मनात रुतून बसलेली विहीर

फाट्यावर उतरून पायपीट करत गावात पोहोचलो. पंचक्रोशीतलं ते नावाजलेलं घराणं. भलं मोठं कुटूंब. भरपूर जमीन, घरात जेवढे सदस्य तेवढेच नोकरचाकर. भला मोठा तीन ताळी वाडा. दर्शनी भागात वरच्या दोन मजल्यांचा सज्जा, बाहेर तोंड काढून पुढे आलेला. त्यावर लाकडी सुबक काम. वाड्यासमोर मोठी मोकळी जागा. तिथं ट्रॅक्टर उभं, बाजूला जनावरांचा गोठा. वाड्याच्या आसपास रेंगाळलो. आत जायची हिंमत होईना.
ते सत्तरचं दशक. बहिणीला माहेरपणाला आणायचं होतं. वडील म्हणाले, तिला घेवून ये. आमच्या गावापासून ४५ ते ५० किमी अंतरावर अजिंठा डोंगर रांगांच्या परिसरात तिचं सासर. मी सातवीत वगैरे. तिला पहिल्यांदाच आणायला निघालेलो.
अंगावर शाळेचा गणवेश. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट. टोपी फक्त शाळेपुरतीच. पायात काही घालावे असे बंधन आणि पद्धत दोन्ही नव्हती. हातात एक वायरची पिशवी. वाड्यातून आतबाहेर येणा-या जाणा-यांची लगबग चालू होती. कुणाच्या तरी लक्षात आलं, हे पोरगं गावातलं दिसत नाही. चौकशी करून त्यानं मला आत नेलं.
वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजातून आत गेलं की, समोर प्रशस्त दगडी चौक. तिथून पुढे खुली बैठक. मागे भिंतीला टेकून तिचे सासरे बसलेले. भरदार शरीरयष्टी, सणसणीत सहासव्वासहा फूट उंची असावी. डोक्यावर पिवळसर रंगाचा पटका. वारकरी माणूस, चेह-यावर प्र्रसन्न भाव. त्यांच्यासमोर काही माणसं बसलेली. गप्पांचा फड जमलेला. समोर चहाचे कप.
मी चौकातच थांबलो. बहीण कुठेच दिसेना, नुसतीच अनोळखी माणसे. रडू यायला लागलं. जायचं कुठं? आणणा-याने तर चौकात आणून सोडलंय, पण पुढे कुठं जायचं. समोर तर ही अशी माणसं बसलेली. तिथून शेजारी एक दार होतं; पण त्यांना ओलांडून त्या दारातून जायचं कुठं? तिकडे असेल का बहीण?
त्याच दारातून काही छोटी मुलं आली आणि चौकात उतरून शेजारच्या जिन्याने वर गेली. पुन्हा आणखी दोनतीन. त्यांच्याच धुंदीत. तीही वर गेली. मग कुणी बाई आल्या. त्यांनी मला ओळखलं. हसल्या आणि हाताला धरून बैठकीत आणलं. बहिणीच्या सास-यापुढे उभं केलं. ते कुठल्याशा गंभीर विषयावर बोलत असावेत. त्यांनी प्रेमाने बघितलं.
घरून आईने बजावलं होतं. मी लगेच त्यांच्या पाया पडलो. ते हसले. म्हणाले, ‘मामा, सगळ्यांच्याच पाया पडा.’ ते मलाच म्हणाले की आणखी कोणाला हे समजलं नाही; पण मी बैठकीतल्या एकूण एक माणसांच्या पाया पडलो. शेजारीच आतल्या खोलीचं दार होतं; तिथून हालचालींचे आवाज येत होते; पण आत खोलवर अंधार पसरलेला. बहीण अजूनही दिसेना. मग तिचे सासरेच म्हणाले, अरे, मामांना आत घेवून जा. त्यांचं जरा चहापाणी करा, त्यांच्या बहिणीची भेट घालून द्या.
दारातून आत जाताना त्या अंधाराची जराशी भीतीही वाटली. आत पाय ठेवला आणि दचकायला झालं. आत भलं मोठं महिला मंडळ, तेवढीच लहान मोठी पोरं. त्या खोलीतून आत एक खोली आणि समोर प्रचंड मोठं स्वयंपाकघर. बहिणीचा अजून पत्ता नाही. सगळे अनोळखी. मग मगाशी सास-यापुढे उभे करणा-या बाई पुढे आल्या. त्यांनी ओळखी करून द्यायला सुरू केलं. मग सासूबाई, जाऊबाई, नणंदा असे अनेकांच्या पाया पडत गेलो. तिथल्या तिथं खसखस पिकत गेली. ‘मामा, अजून वाकून करा नमस्कार’ अशाही सूचना अंधारातून सुटत गेल्या. वाकून वाकून माझी कंबर दुखायला लागली. आतून दाटून आलं.
आता याच अंधारातून बहिणीने प्रगट व्हावं आणि सगळ्यांपासून आपल्याला वाचवावं अशी मनोमन प्रार्थना करू लागलो.
..........
पुढच्या काळात मग मला अनेकदा तिथं जावं लागलं आणि त्यांच्याकडचं एकूण वातावरण चेष्टेचं असल्याचं कळत गेलं. भीतीही कमी होत गेली. नमस्कार मात्र थांबले नाहीत. मीही ‘अजून कुणाला करायचाय का?’ असं विचारण्याइतका धीट झालो. या सगळ्या चेष्टेच्या दिव्यातून गेल्यावर मग कुठं बहिणीची भेट व्हायची. ती भेटेपर्यंत मला आधार वाटायचा तो, तिच्या सासूबाई आणि जाऊबाईंचा. त्यांचे चेहरे प्रेमळ. नंतरच्या काळात या चेष्टांचा सराव झाला किंबहुना मला त्या आवडू लागल्या. मीही त्यात सामील होवू लागलो. त्या खेळीमेळीचा काहींसा प्रभावही माझ्यावर पडत गेला.
.......
तर त्याच काळात त्यांच्याकडच्या चेष्टामस्करीचे अनेक किस्से सांगितले जायचे. त्यातला एक माझ्या डोक्यात फारच घर करून बसला होता. कोणे एकेकाळी त्यांच्याकडच्या अशाच एका पाहुण्याला चेष्टामस्करीत चक्क विहिरीत ढकलून देण्यात आलं होतं. त्याची गोष्ट मला कुणीतरी तेव्हा रंगवून रंगवून सांगितली होती. मी घाबरलो होतो; पण दुसरीकडून वाटायचं, छे, असं चेष्टेत विहिरीत ढकलतात काय? आपल्याला चिडवण्यासाठी हा किस्सा रचण्यात आला असावा. ते खरं खोटं काही असो, विहिरीला मात्र पाणी भरपूर होतं. धडधड वाढवायला तेवढं पुरे होतं.
गावालगतच शेत होतं. त्यांच्याकडच्या चिल्लर पार्टीसोबत मी खूपदा तिथे जायचो. चिकू, आंब्याची झाडं होती. तिथूनच पाण्याचा दांड वाहत असे. दाट सावलीची ती जागा मला आवडायची. बाजूलाच असलेल्या त्या विहिरीच्या कठड्यावर आम्ही बसायचो; पण तो चेष्टेत ढकलण्याचा किस्सा ऐकल्यापासून मी विहिरीपासून दूरच राहायला लागलो.
पुढे काही वर्षानी गावाकडे पोहायला शिकलो. तेव्हा कळलं की, पोहणं शिकायला काचकूच करणाऱ्याला सर्रास विहिरीत ढकलून द्यायची त्याकाळी पद्धत होती. अर्थातच खाली बाकीची मंडळी असायचीच. म्हणजे बहिणीकडच्या पाहुण्याला विहिरीत ढकलण्यामागचं कदाचित हेही कारण असू शकेल. हा माझा अंदाज. खरा किस्सा किंवा तो किस्सा खरा होता का हे आजपर्यंत मला कळालेलं नाही; पण माझ्या डोक्यात मात्र पक्का बसला आहे. इतका की, पुढच्या काळात मी आणि मोठ्या भावाने त्यांच्या विहिरीत उड्या मारून मनसोक्त पोहून घेतलं. आता तरी ते डोक्यातून जाईल वाटलं होतं; पण शेवटी स्वत: उडी मारणं आणि ढकलून देणं यात फरक असतोच.
.....
खूप दिवसांनी त्या शेतात जाण्याचा योग आला. शेतात आणखी एक विहीर झाली आहे; पण जुन्या विहिरीचं भीतीयुक्त आकर्षण होतंच. गेलो मग विहिरीचं पाणी पाहायला. घराण्यातली चेष्टामस्करी अजूनही टिकून आहे; पण कुणा पाहुण्याला विहिरीत ढकलून त्याला पोहायला शिकवावं एवढं पाणी आता या भागातल्या कुठल्याच विहिरींना राहिलेलं नाहीयेय.
......
आटत जाणा-या विहिरींचा स्वभाव माणसाला आतून पोखरत नेतो. मग तरंगण्याचं कौशल्यही हरवल्यागत होत जातं. ते एकदा हरवलं की, आसपासची ओल धोक्यात येत असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा