लालपरीतली जागा
शेजारच्या गावावरनं आलेली लालपरी. तिला माणसं लटकलेली. आतल्यांना उतरायचंय, बाहेरच्यांना चढायचंय. आत शिरायला वाव नाही. मित्र मुसंडी मारत आत घुसतो. आपल्याला मागचे पुढे ढकलताहेत, पुढचे मागे ढकलताहेत, आपण घामाघूम.
कसेबसे चढतो. मित्र म्हणतो, पलीकडचं शीट धरलंय तुझ्यासाठी. आपण बघतो, गाडी बहुतांश भरलेली. त्यानं दाखवलेल्या हाताच्या दिशेने जातो. तिथं खिडकीची जागा सोडून एक माणूस बसलाय आधीच. खिडकीच्या शीटवर मोबाईल ठेवलेला. कसं बसायचं? आपण त्याच्याकडं वळून पाहतो, मित्र ‘काय झालं?’ म्हणून खुणेने विचारतो. आपण संभ्रमात. तो तिथूनच ओरडतो, बिनधास्त बैस रे भौ.
आपण दचकत दचकत तो मोबाईल उचलतो, बसतो. प्रश्नार्थक नजरेने आजूबाजूला बघतो. कुणाचाय मोबाईल? आपल्याकडे कुणीच बघत नाही. तेवढ्यात मोबाईल वाजायला लागतो. आपण बावचळलेलो.
मित्र खाली उतरून खिडकीशी आलेला. तिथून हात पुढे करत तो आपल्या हातून मोबाईल घेतो. आपण कावरेबावरे होवून पुन्हा आजूबाजूला पाहतो. कुणाचा विसरलाय की कुणी ठेवलाय? मित्र फोन घेतो, बोलायला लागतो. आपण चकीत!
......
शीट पकडून ठेवण्यासाठी पेपर, बॅग, रुमाल असं काय काय वापरतो आपण; पण ते मिळालं नाही म्हणून चक्क मोबाईल?
गचागच भरलेल्या यष्टीत ‘आयफोन’ ने जागा धरणारा मित्र गावाकडंच सापडू शकतो!
मोबाईलहून बरंच काही महत्त्वाचं आहे हा विचार किंवा आपल्याकडच्या यष्टीतला कुणीच प्रवासी त्याला हात लावणार नाही हा विश्वास या दोन गोष्टीतूनच हे घडू शकतं. कधीकधी वाटतं, आपण हे दोन्हीही गमावलं आहे काय?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा