ऊर्जेची गोष्ट....

आजोबांना सात मुली आणि दोन मुलं अशी नऊ अपत्य. सगळ्यात मोठ्या मुलीत आणि छोट्या मुलीत तब्बल पंचवीस वर्षांहून अधिक अंतर. आई आणि मुलगी एकाच वेळी बाळंत होण्याचा तो काळ. या सगळ्या भावंडांची मिळून ३३ अपत्य. ब-याच जणांचा जन्म आजोळीच झालेला. तिथल्या प्रशस्त घरात बाळंतिणीची एक खोली कायम जोपासलेली. कुणी ना कुणी आहेच, त्या अंधा-या खोलीत.
नऊ भावंड असण्याचं एक बळही असतंच. एक कुणी आजारी पडलं की, सेवेला फौजच धावणार. एक दवाखान्यात, एक डबा पोचवण्यासाठी, एक डबा करण्यासाठी घरी, एकीकडे तिची लेकरं सोपवलेली. सुट्यांत कायम कुणाची ना कुणाची मुलं, कुठल्या ना कुठल्या मावशीच्या घरी मुक्कामाला. हे बरीच वर्ष चाललं. नंतर मात्र काळानुसार पांगापांग होत गेली. भेटीगाठी कमी होत गेल्या.
फिसरेकरांचा वाडा, लिमयेवाडी, पत्कींचा वाडा, समुुद्रेंचा वाडा वगैरे जी काय घरांची ओळख असते, परवलीचे शब्द असतात ते हळूहळू विरत गेले. नोक-या, बदल्या, जबाबदा-या, दुर्घटना यात गुरफटून मग एवढं अंतर पडत गेलं की, पुढच्या काळात अभावानेच कुणाच्या भेटी झाल्या. दरम्यान तीन बहिणी, एक भाऊ आणि दुस-या पिढीतील पाच भावंडेही गेली.
......

अलिकडच्या काळात यातली काही भावंडं निवृत्त झाली, बरीचशी आजोबाआजीही झाली. कुणी संशोधन क्षेत्रात, कुणी कवयित्री, कुणी अभिनेत्री, कुणी चित्रकार, कुणी आणखी कुठल्या कुठल्या क्षेत्रात नावही कमावलं. पण एकत्र भेटी नाहीच. एकदिवस काहींनी ठरवलं, चाळीसेक वर्षांंचा काळ लोटलाये. या मंडळींना पुन्हा एकदा एकत्र करता येईल काय? सोशल मिडीया आहे. कोण कुठे आहे याचा अंदाज घेता येईल, संपर्क साधता येईल.
खरं तर हा काळ उपसून काढण्याचा प्रयत्न आपण करावा काय? इतकी वर्ष होवून गेली, कोणी येईल काय, आले तर मिसळतील काय? असे अनेक प्रश्न समोर होते. जे होईल ते होईल, प्रयत्न तरी करून बघता येईल. आता नाही तर पुन्हा कधीच नाही. मग धडाधड शोधाशोध सुरू झाला. नंबर मिळत गेले, संपर्क होत गेला. यात दोन वर्ष उलटली.
एकदिवस मग ठरलाच कार्यक्रम. निमित्त होतं, आईच्या आणि वडिलांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचं. अर्थातच त्यांना न सांगता ठरवलेला हा सरप्राईज कार्यक्रम. दोन स्पष्ट हेतू होते. एक दोन बहिणींची भेट घडवून आणणे आणि दुसरा हेतू सगळ्या भावंडांनी पुन्हा एकत्र येणे, आठवणी जागवणे, बस्स!
गेल्या काही महिन्यांपासून आईला तिच्या मोठ्या बहिणीची- ताईची सातत्याने आठवण येत होती. तिचं लहानपण तिच्याकडे गेलेलं. तिच्या भेटीची ओढ लागलेली; पण भेट होईल याची बिलकुलच आशा सोडलेली. कारण बहीण ९५ वर्षांची, शिवाय राहायला चारशे किमी अंतर दूरवर. तर आईने ऐंशी पार केलेली. तिला प्रवास वज्र्य. एकदा ठरलं, दोन गावाच्या मधलं गाव निवडायचं. त्यांनी तिकडून निघायचं, आम्ही इकडून निघायचं; पण मग ती कल्पना बाद ठरली.
प्रश्न होता, भेट घडवणार कशी? ताईच्या मुलांनी बोलता बोलता एकदा विचारलंच तिला. ‘ताई, तुला माईकडे जायचंय काय गं?’ तिचा उत्साह दांडगा. ती सुनेला म्हणाली, ‘मला आळिवाचे लाडू करून घाल आठवडाभर. मग गाडीत बसून कंबर दुखणार नाही. जातेच मी तिच्याकडे.’ हा प्रसंग होवून काही महिने उलटून गेले. गोष्ट विसरूनही गेली. तब्येतीचा अंदाज घेवून, डॉक्टरांचा सल्ला घेवून मग एकदिवस तिच्या मुलांनी तिला घेतलंच सोबत.
.......
... आणि ती आलीही. गाडीत बसून, सलग. एका नातवाचं प्रशस्त घर हे या भेटीसाठी ठरलेलं स्थळ.
तर एका संध्याकाळी त्याच्या घरासमोरच्या बागेत उभं राहून आई बाहेर बघते आहे. अचानक गेटकडच्या बाजूने तिला हालचाल दिसते आहे. कुणीतरी कुणाला तरी धरून आणतंय. अंतर कमी होत जातं, तसं डोळ्यात चमक येते. पलिकडूनही अंदाज घेतला जातोय, समोर कोण उभंय. डोळ्यात प्रश्न आहेत, प्रश्नासोबत पाणीही वाहतंय.......दोन बुजूर्ग नद्यांचा संगम, त्याला मिळालेले छोटे छोटे प्रवाह.... पुढे सगळं शब्दातीत. वर्णनापलिकडचं.
रात्रभर मग दोघींच्या गप्पा झडत राहतात, पुढे तीन दिवस चालत राहतात. एक हातवारे करत सांगतेय, दुसरी मान डोलावतेय. काही शब्द कळताहेत, काही नाही कळत; पण उत्साह जुनाचंय. दोघींना मोठा बेड दिलाय झोपायला. नंतरच्या तीन पिढ्या सभोवती घिरट्या घालताहेत. दोघी एकमेकींकडेच बघताहेत. डोळ्यातून अखंड टपकताहेत जगलेल्या काळातले कडूगोड प्रसंग, त्यांना शब्दांची गरज नाहीयेय. ताई चष्म्यातून आपल्या छोट्या बहिणीकडे टुकूर टुकूर पाहतेय, न्याहाळतेय. मग अचानकच तिच्यातली मोठी बहीण जागी होते, म्हणू लागते, ‘हे बघ माई, वय झालंय तुझं, जरा जपून राहा. काठी घेवून चालत जा. अगं, केवढी उंच उशी घेतलीयेस, काढ ती आधी. मान दुखेल. रात्री उठावं लागलं तर मला सांग, मला अजून काठी लागत नाही......’ अशा काळजीच्या कितीतरी गोष्टी.
.......

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा