बातम्या, टिकटॉक आणि घरेलु उपचार

खरं तर युट्यूबवर बातम्या बघत होतो, आपोआपच टीकटॉक लागलं. ते बातम्यांपेक्षा भारी वाटलं. त्यात बराच वेळ रमून गेल्यावर अचानकच कुठलीतरी कळ दाबली गेली आणि पाच मिनीटात दाढदुखी थांबवा, मधुमेह कायमचा बरा करा, पंधरा दिवसांत वजन घटवा, पाच मिनिटात पोट साफ... वगैरे वगैरे व्हीडिओ लागू लागले. तेही बरेच वाटले. किमान हे उपयोगाचे तरी आहेत.
बरं, हे घरेलु उपचार जबरा असतात. त्याला काहीच खर्च नाही, घरातच सगळ्या वस्तू मिळतात. शिवाय साईड इफेक्ट पण नाही. परवा आंब्याचं कोवळं पान गंमत म्हणून खाल्लं होतं, त्याबद्दल काही सापडतंय का म्हणून शोधायला गेलो तर ते भलतंच गुणकारी निघालं. पोटाच्या विकारापासून दाढदुखीपर्यंत काही पण सांगा, आंब्याचं पान त्यातून तुमची सुटका करतंय म्हणे! च्यायला भारीच की!!
गेले कित्येक वर्ष मी अंगण झाडतोय. गळून गेलेले आंब्याचे पानं कंपोस्टसाठी वापरत असलो तरी पूर्वी मी ते कच-यात टाकायचो. आता कळालं की, ते फेकू नयेत. त्याची भुकटी करावी. ती गुणकारी असते. कोमट पाण्यात घेतल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. माहितीअभावी आमचे किती वर्ष विनाकारणच पाण्यात गेले म्हणायचे. एवढ्या वर्षात केवढी भुकटी झाली असती, संपूर्ण शहराच्याच पोटाचा विकार गेला असता.
मग आणखी काही झाडांचे पानं शोधले.
आता ठरवलंय, सकाळी उठलं की, झाडावर चढून थोडा वेळ आंब्याचे कोवळे पानं खायचे. नंतर खाली उतरून कडीपत्त्याचे पानं खायचे, त्यामुळे केस मुलायम होतात म्हणे. मग अजून पुढे जावून कोरफडीचा गर काढायचा आणि तोंडाला फासायचा. त्याने तरतरीत चेहरा दिसू लागेल म्हणे! मग निंबाची काडी तोडून त्या काडीनं दात घासायचे. दात पांढरे शुभ्र आणि कीड हद्दपार म्हणे! नंतर मग लिंबं तोडायचे, त्याच्या सालीसहित मिक्सरमधून त्याचा चोथा काढायचा. तो कोमट पाण्यात घ्यायचा, त्याने वजन कमी होतं म्हणे!
महिनाभरात झाडांवरनं उड्या मारता आल्या पाहिजेत, अशी निरोगी, लवचिक देहयष्टी आणि डोक्यावर घने काले बाल, काय जबरदस्त दिसेल ते, मस्त!
.....
बस्स, दरम्यानच्या काळात शेपूट येवू नये म्हणजे मिळवली!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा