आमचे कुरैशीसर

गावाकडं गेलो तर, नुकतेच कुरैशीसर वडलांना भेटायला घरी येवून गेल्याचं कळालं. तसाच बाहेर आलो. गल्लीच्या दुस-या टोकापर्यंत कुणीच नव्हतं. संध्याकाळची वेळ. थंडीही भरपूर. बहुतांशी गल्ली रिकामीच. मिळेल त्या गाडीने सर परतण्याची शक्यता. त्यांना गाठलंच पाहिजे होतं.

त्यांची भेट होवून तब्बल चाळीस वर्ष झालेली. चिंचोलीच्या शाळेत ते आम्हाला हिंदी शिकवायचे. बहुतेक त्यांचीही तिथली पहिलीच नियुक्ती असावी. त्यांचं तेव्हाचं मृदू वागणं मनात ठसलेलं. कायम आठवणीत राहिलेलं. शाळेचा विषय निघाला की, कुरैशीसर आवर्जून आठवायचे.

त्यांना भेटण्यासाठी मग शाळामित्र नामदेवरावची मोटारसायकल काढली आणि त्र्यंबकनानाला सोबत घेवून तिब्बलशीट गल्लीबोळा फिरू लागलो. त्र्यंबकनाना म्हणाले, सर माझ्याकडेच होते. तिथून विजूगुर्जीकडं गेलते. आता बहुतेक करीमकडे गेले असतील. मग करीमकडं मोर्चा वळवला तर तिथं कळालं की मशिदीत गेलेत. मशिदीतून कळालं की, बसस्थानकाकडे गेलेत. तिथून मग कलीमच्या दुकानावर. तिथून कुणीतरी सांगितलं, ते मशिदीतचैत. मोर्चा परत मशिदीकडे. तिथून आणखी निराळ्या गल्लीत....

चिंचोली इनमिन पंधरा हजार लोकवस्तीचं गाव. गाव एवढुसंकच; पण कुरैशीसर सापडेनात. गाव पिंजून झाला. साडेपाच ते सात सगळ्या गल्ल्या हिंडून झाल्या. एखाद्या दारापुढे चपलाबुटं जास्त दिसले की थांबायचं, आत वळून बघायचं. तिथे नसले की, पुढच्या गल्लीत, पुढच्या घरी. मग कुणीतरी सांगायचं, आता इथेच होते, इतक्यातच गेले.

झालं असं होतं की, ते एका घरातून निघाले की, दुस-या घराच्या दारात कुणीतरी उभं असायचंच. मग सर या घरातून त्या घरात. आख्खं गाव कुरैशीसरांना ओळखणारं. त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारं. त्यांना गाव सोडून अनेक वर्ष लोटली; पण घराघरात त्यांचा परिचय अजून जपून राहिलेला.

सर चिंचोलीतून नंतर जालन्याला बदलीवर गेले. पुढे शिक्षणाधिकारी होवून निवृत्त झाले. आता केवळ गावक-यांच्या भेटीसाठी आलेले. शेवटी रात्री आठच्या सुमारास ब-याच फोनाफोनीनंतर ते नवाबच्या घरात सापडले. तेही अर्ध्या तासासाठीच. तेवढ्या वेळातही बरंच काही बोलणं झालं. शाळेतल्या घटनांपासून त्यांनी गावात दिलेल्या प्रवचनापर्यंत. तेवढ्यात अजान झाली आणि ते नमाजासाठी निघून गेले.

मला एक गोष्ट सातत्याने आठवायची, ती म्हणजे शाळेत असताना काही दिवस मी वाटेवर त्यांच्या घरी जायचो. ते माझ्या खांद्यावर हात ठेवून शाळेत यायचे. त्यांच्या पायाला काहीतरी झाले होते. या भेटीत त्यांना, तेव्हा काय झालं होतं म्हणून विचारलंच. सर म्हणाले, ‘खरंय. माझ्या पायाचं नख निघालं होतं बहुतेक तेव्हा. चालायला त्रास होत होता.’ त्यावर मी काही बोललो नाही; पण मला पक्कं आठवतंय. त्या काळात हाच प्रश्न मी जेव्हा त्यांना विचारला होता, तेव्हा ते म्हणाले होते, काही नाही रे, उंदीर चावलाय.

त्यांनी तेव्हा दिलेलं हे उत्तर सरांना आठवत असेल की नाही माहीत नाही, तसं मी त्यांना विचारलंही नाही. पण तेव्हापासून ‘उंदीर रात्री पाय कुरतडतो’ असं मला कायम वाटत आलं होतं. चाळीस वर्षांनंतर का होईना, मला या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. उंदरांवरचा संशय माझ्या मनातून गेलाय.

टिप्पण्या