आम्मांचा ओटा!
![]() |
| आम्मांचा ओट्याची दोन चित्रे- एक पंचमीच्या काळात गावच्या यात्रेचा देवी विसर्जनानंतर टिपलेला. त्यांची यात्रेतली शेवटची हजेरी. दुसरे चित्र, आता सुन्या झालेल्या ओट्याचे. |
बघ, आता सकाळीच चिमण्यांचं सुरू होईल. नंतर गधडे, त्यांना कळवाच नाही, मग शेळ््या, त्यांना राखोळ््या नाही. मग वानरांचं, त्यांना तर कुणाचा धाकच नाही. पत्र्यावर नुसता दांगोडा सुरू होईल...
आम्मा सांगत असतात. मी ओट्यावर शेजारी बसलेला असतो. तेवढ्यात समोरच्या पत्र्यांवर वानराची टोळी येतेच. पोटाशी लेकरं घेतलेल्या म्हाळणी भिंतीच्या टोकाशी उन खात बसून राहतात. त्यांची कळती पोरं झाडांच्या फांद्यांना लटकून झुलत राहतात. या पत्र्यावरनं त्या पत्र्यावर त्यांच्या कुद्या सुरू असतात. मागोमाग धाब्यावर त्यांना हुसकावणा-यांचेही आवाज येत राहतात.
गावाकडचं हे दृष्य नेहमीचं. आम्मांच्या घरासमोरचा लांबसडक ओटा. ओट्यावर त्या पाय दुमडून, भिंतीशी टेकून बसलेल्या. त्यांच्यासमोर मग गावच्या पुढा-यांपासून दोनपाच वर्षांच्या पोरापर्यंत कुणीही येवून बसलेलं. त्या रस्त्यावरनं जाणारा प्रत्येकजण आम्मांशी दोनपाच वाक्य बोलल्याशिवाय पुढे धकणार नाही, हे आपोआपच ठरून गेलेलं. त्यांचा तेवढा आदरयुक्त दरारा. गावक-यांनी तो जपलेला.
......
१९७६ च्या काळात इथल्या शाळेत मला घातलं तेव्हापासून मी आम्मांना या ओट्यावर पाहतोय. पूर्वी बापू असायचे, ब्रिटिशांसोबत त्यांनी हॉकी खेळलेली. त्याचे अनेक किस्से त्यांच्याकडून ऐकायला मिळायचे. वीसेक वर्षांपूर्वी ते गेले. त्यानंतर आम्मा एकट्याच ओट्यावर. खरं तर एकट्या म्हणायचं कसं? त्यांच्यासमोर कायम कुणीना कुणी बसलेलं. संध्याकाळी हरिपाठाच्या निमित्ताने गावातलं महिला मंडळ जमलेलं.
.....
गावाकडे आलं की, आम्मांच्या ओट्यांवर हमखास दिवस काढायचा, हा शिरस्ता ठरलेला. मी बसलेला असतो. रस्त्याने मग कुणीतरी नुकतीच लग्न झालेली पोर जाते, आम्माकडे बघून हसते. मग आम्मा तिला तिच्या माहेरचं विचारतात. ती भरभरून बोलते. मग आम्मा तिच्या आईच्या माहेरचं विचारतात. तिथल्या नातलगांची नावं सांगू लागतात. ती चकित होवून बघू लागते. मीही चकित होतो.
गावातली सगळ्याच समाजातली माणसं, त्यांचे नातेसंबंध, त्यांच्या पोरी दिलेली घरे, त्यांनी करून आणलेल्या पोरींची घरे, त्यांच्या घरातले आजेपणजे, गाव सोडून गेलेले परिवार आणि त्यांचे किस्से याचा आम्माकडे प्रचंड साठा. तल्लख स्मरणशक्ती आणि वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स झालेले.
......
आम्मा मग मला माझ्या आजीची गोष्ट सांगू लागतात. ती दिसायला कशी होती, तिचा स्वभाव कसा होता वगैरे. वडिलांनाही न आठवणा-या त्यांच्या आईविषयी मग मला दाटून यायला लागतं. त्यांचा मृत्यू बहिणीच्या घरी वेरूळला झाल्याची माहितीही त्या मला पुरवतात. मी नंतर वडिलांना विचारतो. त्यांनाही त्यांच्या पंच्याहत्तरीत ही गोष्ट पहिल्यांदाच कळालेली असते.
पुढच्या अशाच एका भेटीत मग त्या मला, काशीला निघालेल्या आणि रस्त्यातच थांबलेल्या चिंचवणच्या वडाची गोष्ट सांगू लागतात. वानराने उचलून झाडाच्या शेंड्यावर नेलेल्या आणि नंतर अलगद खाली आणून दुपट्यावर ठेवलेल्या बाळाची गोष्ट सांगू लागतात. रहस्यकथा वाचल्यागत भासणा-या टोपल्याने हि-यांची वाटणी करणा-या त्या काळच्या जहागिरदारांच्या बघितलेल्या कथा सांगू लागतात. मी त्यात गुंतून जातो. माझा दोन दिवसांचा मुक्काम मग आठ दिवसांवर लांबत जातो.
मग कधीतरी त्या त्यांच्या माहेरचंही सांगू लागतात. चाळीसच्या दशकातलं. तिकडे चारशे एकरावर जमीन. वडिलांच्या बरोबरीनं त्यांनी तिथले बारीक बारीक हिशेब ठेवलेले, शेती सांभाळलेली असते. त्याचं सारं चित्र त्यांच्या बोलण्यातून उभं राहतं. जिद्दीनं गावातच पाय रोवून राहण्याच्या, वयाच्या पंच्च्याणवव्या वर्षापर्यंत शेतीशी नाळ जुळवून ठेवण्याच्या त्यांच्या चिकाटीचं गणित मग त्यातून उलगडत जातं.
पुढच्या एका भेटीत त्या मला माझ्याच आजोबांचं सांगू लागतात. तेही अकाली गेलेले. त्यामुळे घराची वाताहत झालेली. पोटापाण्यासाठी भावंड घराबाहेर पडलेली. मी कासावीस होतो, वडिलांचं बालपण माझ्या अंगावर काटा आणतं. मग त्या मला काव्यशास्त्रविनोदातली आजोबांची भरारी सांगू लागतात. त्यांच्या कविता म्हणून दाखवू लागतात. त्यांनी केलेली विडंबनं त्यांना तोंडपाठ असतात. मला हा आश्चर्याचा धक्का असतो.
तर हे असं गावातल्या बहुतेकांच्या बाबतीत होत राहतं. जो ओट्यावर बसेल, त्याच्या घराण्याची सारी कुंडली आम्मा त्याच्यासमोर उलगडू लागतात. गावातल्या तीन तीन पिढ्या आळीपाळीने त्या ओट्यावर गप्पांसाठी येत राहतात. तिन्ही पिढ्यांशी त्या त्या पातळीवर आम्मांचा संवाद होत राहतो.
त्यांंच्यासमोरच गावातली अनेक माणसं मोठी झालेली. कित्येकजणी नवीनवरी म्हणून गावात आलेल्या आणि पुढे आज्ज्याही झालेल्या असतात; पण आम्मांसाठी त्यांचं स्थान पोरीचंच. तद्वतच गावातली बरीच माणसं त्यांच्यासमोरच जग सोडून गेलेली असते, त्यात त्यांच्या जवळचीही असतात. हे सगळं पचवून आलेला कणखरपणा त्यांच्या शब्दागणिक दिसत राहतो.
माणसांशी संवाद हे त्यांच्या दीर्घायुष्याचं बलस्थान असतं. घरोघर टीव्ही झालेले असतात; मात्र त्यांनी त्याला कित्येक दिवस आपल्या घराची पायरी चढू दिलेली नसते. माणसं मालिकांत अडकतात तेव्हाही आम्मांच्या ओट्यावर मन मोकळं करणारं कुणी ना कुणी गावात असतंच. म्हणूनच की काय त्यांच्या गप्पांत आजूबाजूच्या माणसांचेच संदर्भ असतात. जगणारी, जगून गेलेली माणसंच त्यांचा विषय असतात.
मध्यंतरी गावाकडं गेल्यावर कळतं की, त्या नातवाकडे मुंबईला गेल्यात. रिकामा ओटा माझ्या अंगावर यायला लागतो. अस्वस्थ होत राहतं. माझ्या घरासमोर रस्ता ओलांडला की त्यांचं घर. दिवसभर तो रिकामा ओटा पिच्छा करत राहतो. डोळे बंद करून मग मी माझ्या मनातलं त्यांचं नेमकं चित्रं आठवू लागतो. लाईनवर्कमध्ये काढलेल्या चित्रांसारखी तीन टप्प्यातल्या आम्मा मला दिसू लागतात. एक, मी शाळेत असताना त्यांना पहिल्यांदा पाहिल्याचं. नऊवारीतल्या त्या स्वयंपाकघरातली भिंत सारवताहेत. त्यांचा एक पाय जमीनीवर, दुसरा कट्ट्यावर. त्यांचा हात छतापर्यंत पोहोचतोय. त्यांना सणसणीत उंची मिळालेली.
दुसरं चित्र त्यांची ऐंशी उलटून गेल्यानंतरचं. त्या बाहेरगावी निघाल्याहेत. त्यांना स्टॅंडपर्यंत सोडवण्यासाठी बैलगाडी जुंपण्यात आलीये. त्या माझ्याशी बोलता बोलता गाडीत बसताहेत. त्यांचा एक पाय खाली जमीनीवर आणि दुसरा बैलगाडीत.
तिसरं चित्र, पाय दुमडून भिंतीला टेकून बसण्याच्या त्यांच्या फेव्हरेट स्टाईलचं. मग मी डोळे उघडतो. पुढच्या पंचमीत गावच्या यात्रेत त्या भेटतात. मी त्यांना डोळ्यात साठवून घेतो. यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या बोलण्यात निर्वाणीची भाषा येते.
......
आपल्याच गावचा इत्यंभूत इतिहास सांगणारा ग्रंथ आपल्या हाती लागावा, आपण तो वरवर चाळावा, त्यातले दहापंधरा संदर्भ आठवणीत ठेवावेत आणि पुन्हा केव्हा तरी सवड मिळेल तेव्हा पुढची पानं पाहूत म्हणून टळमटाळ करावी. आणि काही दिवसांनी तो ग्रंथच कायमचा नाहिसा व्हावा, नेमकं तसं झालेलं असतं आम्मांच्या बाबतीत माझं.
पंच्चाण्णव वर्षांच्या आयुष्यात सत्तर-पंच्चाहत्तर वर्षांहून अधिक काळ आम्मा या ओट्यावर असतात. आम्माविना हा ओटा गावातल्या कुणीच आपल्या आयुष्यभरात पाहिलेला नसतो.
तो आता पाहावा लागणार, प्रत्येकाला,
तो थांबा आता थांबला, कायमचाच!
....
.... गावातलं सर्वात जुनं खोड जाणं हे खरं तर आख्ख्या गावासाठीच सुतक असतं!


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा