टरबुजाच्या फोडी

चाकू चालवण्यात तुमचा हात कितीही साफ असो; पण टरबूज कापण्यात मात्र ते कौशल्य फारसं उपयोगाला येत नाही.
चाकू चालवून टरबूजाचे बरेच भाग तुम्ही लगेच करू शकता; पण नंतरच खरी कसोटी असते. त्याचे बारीक तुकडे कापून घेण्यासाठी तुम्ही जेव्हा बाह्या सरसावून असता आणि सालीपासून आतला लाल मगस काढत असता तेव्हा त्याला चिटकून पांढरा बेचव मगसही येत असतो. तुम्हाला ते नको असतं. करकरीत रवाळ लाल आणि लाल भागच हवा असतो. तुम्ही मग पुन्हा अंदाज घेवून चाकू चालवता. तुमच्या हातात पिव्वर लाल भाग तर येतोच; पण एक पातळ लाल थर सालीत, त्या पांढ-याच्या बाहुपाशात अडकलेला असतो. त्याच्यापासून मुक्त करून तुम्ही पुन्हा त्याला इकडच्या पार्टीत घेण्याचा प्रयत्न करता; पण ते लडखडलेलं असतं. शिवाय ती फोड लाल पांढरी गिचमीड दिसायला लागते.
लाल आणि पांढ-याची अशी पक्की सीमारेषा नसते. त्याला सरावाची गरज असते.
प्रत्येक घरात एकजण असा असतो की, हे काम त्याच्याकडेच सुपूर्द केलं जात असतं. आमच्याकडे बहिणीकडे ही जबाबदारी असायची. तिच बारक्या बारक्या फोडी करायची, बाऊल भरून पास करायची. तिला, अगं तू घे ना, तू घे ना असं म्हणत सगळे आपापले काटे उपसायचे आणि तिचं कापणं व्हायच्या आत बाऊल रिकामे करायचे. अलिकडे मी ही जबाबदारी घेतली आहे. दर उन्हाळ्यात मी त्याचा सराव करतो. लाल तिकडं गेलं नाही पाहिजे आणि पांढरं इकडं आलं नाही पाहिजे, एवढं एकच ध्येय. बरेच टरबूज कामी आले आहेत; पण म्हणावे तसे यश अजून मिळालेले नाही.
......
खरं तर हातगाड्यावर जो कापलेला टरबूज मिळतो, तो फारच देखणा दिसत असतो. चंद्रकोरीसारखं काटेकोर कापून त्याच्या फोडी हारीने मांडलेल्या असतात. तेवढी पातळ फोड करून बघावी म्हटलं तर, स्साले आपले चाकू कधीच साथ देत नाहीत. मधातच अटकतात. बोट कापायला नको म्हणून आपणच ते जरा कमी धारेचे आणलेले असतात. त्याला सामान्य भाषेत बोथट म्हणत असतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा