विहिरीच्या खोल तळाशी....

गावापासून दूरवर मित्राचं शेत. त्याचीच विहीर. विहिरीचं पाणी बरंच खाली गेलेलं असतं; पण दुपारच्या काहिलीत दोनपाच डुबक्या माराव्यात एवढं नक्कीच असतं. आपण कंगण्यावरनं उतरतो. पाण्यात स्वत:ला झोकून देतो. पोहून झाल्यावर तिथेच खडकाच्या कठड्याला बूड टेकवून धापा टाकत असतो. जीव सुखावून गेलेला असतो. तेवढ्यात वरनं एक पक्षी थंडाव्यासाठी सूर मारत थेट खाली येतो आणि कपारीत बसून पुन्हा निघून जातो.
दूर दूरपर्र्यत कुठलीच चाहूल नसते. सारा परिसर झळयांनी लिंपलेला. विहिरीत डोकावणा-या झाडांवरनं पक्ष्यांचे आवाज तेवढे खाली आपल्यापर्यंत येत असतात. नेमक्या शब्दात नाही सांगता येत; पण नेहमी येणा-या पक्ष्यांच्या आवाजांपेक्षा हे काहीतरी निराळाच अनुभव देणारं असतं. ती चिवचिवाट अशी गरगरत खाली खाली उतरत येत असल्यासारखं काहीतरी जाणवत राहतं. त्याचा किंचित प्रतिध्वनीही ऐकू येत राहतो आणि त्याचे पाण्यावर तरंग उमटत असल्याचेही भास होत राहातात.
जमिनीच्या कित्येक फूट आपण खाली असतो. आपली नजर वर जाते तेव्हा झाडातून आभाळाचा किंचितसा तुकडा आपल्याला दिसत असतो. खोलवर असल्याने आपल्यात एकटेपणाची भावना असते. अंगावरनं निथळणा-या पाण्याने एकीकडे आपण सुखावलेलेही असतो आणि दुसरीकडे टपकणा-या पाण्याच्या आतल्या आत घुमण्याने काहीसे अस्वस्थही. वरनं येणारा पक्ष्यांचा आवाज आपल्याला जमिनीवरच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. तो तिकडचं कुशलमंगल सांगतोय की तू एकटाचैस म्हणून जाणीव करून देतोय हे कळता कळत नाही आपल्याला.
.....
शाळेत गावाकडं असतानाचा हा अनुभव. सध्या नेमकं तसंच वाटायलंय. रस्ते निर्मनुष्यैत. झाडांचंच काय ते अस्तित्वै गल्ल्यांमध्ये. अलिकडे ते अधिक ठळकपणे उंचेले आणि घनदाट दिसायलेत. त्याच्या शेंड्यावरनंं येताहेत पक्ष्यांचे आवाज आणि तळाशी आपण, घामाने निथळणारे!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा