एक कथा पुस्तकाची, पुस्तकाच्या कथेची!


स्थळ: आप्पा बळवंत चौक, पुणे. १९८९ मधला एक दिवस. मित्राला म्हटलं, ‘मी कसं विचारू? मी लेखकै. माझंच पुस्तक मीच विकत फिरायचं म्हणजे कसं दिसेल ते. तू विचार ना प्लीज.’
तो म्हणाला, ‘पुस्तकातलं मला काय कळतं? त्यांनी काही विचारलं तर काय सांगू? आणि तू तरी सांगतोस कशाला, पुस्तक मी लिहिलंय म्हणून. शिवाय तुला अजून तरी कुणी ओळखत नाहीयेय.’
मग पुढच्या एका दुकानात शिरलोच मी. आत मधोमध टेबल टाकून एक गृहस्थ बसलेले होते. समोर एकच खुर्ची. तिथे उभा राहिलो. त्यांना पुस्तक दाखवलं. म्हटलं, ‘आम्ही हे पुस्तक काढलंय. तुमच्याकडं विक्रीला ठेवता काय?’
ते म्हणाले, ‘बाहेर पाटी बघून आलाय ना दुकानाची? आमचं स्वतंत्र प्रकाशन आहे. आम्ही दुस-यांची पुस्तकं ठेवत नाही.’ भलताच अपमान वाटला तेव्हा. तसाच बाहेर आलो. मित्राला म्हटलं, चल, गावाकडं परत जावू.
तरी मित्राने दोनचार दुकानात चौकशी केलीच. मी बाहेर थांबायचो, तो विचारून यायचा. एका ठिकाणी यश आलं. त्यांनी चारपाच प्रती कशाबशा ठेवून घेतल्या. विक्री झाल्यावर पैसे देवूत म्हणाले.
काही महिन्यानंतर आम्ही वैजापूरहून राजदूतने वसुलीला गेलो. विकल्या गेलेल्या पुस्तकांचे त्यांनी दीडेकशे रुपये रोख दिले. आम्हाला प्रचंड आनंद झाला. त्या वसुली दौ-याचा आम्हाला पाचशेच्या आसपास खर्च आला. त्यानंतर आम्हाला पुण्यात विक्रीचा नाद सोडावा लागला.
पण काही गोष्टी कळाल्या. मला हुसकवणारे प्रकाशक खरंच मोठे होते. आपण पुस्तकाच्या व्यवसायात शिरतोय आणि आपल्याला त्यांची माहिती नसणे, त्यातून त्यांना आपलंं पुस्तक विका म्हणून सांगणे म्हणजे अपराधच. त्यांचा इगो दुखावणे आलेच. दहापंधरा कथा छापून आल्यावर आपल्यातच एवढा इगो आहे तर त्यांच्यात किती असायला हवा. दुसरी गोष्ट, पुस्तक विकणे हे अवघड कामै.
.......

चांगले मार्क मिळावेत म्हणून तेव्हा बारावीला ड्रॉप घेत असत. मीही घेतला; पण बाकीचीच पुस्तकं वाचत राहिलो. पुढे जरासं लिहूही लागलो. बुवा, पैंजण, दैनिकांच्या रविवार पुरवण्यातून आलेल्या कथांचं आता पुस्तक निघावं अशी खुमखुमी आली. त्यातच मित्र राजू बाप्ते म्हणाला, आपल्या लायब्ररीत तुझंही पुस्तक पाहिजे.
बस्स, तो किडा फारच खोलवर घुसला. निवांत कुठेतरी अज्ञात ठिकाणी जावून एकांतात स्क्रिप्ट लिहावी लागते असं वाचलं होतं. मग बुलडाण्याला बहिणीकडे गेलो. बीएड कॉलेज परिसरात शांत असं तिचं क्वॉर्टर होतं. बहिण मोठी, तिला कौतुक. तिने खिडकीशी टेबल खुर्चीची व्यवस्था केली. खिडकीतून बाहेर विस्तीर्ण हिरवळ. लेखक मग लिहू लागला.
पण पुस्तक काढायला नेमकं काय काय करावं लागतं याची माहिती नव्हती. ग्रंथालयातल्या पुस्तकांवर ‘भंडारी मुद्रणालय’ असं वाचनात यायचं. म्हटलं, थेट त्यांच्याकडे जावूयात. राजदूत होतीच. मग मित्र आणि मी पुण्यात गेलो. मुद्रणालय शोधलं. भंडारीकाका सज्जन होते. आमचा अवतार बघून त्यांनी नीट विचारपूस केली. तेव्हा ट्रेडलवर पुस्तकं छापली जायची. पुस्तकाची जुळणी, त्याची प्रुफं, त्याचे फॉर्म, त्याचं कव्हर, त्याची छपाई, बाईडिंग वगैरेची माहिती त्यांनी दिली.
कव्हरसाठी रवी मुकुल यांचं नाव ऐकलं होतं. लोकमान्य चौकात एका इमारतीत त्यांचं वरच्या मजल्यावर ऑफिस होतं. दचकत दचकत गेलो. दाढी वगैरे असलेले देखणे रवी मुकूल. त्यांचं ते कलात्मक ऑफिस. त्यांनी केलेल्या मुखपृष्ठातील काही निवडक तिथे लावलेली होती. आम्ही हरखून गेलेलो. पण ते कव्हर देतील का नाही याची धाकधूक. त्यांनी एका दीर्घकथेतील पात्र घेवून त्याचं अप्रतिम कव्हर केलं. शिवाय त्याच्या छपाईची, लॅमिनेशनची आणि भंडारीकाकांशी बोलून बाईडिंगवाल्याकडे पोहोचवण्याचीही व्यवस्थाही लावली.
........
माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष. अठराएकोणिसाव्या वर्षी म्हणजे कॉलेजात असतानाच लिहिलेल्या त्या कथा होत्या. कॉलेज संपायच्या आतच त्याचं पुस्तक यावं अशी आमची योजना होती. संग्रहाला आमचे प्राचार्य रा. रं. बोराडे यांची पाठराखण होती.
तृतिय वर्षात असताना ‘चिघोर’ या विनोदी कथासंग्रहाचं प्रकाशन व-हाडकार लक्षण देशपांडेंच्या हस्ते झालं. प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानिया विद्यापीठाचे तत्कालिन मराठी विभाग प्रमुख आणि महानुभाव साहित्याचे अभ्यासक डॉ. व. दा. कुलकर्णी, प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रा. भास्कर चंदनशिवसर होतेच. शिवाय वैजापूरचे तत्कालिन नगराध्यक्ष आर.एम. वाणी आपल्या काही नगरसेवकांसह प्रेक्षकांत होते.
.......
पुस्तकाच्या जवळपास अकराशे प्रती आल्या होत्या. तीन खोल्यांच्या घरातली आर्धी खोली त्याने भरून गेली होती. प्रकाशन वगैरे झालं, वृत्तपत्रांत बातमी वगैरे येवून गाजावाजा झाला; पण आता या पुस्तकांचं करायचं काय?
नगरपालिकेने पाचेक प्रती घेतल्या. लगेच चेकही दिला. पहिलाच चेक. प्रचंड उत्साह. म्हटलं, व्यवसायातला हा पहिलाच चेक आहे. तो वठवायला नको. तसाच ठेवू. मित्र म्हणाला, ठिकै. नंतर... पुढे पुन्हा कधीच दुसरा चेक आला नाही. नगरपालिकेचा, पहिला चेक मात्र संग्रहीच राहिला. पुस्तकाच्या नंतर मुश्किलीने पाचपंचवीस प्रती विकल्या गेल्या. काही भेटीदाखल दिल्या. नंतर मग आमचं ‘मायमराठी प्रकाशन’ इथंच संपून गेलं.

पुस्तकाचे उत्साही गठ्ठे नंतर अडगळ वाटू लागले. एकावर एक ठेवलेले गठ्ठे मग हळूहळू खाली आले आणि त्याच्या स्वतंत्र खुर्च्या झाल्या. छोटे होते, त्यांचे टीपॉय झाले. काही वर्षानंतर वैजापूर सोडून औरंगाबादेत राहायला आल्यावरही ते होते. खपवताही येईना आणि ठेवायला जागाही पुरेना. साहित्यसेवा प्रकाशनाचे अरुण कुलकर्णी यांनी मग पुढाकार घेवून ती पुस्तके विकली. काही वर्षानी ते पुस्तक नंतर जनशक्ती वाचक चळवळने ‘अमुक अमुक गल्लीतली दंगल’ नावाने प्रकाशीत केलं. त्याला सरदार जाधव यांचं मुखपृष्ठ होतं.
मूळ पहिल्या पुस्तकाला परवा तीस वर्ष झालीयेत. म्हणून हा प्रपंच!
.........
बब्रूच्या एका लेखासाठी अनिल डांगेंनी नेमकं चित्र काढलं आहे, त्या लेखाचा बेस ‘चिघोर’ चे तेव्हाचे गठ्ठे आहेत!

टिप्पण्या