ऋणपर्यटन

म्हातारपण गावाला पक्कं चिकटून बसलेलं; पण एरवी सणावाराला आवर्जून शहरात येणारं. ते म्हणाले, दगदग सहन नाही होत. रस्तेही धड नाहीत. यंदा इथंच निवांत बरं, नंतर येवूत, कदाचित नवरात्रानंतर.
त्यांच्याशिवायचा सण मग सगळ्यांच्याच अंगावर आला. कुणीतरी म्हणालं, ते गाव इतक्यात सोडणार नाहीत; मग आपण शहर सोडूयात. भले एकदिवसासाठी असेल सगळे तिथेच जावूयात. एक ऋण पर्यटन!
थेट एक मिनी बस करून साठीच्या मुलीपासून आठीच्या पणतूपर्यंत सा-यांनी थेट गाव गाठलं. वेशीबाहेर बस थांबवून मग टप्प्याटप्प्यानं, जराशा अंतराने सा-यांनी घरी जायचं ठरवलं. आधी मुली, मग काही वेळाने मुलं, मग सुना, मग नातू, मग नातसुना, मग पणतूंंची गँग....
.........

गावातली दुपार. गल्ली निर्मनुष्य. सर्वत्र शांतता भरून राहिलेली. ढग दाटून आलेले. गावाला पकडून राहिलेलं म्हातारपण पलंगावर निवांत बसलेलं. गेट वाजतं, तशा दोघांच्या नजरा तिकडे वळतात आणि मग ठरलेलं नाट्य घडत राहतं... एरवी दोघे तिघे कधीतरी जातात गावाकडे. आज मात्र, अरे वा, हाही आलाय, तोही आलाय, तीही आलीये... सगळेच. तेही न सांगता, अचानक...खूप वेळ मग चेहरे न्याहाळण्यातच जातात. कुणी कुणाकडे बघायचं, कुणी कुणाशी काय बोलायचं..... काही क्षण कुणालाच काही सुचत नाही. सगळं भारावलेलं. तेवढ्यात पावसाला सुरुवात होते. तो लय पकडतो. खिडकीतून सगळ्यांच्या नजरा आता बाहेर....
बाहेर पावसाचा आणि घरात माणसांचा सारा दिवस मग धुमाकूळ सुरू राहतो. जेवणाच्या पंगती मांडल्या जातात, पत्त्यांचे डाव रंगतात.... एवढ्या मोठ्या वर्तुळात पत्ते टाकण्यासाठी पणत्यांना रिंगणात उतवरलं जातं....
........
दिवस ढळून जातो, आता पाऊस थांबलेला. परतीच्या वाटा अपरिहार्य. मात्र ढग अधिक दाटून आलेले, काळेशार. त्याचं बरसणं गाव समृद्ध करणारं!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा