बाजरीची भाकरी आणि ...

अष्टगंधाचा टिळा लावून आपल्यासमोर नैवेद्याचे ताट ठेवले जाते. आपली नजर टपकन बाजरीचा रोट आणि वांग्याच्या भाजीवर जाते. भरीतही खुणावत असतंच शिवाय हादग्याच्या फुलांचे भजे बोनस म्हणून असतात.

आपला हात सरसावलेला असतो. तर तिकडे भिडण्यापूर्वी आपण आधी भात, पुरण वगैरे अडथळे पार करण्याच्या विचारात असतो.

..... तर हाच विचार आपला घात करतो. अडथळे पार करून आपण बाजरीच्या रोटकडे येईतो आपला वेग मंदावलेला असतो. पेटलेल्या जठराग्नीत धुगधुग शिल्लक राहिलेली असते. असो.
...........

सांगण्याचा मुद्दा असा की, बाजरीची भाकरी या दिवसात मला प्रेयसीसारखी वाटते. तिच्या अंगभर असलेल्या पांढऱ्या तिळाचा ट्यटू मला खुणावत असतो. दुपारी ती आपल्याला भेटणार किंवा रात्री झोपतानाही सकाळी सकाळी तिचं ते कडकलक्ष्मी रुप पाहायला मिळणार हेच डोक्यात असतं, वारंवार आठवत राहतं. प्रवासात तर कधी एकदा ढाबा गाठू आणि तिला भेटू असं होतं. तिच्यासोबत शेवभाजी असेल तर बघायलाच नको.

भेटीची वेळ संध्याकाळची आणि बाहेरची असेल तर ही हुरहूर अधिकच वाढलेली असते. वांग्याची भाजी असो, भरीत असो, पिठलं असो किंवा ठेचा आणि जवस, का-हळ, शेंगदाणा वगैरे चटण्या असोत, त्यांच्याशी ती एकरुप असते. पण...पण तिची खरी मजा आहे ते नॉनव्हेजच्या रश्श्यासोबत.
आहाहा, स्वर्गीय आनंद!

टिप्पण्या