प्रत्येकाने भ्यालंच पाहिजे.....
... रेडिओवर ‘थँक्यू मिस्टर ग्लॅड’ चालू होतं. मध्येच खरखर आवाज यायचा. रात्रीची शांतता, सभोवती अंधार. आम्ही सतरंज्या टाकून दाटीवाटीने टेकून बसलेलो. चाकांचाच तेवढा आवाज चालू. रस्ता ओबडधोबड. बैलगाडी धिमेधिमे चालली होती.
डोंगरातल्या कुठल्या एका देवळात जावून गावी परतत होतो. थोडंच अंतर राहिलं होतं. पुढे नदीचं पात्र. ती ओलांडली की, मग लांबलचक पांदी आणि लगेच गाव. नदीतून पांदीत शिरताना अंधार अजूनच दाट व्हायचा. पांदीच्या दोन्ही बाजूने किमान पंधरावीस फूट उंचावर शेतं. झाडी गच्च. रात्री तर अंधा-या बोगद्यातून गेल्यागत वाटायचं. रस्ता सरावाचा असल्याने अंधुक प्रकाशात पार व्हायचा.
तर आम्ही नदीच्या पात्राजवळ आलो. रेडिओवर नाटक चालूच होतं, सगळे त्यात एकाग्र. अचानक एकाचं समोर लक्ष गेलं, त्याला नदीपात्रात हालचाल दिसली. मग सगळ्यांचीच नजर तिकडे गेली आणि दरदरून घाम फुटला. नदीचं पूर्ण पात्र वाहतं नव्हतं; पण एका बाजूला खोलगट भागात पाणी होतं. तिकडून दुस-या तिरावर जाता यावं म्हणून एक वेडंवाकडं लांबलचक खोड पुलासारखं ठेवलेलं होतं. त्या आडव्या खोडाच्या मधोमध, खाली पाय सोडून बसलेली एक पांढरी आकृती दिसत होती. दिसतो तर माणूसै; पण अशा अवेळी कोण बसणार इथे? हा भास असण्याची शक्यता होती. समजा असेलच कोणी तर ते कोण असू शकते? अनेक प्रश्न होते. तेवढ्यात त्या आकृतीने पाय हलवले आणि पाणी उडवलं, तसं पाणी चमकलं. ते अंगावर उडाल्यागत आम्ही दचकलो.
रेडिओवर नाटक चालूच होतं; पण ते ऐकण्याचा बहाणा होता, लक्ष मात्र नदीपात्रातल्या हालचालीकडे होतं. आम्ही अधिक घाबरण्याचं दुसरं एक कारण होतं, ते म्हणजे ती आकृती दिसत होती, त्याच बाजूला काही अंतरावर स्मशान होतं.
खोडावरच्या त्या पांढ-या आकृतीने आता पाय वर घेतले. ती खोडावर उभी राहिली. या तिरावरनं त्या तिरावर अशा दोन चकरा त्या आकृतीने मारल्या. म्हणजे हा भास नव्हता, खरंखुरंच तिथे कुणीतरी होतं. आम्ही आता पुरते टरकलेलो. काही वेळाने ती आकृती काठावर चालत चालत पुढे गेली आणि थेट पांदीत शिरली. काळ्याकुट्ट अंधारात एक पांढरा तुकडा दूरवर जाताना दिसत राहिला. आम्ही बराच वेळ पांदीच्या तोंडाशी खिळून राहिलो. आत शिरायची हिंमतच होईना.
.......
खूप वर्ष होवून गेली. आता नदीवर पूल झालाय. पांदीचा वापर राहिलेला नाहीये, त्यात गावाचं सांडपाणी सोडलंय. बैलगाडीने एवढा प्रवास आता कुणी करत नाही. नदीतही कुठल्याच बाजुने खोड ठेवायची गरज राहिलेली नाही, कारण तिला पूर्वीसारखं पाणीही राहिलेलं नाही. मात्र आमच्या मनात ‘थँक्यू मिस्टर ग्लॅड’ या नाटकाशी ते खोड आणि ती पांढरी आकृती यांची आठवण कायमची चिटकून बसली आहे.
.......
नातलगांना पुरतं घाबरून सोडायचं आणि दुस-या दिवशी त्यांची भरपूर खिल्ली उडवायची केवळ याच उद्देशाने अंधा-या रात्री नदीकाठी, स्मशानाशेजारी तासंतास बसून राहणारा माणूस जातिवंत चेष्टेखोर म्हणायला पाहिजे. आमचा प्रवास बैलगाडीचा, येण्याच्या वेळा निश्चित नाहीत. तरीही निव्वळ वेळेचा अंदाज घेवून तिथं एकट्याने आधी येवून थांबायचं, बैलगाडीची चाहुल लागताच नदीच्या पाण्यात पाय सोडून बसून राहायचं, नंतर अंधा-या पांदीतून एकट्याने निघून जायचं, असं करायला केवढं कमालीचं धाडस लागत असेल. तो जिगरबाज आमचा भाऊबंद होता. साहजिकच दुस-या दिवशी, आम्ही त्याच्या चेष्टेचा विषय झालोच. आमच्यापैकी कुणीतरी आवेशात रात्रीचा थरार सांगायला गेला आणि तो जे हसत सुटला की बस्स! केवळ एवढ्या क्षणिक आनंदासाठी तर त्याने सगळं घडवून आणलं होतं.
तो आता राहिला नाही. काही वर्षांपूर्वी एका अपघातात गेला. आता तेवढी चेष्टा करणारं, त्यासाठी एवढं नियोजन आणि धाडस करणारं कुणी राहिलं नाही आणि ते हसण्यावारी नेणारे आणि आपलीच टर एन्जॉय करणारे तर बिलकुलच नाही. नव्या काळात चेष्टामस्करी स्वत:च एक पांढरी आकृती झाली असून ती बाह्या मुडपून बसलीये. प्रत्येकानं भ्यालंच पाहिजे!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा