न्यूनगंड
बुटंफिटं वगैरे जामानिमा करून आपण सिमेंटच्या रस्त्यावरनं फिरायला निघालेलो असतो. समोरून एक भल्या मोठ्या ढेरीचा माणूस येताना दिसतो. तो चालत असतो, ती डुलत असते. आपण मग आपल्या पोटाकडे पाहतो. असतं; पण तेवढं नसतं.
त्या माणसाच्या बेफिकीरीचा मग आपल्याला राग यायला लागतो. केवढं वाढलंय पोट, तब्येतीबद्दल एवढा हलगर्जीपणा असतो काय? नगारा होईपर्यंत वाट बघत बसला होता काय? अवेरनेसच नाहीयेय लोकांत वगैरे ‘आपलं ते पोट, दुस-याची ती ढेरी’ लाईनवर आपला मेंदू काळजी करत असतो...
तेवढ्यात आपल्या मागून दोन सावल्या पुढे येतात. आपलं लक्ष माणसांवरनं सावल्यांवर जातं. काही सेकंदात त्या सावल्यांच्या मालकिणी भरभर पुढे येतात आणि म्हणता म्हणता सावल्यांसह त्या दिसेनाशा होतात. हे चिटींग झालं. त्या पोळ्यावाल्या असणार. त्यांना फिरणा-यांच्या यादीत पकडायचं नाही.
एक बारकं येतं, पाठीवर स्कुलबॅग लटकावलेलं. त्याची सावली त्याच्याच वर्गात. ते पुढे जावून मागे वळून आपल्याकडे पाहतं. आपण समोर पाहतो. ते चिंगाट पळून जातं. ते आपल्याकडे बघून हसल्याचा उगाच आपल्याला भास होतो.
आपल्याला वाटायला लागतं, अरे आपण एकाच जागेवर उभे तर नाही? बाकीचे सगळे तर रोजच्या जगण्यात सामावून गेलेत. त्यांचा त्यांचा वेग आहे.
.....
सांगण्याचं तात्पर्य असं की, सांप्रतच्या काळात बहुतांशी नवनिर्वाचितांचं हे असं नवनिर्वासितांसारखं झालेलं असणार. आपण नेमके कुठे आहोत हेच कळत नसणार. चर्चा, बैठका, घोषणा सगळीकडूनच चालू आहेत. रोज नवी सावली येते, दिसेपर्यंत जाते. बारके पोरं हसून चिंगाट पळून जातात. आपण मात्र अजून एकाच जागेवर!
लोकांना तर द्यायचंय स्थिर सरकार, तूर्त आपणच अस्थिर!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा