सातभाईंचं संयुक्त कुटुंब

सातभाई पक्षी मला कायम संयुक्त कुटुंबाचे प्रतिक वाटतात. माझ्याकडे त्यांची कायम उठबस असते. आळे खांदून वगैरे ठेवलेले असले की, त्यादिवशी त्यांची हमखास हजेरी असते. बस्स, ते माझ्याकडचे गांडुळ गट्टम करतात एवढीच एक गोष्ट अस्वस्थ करते.
पूर्वी काही घरामध्ये चारपाच कर्तबगार भाऊ असायचे. घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असायची. शेतीभाती, उद्योगधंदे यातल्या कामाची वाटणी, नियोजन ते एकमताने करायचे. त्यांचा सर्वत्र दरारा असायचा आणि त्यांचा आधारही वाटायचा. तसेच मला हे सातभाई वाटतात.
कोकिळ जशी कावळ्याच्या घरट्यात अंडे घालते, तसे चातक किंवा पावशा आपली अंडी या सातभाईच्या घरट्यात घालतात, असं मध्यंतरी वाचनात आलं आणि सातभाईबद्दलच्या भावनेला पुष्टीच मिळाली. आपल्या पिल्लांसोबत बाकीच्या पिल्लांचंही संगोपन या सातभाईंना करावं लागतं. त्यातही त्यांच्या स्वत:च्या पिल्लांपेक्षा ही दुसरी पिल्लं अधिक खादाड असतात म्हणे!
एवढे पोरबाळं सांभाळायचे म्हणजे सातही जणांना अन्नासाठी बाहेर पडणं आलंच. अधिकची जबाबदारी कुटुंब एकत्र ठेवायला मदत करते तर!
.....
अजून एक, सातभाई इंग्रजीत गेले की त्यांचं जेंडर बदलतं. त्यांना तिकडं ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणतात म्हणे!
फोटो : नेट. मोबाईलच्या कवेत येत नाहीत पठ्ठ्याचे!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा