वेलींचा घोर

जरा कुठं पालवी फुटली की, या वेलीबाई कधीकधी फारच घोर लावतात जीवाला. पालकांची बिलकुलच पर्वा नाय. कळ्यात यायच्या आत तर त्या कुठंकुठं गेलेल्या असतात.
पावसाळ्यात शेजारच्या चाफ्याला जुईने पुरतं लपेटलेलं असतं. बाजूच्या आवळ्याच्या टोकावर जाईनं डोकं वार काढलेलं असतं आणि आता उन्हाळ्यात ही चटकचांदणी मधुमालती. जाईजुई शुभ्र पांढ-या तर या बयेकडे रंगाची मनसोक्त उधळण. हिच्याशेजारी गोल्डन बांबूचं छोटं बन आहे. त्यातला एक उंचापुरा झुकलाय हिच्या मांडवावर. त्याची देहबोली हिरोगिरीची.
मग म्हणावंच लागतं, बये मधुमालती दिवसभर खपून जो मांडव बांधलाये तो तुझ्या बहरण्यासाठी. बांबूड्याचा हात पकडून त्याला वेटोळे घालण्यासाठी नव्हे. आता भुलशील त्याला; पण नंतर काय?
पाऊस पडून गेला म्हणून ठिकै. नाही तर पुरेशा पाण्याअभावी उन्हाळ्यात बांबू अंग गाळून बसलेला असतो. त्याच्या निव्वळ बरगड्या दिसत असतात. तो असा शुष्क आणि त्याच्या आधारावर मधुमालती खिदळलेली. कसंसच होतं. नको वाटतं बघायला.
भलत्याच नाजूक हातांनी मग या दोघांचा गुंता सोडवावा लागतो. यावेळी तिचा शेंडा बंड पुकारायची भीती असते, तो हट्टाने पकडूनच बसला आणि आपल्याकडून खुडला गेला की, दुनियेची हळहळ लागून राहाते. या भानगडीत वेळ तर जातोच जातो शिवाय आपण फारच निर्दयी असल्याचा अपराधगंडही दाटून येतो!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा