अशी पकडायची पँट आणि ....

मित्राच्या समोरच्या खिशातलं पेन काढायचं, त्याचं टोपण वेगळं करायचं आणि नंतर टोपण लावून पेन त्याच्या खिशाला लटकवायचा. अचानकच समोरच्याच्या शर्टाची वरची गुंडी काढायची, ती पुन्हा लावायची...वगैरे वगैरे. काय डेंजर सवयी असतात एकेकाला.
एका महाशयांना मात्र अजबच सवय होती. चारपाच मित्र गप्पा मारत कुठे उभे असतील तर हे महाशय बोलता बोलता अचानकच शेजारच्याची पँट मागच्या बाजूने पकडायचे आणि वर ओढायचे. पँटवाल्याला काय झालं कळायचंच नाही, तो बावचळून बघत राहायचा. काचल्यामुळे त्याला शब्द फुटायचे नाहीत; पण तो भलताच ऑकवर्ड झालेला असायचा.
नेहमीच्या मित्रांचं ठिकै; पण काही वेळेस अनोळखी माणसांच्या बाबतीतही असं झाल्याने एकदा हाणामारीचा प्रसंग उद्भवला होता. त्यांच्या या सवयीने मित्र वैतागून गेले होते. आपला नातलग किंवा दुसरा नवा मित्र सोबत असेल तर त्याला शक्यतो यांच्यापासून दूर ठेवण्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.
एखादा सज्जन मित्र असतो असा की, त्याला अशा व्यक्तींना सरसगट नावं ठेवण्यापेक्षा सवयीच्या मूळापर्यंत जावं वाटतं. तर तसा एकजण होताच, त्या मित्रांत. मग त्याने घेतलं या महाशयांना एकदा रिग्ग्यात. अशी सवय कशी लागली, कधी लागली वगैरे... तर झाला तो खुलासा असा-
एक कार्यक्रम होता. सभागृह गच्च होतं. व्यासपीठावर पाहुणे बसलेले. सत्कार चालू होते. एक मोठं नाव पुकारलं गेलं आणि तेवढ्याच मोठ्या देहाचा माणूस स्टेजवर आला. प्रेक्षकांकडे पाठ करून त्या देहाने सत्कार स्वीकारला. सुटलेलं पोट, घसरणारी पँट, शॉर्ट शर्ट, आत बनियन नाही आणि वाकण्यात भलतीच विनम्रता. मग व्हायचं तेच झालं. सत्कार करणा-या पाहुण्यांना कळेना, टाळ्या वाजणं साहजिक आहे; पण हशा कशासाठी? तर त्या देहाचं ते रूप बघावं लागलेल्या प्रेक्षकांत हे महाशयही होते. इतरांनी तिथल्या तिथं हसून तो प्रसंग विसरूनही टाकला; पण या महाशयांच्या डोळ्यापुढून काही ते दृष्य कायमस्वरुपी जाईना. खरं तर असा बाका प्रसंग बघता आपणच पटकन स्टेजवर जावून त्यांची पँट वर ओढायला पाहिजे होती. तसं न करता बघ्याची भूमिका घेवून आपण हसत राहिलो हे त्यांच्या मनाला लागून राहिलं. पण आता उपयोग नव्हता. व्हायचं ते होऊन गेलं होतं.
त्या गंडांतून मग या महाशयांनाच वारंवार स्वत:ची पँट वर ओढायची सवय लागली. खूप दिवस ते चाललं, अगदी टिंगलटवाळी होईपर्यंत. महाशयांचा स्वभाव सोशल असल्याने मग त्यांना इतरांच्याही पँटची काळजी वाटायला लागली. तर त्यातून मग ही सवय जडली आणि चिटकून बसली. मित्रांशी बोलता बोलता त्यांना त्या दिवशी पाहिलेला तो प्रसंग अचानक आठवायचा आणि नकळत मग या महाशयांचा हात शेजारच्याच्या पँटीकडे जायचा. मागनं त्याची पँट पकडून वर ओढल्याशिवाय हात थांबायचाच नाही.
........
नवं संशोधन करणा-याच्या नावानेच तो शोध जसा ओळखला जातो, तद्वतच या महाशयांनी अशा फजितीचं नामकरण त्यादिवशीच्या प्रसिद्ध माणसाच्या नावाने केलं. तो कोडवर्ड आपल्या मित्रांत पसरवला. आता या महाशयांच्या मित्रांपैकी कुणाची अशी फजिती होण्याची शक्यता दिसली आणि आपला हात तिथपर्यंत पोचत नाही हे लक्षात आलं की, हे महाशय त्या व्यक्तीच्या नावाचा मोठ्याने उच्चार करतात. नाव प्रसिद्ध असल्याने बाकीचे लोक चमकून बघतात. त्यांना वाटतं हे बडं प्रस्थ आलंय की काय कार्यक्रमाला; पण त्यांना दिसंत कुणीच नाही. तोपर्यंत इकडे महाशयांच्या मित्राने मात्र आपली पँट सावरलेली असते.
असो. ते नाव अद्याप मला कळालेलं नाही. कळाल्यावर नक्कीच सांगेन.

टिप्पण्या