हॅलो, कोण बोलतंय?

रात्रपाळी होती. साडेअकरा ते बाराचा सुमार. मोबाईल वाजला.
म्हटलं, हॅलो!
‘तुम्हीच बोलताय ना.’ पलिकडून एक नाजूक आवाज.
‘हो, मीच बोलतोय.’
‘हं, मी मीच बोलतेय, कुठंय तुम्ही?’
‘ऑफिसमध्ये?...कोण बोलतंय?’
मी संभ्रमात. नेमका कुणाचा फोनै? मी कुठे असण्याशी या बाईचा काय संबंध?
मी म्हटलं, ‘तुम्ही कोण बोलताय? बहुतेक तुम्ही चुकीचा नंबर लावलाय.’
पलिकडून फोन ठेवला गेला.
.....
आठदिवसांनी पुन्हा त्याच वेळात, तोच फोन. त्या महिनाभरात खूपदा असं घडलं. ‘तुम्हीच बोलताय ना, मी मीच बोलतेय..., कुठेय तुम्ही? घरी कधी येताय?’ एवढाच एकतर्फी संवाद. आणि मग मी म्हणायचं, ‘रॉंग नंबर.’ लगेच फोन बंद केला जायचा. मला अपराधी वाटायचं. आपण फारच उद्धटपणे रॉंग नंबर म्हणतो, त्या बाईंच्या भावना दुखावतो असं काहीसं. एखाद्या सुरेल गाण्यात अचानक भसाडा आवाज उभरून यावा तसा आपला आवाजै असंही.
....
या गोष्टीला अनेक वर्ष लोटली. मोबाईलची पहिलीच पिढी रुजू लागली होती तेव्हाचा हा काळ. या रॉंग नंबरने मला त्या काळात फार अस्वस्थ केलं. रात्रपाळीला असलो आणि फोन वाजला की, धडकीच भरायची. तोच काळजी करणारा नाजूक आवाज असणार आणि पुन्हा एकदा आपल्याला रॉंग नंबर म्हणावं लागणार. बाई खट्टू होवून फोन ठेवणार. तेवढी रात्र मग त्या बाईच्या काळजीत जायची. तिचा तो माणूस रात्री अपरात्री कुठे जातोय, नोकरीवर की कुठे पीत बसलेला असतो? तिच्या आवाजात एवढी काळजी का असते? ही नवविवाहिता असावी काय? तिचा तो ‘तुम्हीच बोलताय ना.’ आता घरी पोचला असेल काय? त्यानं लवकरात लवकर घरी जावं अशी मनोमन प्रार्थनाही करायचो मग. वाजलेला फोन मात्र दुसराच निघाला की, प्रचंड रिलॅक्स वाटायचं. चला, आज ते महाशय बाहेर कुठे कडमडले नसणार. आनंद वाटायचा.
इतकी वर्ष झाली; पण एखाद्या पावसाळी रात्री, अचानकच त्या फोनची आठवण येते. तिचा तो आवाज टेप केल्यागत तिच्या काळजीसगट स्मरणात पक्का रुतून बसलाये. मग वाटत राहतं, कसा असेल तिचा संसार? तिची काळजी मिटली असेल काय? तिच्या ‘तुम्हीच’ चं रात्रीअपरात्र गायब होणं बंद झालं असेल काय? कोण असेल ती? इश्वरा, तिचं सगळं खुशाल असू दे!

टिप्पण्या