म्हातारी सुन्न बसूनै
एक म्हातारी. नव्वदीपार. सकाळी ओसरीवर बसून आल्या गेल्याची चौकशी करणारी. म्हातारीचं घर गावाच्या टोकाला. खरं तं सत्तरेक वर्षांपूर्वी म्हातारी जेव्हा नवरी म्हणून पहिल्यादा या घरात आली तेव्हा ही गल्ली म्हणजे नुसता कलकलाट होता. बायामाणसांनी भरलेला. गेल्या दहा बारा वर्षांत हळूहळू सारा पसारा स्टँडच्या बाजूला गेला आणि गल्ली भयाण झाली. आधनं मधनं पक्ष्यांचाच काय तो आवाज. नाही तर वानरांचा दांगोडा.
म्हातारीने या काळात खूप काही घडताना बिघडताना बघितलै. समोरच्या रस्त्यावरनं आणि जगण्याच्या दोरीवरनं शेकड्यानं लोकं आले आणि पुढच्या प्रवासाला निघून गेले. तिचीही जवळची माणसं केव्हातरी तिच्या नकळत दोरीवरनं निसटून गेली. यमाच्या नाकावर टिच्चून म्हातारी तगूनै.
काळ, बयामाणसं त्यांच्या सोयरिकी, त्यांचे लेकरंबाळं म्हातारीच्या डोळ्यासमोर ताजे आहेत. तिची नजर, कान, स्मरणशक्ती वयाला झुगारून ताठ्यात नांदूनैत. तिला जुन्या सा-यांचे आवाज ऐकू येतात. त्यांच्या आवडीनिवडी आठवतात. तिच्या नजरेत त्यांच्या लकबी पक्क्या साठूनैत. म्हणूनच एरवी दुपारी खायला उठलेली गल्लीतली शांतता म्हातारीसमोर नतमस्तकै.
म्हातारी सकाळी ओसरीवर येऊन बसते, तेच आल्यागेल्या दोनपाच पिढ्यांना घेवून. रस्त्याने कुणी येतं, कुणी जातं. जेव्हा कुणीच नसतं तेव्हा म्हातारीच्या आठवमधून जुनेपुराणे कुणीकुणी अवतरून येतात. संध्याकाळी हरिपाठानंतर म्हातारी जेव्हा घरात जाते तेव्हाच त्यांची सुटका.
म्हातारीची एकच तक्रारै. सध्याच्या माणसांना वेळच मिळेना झालाय. गल्लीत आता घरपरत गाड्या आहेत. पाय मोडून माणसं नुसते बिंगत रहातात. येता जाता दोन घटका टेकून ख्यालीखुशाली करणा-या बायाही अलीकडं फिरकेनाशा झाल्या आहेत. सासवा थांबायच्या, सुना थांबायच्या, लेकीबाळी थांबायच्या. आताशा कुणीच कसं नाही?
म्हातारीला आधीचं सगळं डोळ्यापुढं सरकतं आहे; पण नव्यानं आलेल्या बायांचं सुखदु:ख कळत नाहीयेय. म्हातारी अस्वस्थै. घरोघरी संडासं झाल्यापासून बायांचा सकाळचा राबताच गेलाहे गल्लीतला. गल्लीच्या खालच्या बाजुला बाया जाताना दिसतच नाहीयेत. पांद्या बुजून गेल्याहेत.
म्हातारीला माहिती करून घ्यायचं आहे सगळं. तिला बाहेर पडता येत न्हाईये, बिना माहितीचं जगता येत नाहियेय. माहितीचे सोर्स बंद झाल्यानं जगणं तुटत चाललंय. क्लायम्याक्स हुकल्यासारखी म्हातारी सुन्न बसूनै.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा