कोकिळेची दादागिरी आणि आणि तांबटची गँग!

माझ्या मनात आता कोकिळेची इमेज पूर्वीसारखी राहिलेली नाही. उलटपक्षी जरा फसल्याचीच भावना आहे. परवाचं तिचं वर्तन मला खटकलं. कोकिळेचा अप्पलपोटी स्वभाव कळाला तर ‘गानकोकिळा’ वगैरे शब्द कुणी वापरणारही नाही.
तर घडलं असं की, मी परवा वाड्यात गेलो तर ही बया अगदी फूटभर अंतरावर, एकटीच. झाडाची ती फांदी नेमकी दाराजवळ होती. माझी चाहुल लागतात ती चटकन उडून पलिकडच्या आंब्यावर गेली. मला हळहळ वाटली. तिचं अर्धवट अंजीर तसंच होतं झाडावर.
नंतर एक होला आणि एक बुलबुल झाडावर आले, तिने उष्टावलेल्या अंजीराचा आस्वाद घेवू लागले. माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं, तेवढ्यात आंब्यावरनं झेप घेत बया वेगात झाडावर नेमकं होलाच्या शेजारी आली. तो भुर्रकन उडाला. दुस-या फांदीवर गेला, बया तिथंही गेली. तो गेल्यावर तिने बुलबुलच्या अंगावर धाव घेतली. त्यालाही पिटाळून लावलं. नंतर वरच्या फांदीवर बसून सभोवार बघू लागली, जणू काय राखणदार आहे. तिचा तो अवतार बघून नंतर कुठलाही पक्षी तिकडं फिरकला नाही. एखाद्या खाष्ट काकूसारखी वाटली ती मला. माझ्या मनातून काही क्षण उतरलीच बया. वाटलं, च्यायला आपल्यालाच भलं कौतुक; पण खरं म्हणजे ती दिसायलाही तेवढी डौलदार नाहीयेय. त्यापेक्षा भारद्वाज तरी ऐटबाज वाटतो.

काल मात्र तिचा सगळा माज आणि मस्ती तांबट पक्षांच्या गँगनं उतरवली. अशीच दुपारची वेळ. झाडाची पानं गळून पडल्यानं बहुतांशी फांद्यांवर अर्धवट खाल्लेल्या लालभडक अंजीराची माळच दिसते आहे. तर ही बया बसली होती वरच्या फांदीवर चिंतनमुद्रेत राखण करत. स्वत:चं पोट गच्च भरून गेलेलं असणार. तेवढ्यात एक तांबट आला. त्यानं उष्ट्या अंजीरात चोच खुपसली, तर बया त्याच्या अंगावर. ते बेणं कमी नव्हतं. ते उडायचं, फांदी बदलायचं, पटापट खायचं आणि ती आली की, पलिकडच्या आंब्यावर जायचं. हे बराच वेळ चाललं. नंतर आणखी तीन तांबट आले. आणि नंतर जो खेळ सुरू झाला, ते एक अप्रतिम नाट्य होतं.
एक तांबट खालच्या फांदीवर बसायचा, ती उडत आली की, दुसरा वरच्या फांदीवर, ती तिकडे उडायची की तिसरा तिचं लक्ष वेधत बाजूच्या फांदीवर, ती पुन्हा तिसऱ्याच्या दिशेने. या तांबटचा खाण्याचा वेग एवढा जबराये की बस्स! एकीकडे चोचीवर चोची हाणत अंजीर फस्त करायचा आणि तिची चाहूल लागताच उडायचं. जवळपास तासभर तरी हा खेळ अखंड चालू होता. एवढं चिंगाट उडवलं त्यांनी तिला की, बया नंतर थकून कंटाळून गेली आणि एका फांदीवर सुन्न बसून राहिली. नंतर माझ्याकडे शेपूट करून एकदा शिटलीही.
तांबट फळांचे शौकिन असतात. वाड्यात त्यांचं मला हे पहिलंंच दर्शनै. आपल्याला जबरा आवडून गेली त्यांची सांघिक कामगिरी! आपल्यापेक्षा बलाढ्य असलेल्याची कशी फजिती करावी आणि कशी जिरवावी हे इटुकल्या पिटुकल्या तांबटच्या टोळीकडून शिकावं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा