वाड्यातला पालक

फुटक्या तुटक्यात लावलेला पालक एवढा तरारला होता की, ज्यात तो लहानाचा मोठा झालाये त्या कुंड्या, डबे यांचं अपंगत्व त्याने झाकून टाकलं होतं. म्हटलं, एवढा दणकून आलाचै तर होऊ द्या पालकाचे भजे वगैरे.
झालंही तसंच मग. भज्यात पालक फार छान उठून दिसतो. त्यातही तो घरचा असल्यानं जास्तच चवदार आणि तृप्त वाटलं.
दुस-या दिवशी सकाळी वाड्यात लक्ष गेलं तर आधी जेवढा होता तेवढाच पालक शिल्लक. त्याची पानं काढून घेतल्याची एक खूण नाही. म्हटलं, काय शिताफीनं खुडलाय पालक. प्रत्येक भागातला थोडाथोडा घेतला असणार, म्हणून कमी झाल्याचं बिलकुलच ओळखू येत नाहीयेय.
.....
कौतुक वाटलं, केलंही. तर म्हणे, घरचा पालक काढलेलाच नाहीयेय. वापरलाच नाहीयेय. ज्याचे पदार्थ केले तो हातगाडीवर विकत घेतलेला होता.
याला काय अर्थय. आपण एवढं मेहनतीनं लावावा, त्याला आठवणीने पाणी खत घालावं, त्याचं सारं सृजन आपण डोळ्यात तेल घालून बघावं आणि तरीही त्याचा वापर न करता थेट विकतचा पालक घ्यावा हे तर डिवचण्याचंच काम.
जरा चीडचीड केली तर म्हणे, घरातला काढला असता तर किचनच्या खिडकीतून दिसणारी हिरवळ गायब झाली असती आणि तेवढी जागा भोंडी दिसली असती, त्यापेक्षा विकतचा परवडतो. दहा रुपये गेलेले भावशीर, किमान हिरवळ तर शाबूत राहते.
...
तर ही गोष्ट लॉकडाऊन पूर्वीची. एक खरं आहे की, परसात हौशेने लावलेल्या भाज्या उगवून आल्या की, आनंदाला पारावर राहात नाही; पण त्या काढायच्या म्हटलं की, फार जीवावर येतं, त्या तशाच ठेवाव्या वाटतात. त्यावर उपाय म्हणून मग या पालकाची जागाच बदलली. त्या जागेवर शोभेची झाडे ठेवली जेणे की, खिडकीतून दिसणारं हिरवेपण शाबूत राहावं आणि इतरत्र असलेला पालक तोडताना उगाच भावनिक अडचण नको.
.....
तर असो, केवळ खिडकीतून सुखावणा-या रंगामुळे वाचलेला पालक आताच्या काळात अशा रितीने कामाला आला आहे. धन्यवाद!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा