं की मग देवाच्या हातातही काही राहणार नव्हतं. मनातल्या मनात घाई करत राहिलो तुला. भाई, पाय हलव. भाई, पाय हलव. भाई, पाय हलव. की गुदगुल्या करू पायाला? चारचौघांत बरं दिसलं असतं का ते? तू शांत, तुला बिलकुलच घाई नाही. मिरॅकलच्या खूप गोष्टी वाचल्या भाई आपण. तू हलवला असतास पाय जरा नेटानं, तर झाला असता की अजून एक चमत्कार भाई.
भाई, प्लीज एक क्लिक. तुझ्या पायाचा एक फोटो पाहिजे होता मला. तीव्रतेने वाटायला लागलं होतं. एक घ्यावाच फोटो या पायांचा, फार पायपीट केलीये ह्यांनी. फोटो तो बनता है ना यार. नाही घेतला भाई. सगळेच सगळ्याकडे बघत होते आणि कुणीच कुणाकडे बघत नव्हते. पाचपन्नास डोळे शून्य होऊन ज्याच्या त्याच्या खोबण्यात बसलेले. भाई, काही वेळासाठी अचानकच सगळे आवाज बंद झाले आणि त्या स्मशानशांततेला चिरत एक आवाज आमच्या दिशेने आला, ‘चला, कुलकर्णीला घ्या ...’
भाई, थरकाप उडाला एकदम. प्रचंड संताप आला त्या आवाजाचा. अरे, पांढ-या कपड्यात गुंडाळलेला माणूस काय आरोपी असतो? एवढं उद्धटपणे बोलवतात, शेवटच्या रांगेतल्या माणसाला? अरे, तो कालपर्यंत आपल्यासारखा चालता बोलता होता, उसकी रिस्पेक्ट करना सिखो जरा. फिर तेरी तरफ देखा मैंने. तू बोला, ‘राजूभाई, हलके में लो.’ मी म्हटलं, ‘ठीकय. तू म्हणतोयस म्हणून गप्प बसतो.’ तो फिरसे तू हंसके बोला, ‘वैसे भी तुम क्या करनेवाले थे, राजूभाई?’‘भाई, ऐेसे माहोल में मजाक करते है?’ भाई, जैसे जैसे समय निकलता है, वैसे वैसे आदमी पत्थर बनता जाता है. बस्स, अपनी छोड दूसरों की बॉडी देखते फिरता है. एक बात पक्की है भाई, वहाँ जितने भी थे, सबसे यंग और बढिया तूही था! क्या यह गुरूर की बात है?
बडेपर तुझे बहुत भरोसा था. ‘किस मिट्टी का बना हुआ है की, बहुत पागल है’ बोलता था तू. भाई, उसकी ताकद देखने जैसे थी. पहाड बन के खडा था. मानो कुछ हुआ ही नहीं. तुझा देह ठेवलेला होता. पंडित मंत्र पढ रहा था. भाईसाब चुपचाप पंडित के हिसाबसे चल रहे थे. सारं यंत्रवत. काय करतो आहोत आणि कशासाठी आलो आहोत याचा जणू विसर पडलेला. क्षणभर वाटलं, आता हा नेहमीसारखा आपल्यावर डाफरतो का कायकी. ‘अरे, बेवकूफ की तरह क्या खडे हो, जरा हात बटाओ!’ भाई, उठला असतास त्याच्या नेहमीच्या आवाजाने? तेरे लिए रातदिन एक किये थे उसने. मैं होता तो उठता भाई. क्या तू भी उठता?
तुझे छोड कर हम जब निकले, तो और दो नंबर बढ गये थे, भाई. हम देखते गये. एकासोबत तीन बायका आणि दोन माणसं. एकाच्या खांद्यावर डोकं ठेवून एक बाई हुंदके देतेय. तो तिला थापटतोय. दुसरी बाई त्या देहावर शाल पांघरतेय. एकदा खाली ओढतेय, एकदा वर सरकावतेय. तिच्यात दाटून आलेला हुंदका शालीच्या आतबाहेर हिंदकळतोय. त्यातल्या एका माणसाच्या हातात कागदपत्रांची फाईल. त्याने ती बगलेत पकडलीय. उसके पीछे, जरा बाहर अॅम्ब्युलन्स खडी थी. तिथे तीन जण. रडणारा एक चेहरा आटून कोरडा झालेला. बाकी दोघे तटस्थ उभे. बस्स. भाई नाटकाचा प्रवेशच वाटत गेला तो. नंतर तर सारे चेहरे सारखेच वाटू लागले. ठरवून दिलेला, पाठ करून घेतलेला, घोकून काढलेला एकएक प्रसंग साजरा करत चाललेले. भाई, माणूस मरण्यापेक्षा माणसाची नजर मरणं फार वाईट. कमालीचा निगरगट्ट बनत जातो माणूस.
भाई, सबेरे निकलते समय देखा था तेरा जूता घर पर. शू स्टँड पे तयार खडा था पॉलिश बिलीश लगा कर. फुल रेडी था. तू पाय घालायचा उशीर की निघाला पठ्ठ्या बाहेर. वहीं थोडी दूर मेज पर एक टी शर्ट पडा था, जो पिछली बार तूने मुझे ऑफर किया था. ऐसा बहुत कुछ बिखरा पडा था. उसमें तेरी एक फोटो भी थी, बढिया. भाई, तेरे सब भगवान अंदर चौरंगपर चांदी के फूलों में बैठे थे. बाजूच्या रॅकमध्ये त्यांची वस्त्रं, भांडे. तिथंच डब्या डब्यांत त्यांच्यासाठीचं कॉस्मेटिक्स. कुछ देर खडा रहा मैं उनके सामने. फिर बोला, राहा आता पारशे. आधीच तुमच्यावरचा विश्वास उडत चाललाय लोकांचा. देवलोकांना मार्केर्टिंगमधलं ढ कळत नाही भाई.
भाई, फार पूर्वी हार्टचं दुखणं आणि दाढी यांचा फटका बसला होता आपल्याला. भाई, हिस्ट्री रिपीट्स? मोठा माणूस गमावून बसलो होतो आपण तेव्हा. पंधरा ऑगस्ट के दिन बहना मिठाई बाट रहीं थी कॉलेजमें और इधर काका का देहान्त. कितने दिन कोसती रहीं वो खुदको. भाई, तू छोटा था, अचानक इतना कैसे बडा हुआ कि, दुनियासे ही विदा हुआ? किती गोष्टी राहून जातात यार. मुख्य म्हणजे बोलायचं किती राहून जातं माणसाचं. कितीतरी विचारायचं राहून जातं. सांगायचं राहून जातं. आपण मिळून केलेल्या गोष्टी आता एकट्यानेच वागवायच्या काय हयातभर?
तुला आठवतंय, आपण सात आठ वर्षांचे असूत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तू आमच्याकडे आलेला. मी मारे ऐटीत तुला भिंतीवर चढून दाखवत होतो. आणि अचानक खुंटी निसटली. मी खाली दगडांत. रक्ताळलेला. तू घाबरून गेलास. मी हसून दाखवायला गेलो तुला, तर तोंंडातून रक्त. मग तुझी धावपळ. तेव्हापासून मित्रच झालास तू माझा पक्का. चुलत वगैरेचं नातं गळून पडलं तेव्हाच. हैदराबादचा बंगला केवढा होता भाई आपला जामे उस्मानियातला. प्रचंड आवार. इकडे डब्यांचे टॉयलेट. तू म्हणालास हैदराबादेत साखळी ओढली की पाणी येतं. मी आश्चर्याने वेडा. तिथे आलो, त्याच रात्री मी कुतूहलाने साखळी ओढली आणि पाण्याचा गडगडाट. त्या आवाजाने घामाघूम झालो. बाहेर तू उभाच होतास. हसत राहिलास मला. मी प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नात आणि तू तो नम्रतेने स्वीकारण्याच्या स्वभावाचा. तिस-याच दिवशी इरिशिरीवर मग मी तुला तिथल्या भिंतीवर चढून दाखवलं. मांडवाच्या बांबूतून अचानक एक भुंगा बाहेर आणि मी सपशेल खाली. फरशीवर उलटा पडलेलो. रक्ताच्या थारोळ्यात तूच होतास समोर, प्रचंड घाबरलेला. वाचलो होतो ना मी. त्यानंतर काही वर्र्षानी तूही मग मला माळ्याला लटकून दाखवलंस, तर माळाच खाली. तुझं नाक रक्ताने माखून गेलेलं. भाई, असे कित्येक प्रसंग. या सगळ्यांचीच आपल्याला फुरसतीनं उजळणी करायची होती. भाई, आता हे मीच मला सांगायचं? परसो माँ तेरी याद निकाल के कह रही थी. आपण दोघे रांगत होतो तेव्हाची गोष्ट. तेव्हा कधीतरी तुमच्याकडे आलेलो. एवढी प्रशस्त जागा. म्हणे रांगत असताना, मी सतत धडकायचो कुठेतरी आणि तू माझ्याकडे कुतूहलाने बघत राहायचास. तुझ्या जाण्यानंतर कळालेली ही लेटेस्ट गोष्ट. तू आधीपासून तसाच होतास?
भाई, शाळा सोडल्यानंतरचा एक प्रयोग आठवतोय का तुला. फार अंगाशी आला होता आपल्या. तारनाक्याच्या आर ट्वेंटी एटमध्ये राहत होतो आपण. बंगल्याच्या मागच्या झाडावर प्रचंड किडे झाले होते. संपूर्ण झाड लदबदलेलं. काय होतं माहीत नाही, काय करावं माहीत नव्हतं. मी नुकतीच एक ट्रीक शिकलो होतो. म्हटलं ती आजमावून बघू. मग आपण मशाल तयार केली, ती पेटवली. तोंडात रॉकेल ठेवून आपण त्याची पिचकारी मशालीवर मारायचो, तिथून एक जाळ झाडाच्या दिशेने जायचा. कित्येक पिचका-यानंतर एखादीच फांदी जरा मोकळी झाली असेल; पण नंतर जे काय झालं ते झोप उडवणारं होतं. आधी मळमळ आणि नंतर उलट्याच उलट्या. हा अवकाळी कार्यक्रम नंतर खूप दिवस भोवला आपल्याला.
तुला आठवतंय, बडी बहना की शादी में हम बच्चे थे. विदाई के समय रो रहे थे. रोते रोते अपना ध्यान उनकी तरफ था, जो अपने पार्टी के थे, मगर रो नहीं रहे थे. उलटा हस रहे थे हमें. अपनीही उमर के, अपने साथ खेलनेवाले. काय चिडलो होतो भाई आपण त्यांच्यावर. रात्री त्यांना यथेच्छ बमकावून काढण्याची सारी तयारी केली होती. अभी हसीं आती है, फिर भी खुन्नस बरकरार है भाई. भाई, अब बडे भाईयोंका मजाक कौन उडायेगा, बहनों को कौन चिढायेगा. सारा ठेका क्या अब अकेले मेरे नाम?
एकाच विषयावर आपलं जमायचं नाही भाई. क्रिकेट. टेस्टमॅच असल्या की, दुरावाच यायचा आपल्यात. गप्प्पांची रात्र टीव्ही पळवून न्यायचा आपली. केवळ वाफाळलेल्या कॉफीच्या आशेने मी तुझ्यासोबत बसून राहायचो, त्या काळात. भाई, अगदी परवापर्यंत किरकिरी केली आपण. मी आलो तुझ्याकडे आणि तू जुन्या कुठल्यातरी मॅचेस काढून बघत होतास. त्याच, पूर्वीच्या उत्साहाने भांडलो आपण. सरतेशेवटी एका रेसिपी शोवर कॉम्प्रोमाईज झालं आपलं.
मागच्या वेळेस तू आलास तेव्हा, मी परत तुला सोडवायला आलो. तू म्हणालास, दो दिन रुको राजूभाई. साथ में निकलते है. म्हटलं, आता होऊनच जाऊ दे हेलपाटे. लहानपणाचे खेळ पन्नाशीच्या उंबरठ्यावर आपण खेळू लागलो. तू हरलास भाई. आता शेवटचंच पोहोचवलं मी तुला. अब हर सबेरे जब भी उठता हूँ, तो पहला खयाल तेरा ही आता है, क्या आजभी तू सच में नहीं है? मग वाटतं, कधी तरी एखादा दिवस येईल, ज्या दिवसापासून तू पुन्हा असशील. मागचं सगळं पुसून टाकू आपण. झालं गेलं विसरून जाऊ. तू तुझा मृत्यू धुडकावून लाव, आम्ही आमचा शोक झटकून टाकू.
भाई, पन्नास वर्षात तू पहिल्यांदाच गावाकडच्या यात्रेस आलास. हरखून गेलास बघून. कुठले कुठले फोटो काढत बसलास. ह्यापुढे दरवर्षी यात्रेला न चुकता यायचं ठरवलंस तू. भाई, आता दुस-याच वर्षी खंड पडणार तुझा. त्यानंतर कायमच. किल्लारीच्या महादेवावरही तुझी प्रचंड श्रद्धा. भूकंप नुकताच होऊन गेला होता आणि तुझी पहिली पोस्टिंग किल्लारीत. सारं भयावह रोज पहात होतास तू. तेवढ्या भूकंपात वाचलेलं मंदीर म्हणून सांगत राहिलास त्याची महती. आताही कोणाकोणाला दर्शनाला नेऊन आणत होतास, फार पावतो म्हणून सांगत होतास. भाई, मला एक गोष्ट कळत नाही. हे देव लोक तुला सोडून सगळयानाच का पावत होते?
....
भाई, तेरे लिए मैने यार्डली का डिब्बा ले रखा था, जानबूझकर. तुझे चिढाना था बहुत. रह गया. भाईसाब की नई गाडी में पीछे कितनी बडी स्पेस है, तुझे दिखाना था. रह गया. नामपल्ली स्टेशनसे पॅसेंजर पकडकर हम फिरसे पूना जानेवाले थे. ‘अद्रकको पंजे’ पासून ‘अंग्रेज’पर्यंत पुन्हा एकदा मनमुराद हसायचं होतं आपल्याला. उप्पलला राजलक्ष्मी थिएटरच्या सुनसान रोडवर आपण रात्ररात्र भटकलो. तिथं केवढं वाढलंय भाई. तुझ्या टोलेजंग इमारतीतून आता धावती मेट्रो दिसायला लागली होती. भाई, हमें मेट्रोसे घूमना था. शांताबाई, जयश्री किर्लोस्कर का पुराना हॉस्पिटल तू मुझे दिखानेवाला था भाई. आपल्या भागातले, आपल्या वयातले अनेकजण ही त्यांचीच देण. तू वहाँ का, पुढे पंचवीसेक वर्षांनी भेटलेली माझी बायको तिथलीच. आठवडाभराच्या फरकाने तुमचा तिथलाच जन्म. मग गमतीने तू तिला चिडवायचास, तुमच्या आईने माझ्या आईला तेव्हा ओळखच दाखवली नाही वगैरे... क्या पता यहीं कारण होगा, तेरा घर उसे मायका लगने लगा था.
भाई, लॅम्ब्रेटापर बैठ कर हम हैदराबाद फिरसे घुमनेवाले थे. चेर्मासके शर्टा पहनकर तारनाका में एग्जपफ और इक्लेअर चॉकलेट की पार्टी करनेवाले थे.
भाई, तू मेट्रोसिटीत कॉन्व्हेंटमधला. मी गावाकडं झेडपीत. लहानपणी सुट्ट्यांच्या काळात कधी माझ्या मित्रात तू, तर कधी तुझ्या मित्रात मी, भारी मजा यायची. सत्तरचं दशक होतं ते. माझ्या भाषेचा हेल काढायचे तुझे मित्र, गंमत वाटायची त्यांना. तुला इंग्रजी बोलता येतं म्हटलं की, माझ्या मित्रांत मान वाढायचा माझा. बोलून दाखव म्हणून मग आग्रह व्हायचा तुला. तू मग तेलगूही बोलून दाखवायचास.
भाई, मला खरी आवडायची, ती तुझी हैदराबादी हिंदी. त्या भाषेनं, त्यातल्या मिश्किलीनं किती तरी माणसं जोडलीस तू. जोडत गेलास. ऐकत रहावं वाटायचं, तू बोलत असताना. मीही बोलायचो रेटून; पण जमायचं नाही. आजही नाही; पण वाट्टेल तशी भाषा मिसळून व्यक्त व्हायला आवडायचं तुझ्याशी. ही असली भाषा आता मी कुणाशी बोलू भाई? पिछले चालीस सालमें शायदही हमनें कभी मराठीमें बात की होगी, भाई. आज भी हम बात करते है....हम याने मैं. अकेला. तू तो खाली मेरे अंदर बैठ कर सुन रहा है. मैं ही बोलते जा रहाँ हूँ, अंदर ही अंदर. पिछले कुछ दिनोसे तू खडाही है मेरे साथ. बिना कुछ बोले, देखताही जा रहा है. वन वे बात नहीं हो सकती भाई. आदमी पागल लगता है.
भाई, हा मोबाईल भली काळमारू चीज आहे. समय का पताही चलने नहीं देती. बस्स, खोल के बैठो, दुनिया गयी भाड में. तू तो नजर भी नहीं आता दूरदूर तक. बस उसे बंद किया तो तू सामने खडा. हटताही नहीं है. भाई, एक बात तुझे बोलनी थी. आदमीको अपने लिये नहीं कमसे कम दूसरों के लिये थोडा तो बुरा होना चाहिये. भूलने में आसानी होती है. पीछे रहनेवालोंका दुख हलका होने में बुराई काम आती है. भाई, आदमी इतना भी केअरिंग ना हो की, उसकी खुदकी बेअरिंग ही टूट जाये!
भाई, बुरे सपने तो हरदम आते रहते है. त्यात पाहिलेल्या घटनेने दरदरून घामही फुटतो; पण तरीही एक सुप्त जाणीव असतेच, की यह तो सपना होगा. ये तो टूट जायेगा. भाई, गंमत म्हणजे ते खरंच स्वप्न असतं. त्यातलं सारं खोटं असतं. मग जागे होताच आपण गदगदून जातो.
भाई, बहुधा स्वप्न कधी खरी होत नसतात. मग ख-या गोष्टीही स्वप्नं होऊन भुर्रकन का उडून जात नाहीत?

टिप्पण्या