पालकप्राचार्य बोराडेसर!

शाळेत असतानाची गोष्ट. मोठ्या बहिणीने माझं मराठीचं पुस्तक पाहिलं आणि म्हणाली, हे सर तर आमचे प्राचार्य आहेत. मी म्हटलं, तू पाहिलं आहेस का यांना? ती म्हणाली, रोजच पाहते.

आपल्याला धडा असलेला लेखक बहिणीला रोज पाह्यला मिळतो याचं मला तेव्हा आश्चर्य वाटलं. ती वैजापूरच्या विनायकराव पाटील कॉलेजात होती आणि मी चिंचोलीच्या माध्यमिक शाळेत. मला तिच्यावर विश्वास बसला नाही. वैजापूरला गेल्यावर मग धड्याचे लेखक दाखवण्याची विनंती केली. ती म्हणाली, सकाळी दहाच्या आसपास नवजीवन कॉलनीच्या तोंडाशी उभा रहा. तिथे बाहेर झोपाळा टांगलेला एक बंगला आहे. त्यातून निळसर स्कूटरवरून जाताना दिसतील तुला ते.

मग सलग दोनचार दिवस त्या वाटेवर मी त्यांना बघत राहिलो. धड्याचा लेखक प्रत्यक्षात असतो, तो दिसतो, आपण त्याला जवळून पाहू शकतो याची त्यावेळी गंमत वाटायची. चिंचोलीत मी वर्गमित्रांना सांगितलं तर एकानेही यावर विश्वास ठेवला नाही. उलटपक्षी आठवडाभर खिल्लीच उडवली.

रा. रं. बोराडेसरांची माझी ती पहिली भेट. एकतर्फी. नंतर मीही वैजापूरच्याच कॉलेजात दाखल झालो आणि या लेखकाला जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. बोराडे सरांच्या नावाला प्रचंड वलय होतं. बडीबडी मंडळी त्यांच्यामुळे कॉलेजला येत. भास्कर चंदनशिवही तेथेच होते. कधीकधी मी एकटाच विद्यार्थी असल्याने प्राचार्याच्या केबिनमध्येही माझा तास होई. बोराडेसरांकडून चंदनशिव आणि चंदनशिवसरांकडून बोराडे शिकण्याचा दुर्मीळ योग माझ्या वाट्याला आलेला आहे.
......
त्यांच्या काळात वैजापुरच्या कॉलेजात आणि वैजापुरातही वाङ्मयीन कार्यक्रमांची खूप रेलचेल होती. सांस्कृतिकदृष्ट्या शहर संपन्न होतं. स्वत: बोराडेसरांची भाषणं म्हणजे पर्वणी असे. त्यांची कथा सांगण्याची लकब आणि त्यांतला हलकाफुलका विनोद प्रेक्षकांना हसवून हसवून त्यांची मुरकुंडी वळवे.

विद्यार्थ्यांशी वागण्याची बोराडेसरांची पद्धत फार जिव्हाळ्याची असे. त्यांचा चेहरा मायाळू पालकाचा होता, कडक प्राचार्याचा नव्हता. त्यामुळे त्यांची सहसा भीती वाटायची नाही. त्यातही ते स्वत: लेखक असल्यामुळे दर्जेदार कॉमेंटना त्यांची दादच असे.

कॉलेजात तिस-या मजल्याचे काम चालू होते. त्याकाळातली गोष्ट. दुस-या मजल्यावर जाण्यासाठी जो जिना होता त्याला कठडा नव्हता. सिनियर असणा-या सुभाष कोठारीने त्यावर एक कॉमेंट केली होती आणि ती खडूने जिन्यावर लिहिली होती. त्याने लिहिले होते, ‘ये जिना है या मरना.’ बोराडेसरांनी नंतर या कॉमेंटचे एवढे जाहीर कौतुक केले की बस.

बांधकाम चालू असतानाचीच गोष्ट. आम्ही काही जणांनी मिळून कॉलेजात एक भित्तीपत्रक काढलं होतं. वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनात त्याचंही प्रकाशन करावं असं ठरलं. मात्र औरंगाबादहून पाहुणेच लवकर आले नाहीत. त्यांची वाट पाहून शेवटी आम्ही कंटाळलो आणि बांधकामावरच्या मजुराच्या हस्ते त्याचं प्रकाशन करावं असं ठरवलं. लगोलग एका वयस्क मजुराला बोलावलंही. तो स्टेजवर बसायला तयारच होईना. बोराडेसरांच्या शेजारी कसा बसणार? शेवटी मग सरांनाच बोलावून आणलं. सर आले. त्यांनी त्याला शेजारी बसवून घेतलं आणि प्रकाशन झालंही.

सरांवर भरपूर काही लिहायचंय.
तूर्त त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच!
सरांना लाख लाख शुभेच्छा!!

टिप्पण्या