जुईचा रुसवा


मागच्या मोसमात जुईनं रुसवा धरला होता. कुठेमुठे दोनपाच कळ्या आल्या तेवढंच. ऐन मोसमात तिला असं बघायला नको वाटे. जणू काही सणासुदीच्या काळात बाहेरगावी असलेल्या पोराची वाट पाहत थांबलेली म्हातारी. श्रावण संपूनही गेला; पण ती बहरली नाही ते नाहीच. शेवटी शेजारची रानजाई चाफ्याला गिरकी मारून खाली उतरली आणि तिची फुलं जुईच्या अंगाखांद्यावर खेळत राहिली. मागचा पूर्ण मोसम हा खेळ चालू होता. रानजाईच्या रांगड्या गंधात जुईचा एकटेपणा सामावून गेला होता.
यंदा जुईनं फार वाट पाहायला लावली नाही. रातराणीने मागच्या दहा बारा रात्री धुंदीत घालवल्या. अजूनही तिच्या गंधातला गारवा रोज रात्री गुंग करून सोडतो. परवा मात्र सकाळी सकाळी मांडवाखालून जाताना मंद सुवासाने हलकेच साद घातली. वर बघितले तर जुईबाई कळ्या फुलांनी लगडलेल्या. अरे, आपलं लक्षच नव्हतं. तिथं तर निव्वळ आनंदोत्सव चालू होता. मधुमालतीलाही आवतण होतं. मग अर्थातच मागच्या वर्षीच्या रुसव्याची आठवण झाली आणि पाठोपाठ रानजाईचीही.
या उन्हाळ्यात काय बिनसलं की, जुईच्या भोवताली फेर धरणारी रानजाई अचानकच सुकून गेली. पावसानंतर ती मातीतून पुन्हा उगवेल असं वाटलं होतं, पण नाही. जुईचा उत्सव पाहायला ती नाही. तिचं जाणं काही दिवस खुपत राहणार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा