ऊर्जेच्या गोष्टीचा उत्तरार्ध...

आठवणीचा महावृक्ष उन्मळून पडला की पाखरं सैरभैर होतात, ताईमावशी गेली, तेव्हा हेच झालं. ‘सेव्हन सिस्टर्स’पैकी तीन पानं आधीच गळून पडलेली. ताई सगळ्यात मोठी. तिच्या फांद्या दूरवर पसरलेल्या. आईची आणि तिची भेट घडवून आणून उणेपुरे दहा दिवसच झाले असावेत. तेव्हाचं ते दोघींना समोरासमोर आणणं, त्यांच्या चेह-यावर दाटून आलेले आश्चर्याचे भाव आणि आनंदाने पाझरणारं पाणी सगळं असं समोर आलंय.
आई दुसरीत होती तेव्हा तिला तिच्याकडे शिकायला ठेवलं होतं, तब्बल सात वर्ष. ताईच्या संसाराची तेव्हा नुकतीच सुरुवात झालेली. या काळाची ती साक्षीदार. तिच्या बाळंतपणात घर सांभाळून नेणारी साताठ वर्षाची चिमुरडी. म्हणून आठवणींचा तो प्रचंड पट. तब्बल सत्तर वर्षांपूर्वीपासूनचा. या दोघींनी आता प्रत्यक्षात भेटून काही दिवस एकत्र राहावं म्हणून केलेला आटापिटा हा शेवटचा ठरला; पण भेट घडवून गेला. जणू नियतीनेच ही भेट ठरवलेली असावी.
ताईच्या जाण्याचा आकांत नाहीयेय; पण भरून आलंय आभाळ सगळं. पंचाण्णव वर्षांचं समृद्ध आयुष्य जगली ती, अगदी निरोगी. बरं तिचं जाणंही अगदी तिच्याचसारखं, कुणालाही कुठलाही त्रास होऊ नये असं. दोनपाच दिवस जुन्या आठवणीत रमली. व्हिडीओ पाहिले, फोटो पाहिले. राहत्या घरात मुलं, लेकी, सुना, नातवंडांच्या गोतावळ्यात गप्पाटप्पा करत ‘येते’ म्हणत शेवटच्या प्रवासाला निघून गेली. संपलं!
अगदी मृत्यूपूर्वी आठ दिवस आधी मुलांसुनांसोबत प्रवास करावा, बहिणीसोबत चार दिवस घालवावे, द्यायचे तेवढे प्रेम द्यावे, घ्यायची तेवढी काळजी घ्यावी. तिला उत्साहाच्या चार गोष्टी सांगाव्यात, याच काळात झाडून सगळ्या नातलगांच्या भेटी व्हाव्यात, त्यांच्यासोबत फोटोसेशन व्हावं, पुढच्या पिढ्यांच्या ओळखी व्हाव्यात आणि नंतर आपल्या घरी परतून आठवणी जागवाव्यात... त्यांचा क्रम संपण्यापूर्वीच एकदिवस शांततेत जगातून निघून जावंं. आणखी कसं हवं असतं मरण!
आयुष्य हे असं असावं. सरळ, साधं, संपन्न!
राग नाही, लोभ नाही, कुणाबद्दल तक्रार नाही, उपसलेल्या कष्टाचा कधी उच्चार नाही.
स्मरणात असेल ते आता फक्त तिचे ते निरागस हास्य!
शिवाय कुतूहलाच्या गप्पांत असेल, चाळीसच्या दशकात तिचं सायकलवर शहर पालथं घालणं, तिचे गुडघ्यापर्यन्त असलेले लांबसडक केस, तिचा गोल फ्रेमचा चष्मा, तिच्यातली मृदू स्वभावाची शिक्षिका, तिने इतरांत रुजवलेलं बागकामाचं वेड, तिचं लिमयेवाडीचं घर, तिच्याकडचा भारदस्त मोत्या..... असं खूप काही.
.....
दोघींच्या या भेटीतच मला नानूची गोष्ट कळाली, सत्तर वर्र्षापूर्वी घडलेली. इतकी वर्ष झाली, हा विषय पुसटसाही कधी आला नव्हता. या दोघी भेटल्याच्या रात्रीच ती गोष्ट अचानक समोर आली. तल्लख बुद्धीमत्ता लाभलेला; पण अल्पवयातच गेलेला नानू.... रात्री उशिरा या कथेचा प्रारंभ झाला, नंतर त्याचे पदर उलगडत गेले. भन्नाट गोष्टै ती. असं केवढं काय काय घडलं असेल त्या काळात....
माणूस गेला की, त्याच्यासोबत कितीतरी गोष्टी जातात....
माणूस जाणं हे अटळ आहे; पण गोष्टी गेल्या नाही पाहिजेत, गोष्टीच माणसाला जगवतात, जगणं शिकवतात!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा