आपण साईड स्टॅन्ड
जुनी गोष्ट: आपण मुलाला आणायला शाळेत गेलेलो असतो. बहुधा पहिले आपणच. नंतर इतर पालक यायला सुरुवात होते. गाड्यांची गर्दी साचत जाते. शाळा सुटते आणि धांगडधिंगा करत पोरं बाहेर यायला लागतात. त्या लोंढ्यात आपली नजर मुलाला शोधत भिरभिरत असते. तो दिसता दिसत नाही. अजून त्याचा वर्ग सुटायचा असेल. तर मग एकेक गाडी आपापल्या पोरांना घेवून निघून जाते. तुरळक गाड्या सोडल्या तर तो परिसर जवळपास रिकामा होतो. साईड स्टँडवर गाडी उभी करून, तिला टेकून आपण, खूपवेळ त्याची वाट पाहत असतो.
नंतर मुलगा रमत गमत येतो. आणखी तीनचार जण असतात. रस्त्यात आपण विचारतोच त्याला, उशीर होण्याचं कारण. मग तो सांगत राहतो, सरांनी थांबवलं होतं. गॅदरिंगै पुढच्या महिन्यात वगैरे किंवा तत्सम काहीतरी....
.......
कधीही घडणारी गोष्ट: मित्राच्या कामासाठी आपण एका सरकारी कार्यालयात गेलेलो असतो. तो म्हणतो, दोन मिनिटाचं कामै. इथंच थांबतोस की, चलतोस आत. आपण बाहेर थांबणं पसंत करतो. तर त्याच्याही गाडीवर बूड टेकवून आपण सभोवतालची सगळी झाडं, टप-या, माणसं न्याहाळून कंटाळून जातो. लोक येतात, जातात.
कितीतरी वेळाने मित्र धावतच पाय-या उतरत येतो. सॉरी सॉरी म्हणून गाडीला किक मारतो. आपण काही विचारायच्या आधीच म्हणतो, अरे त्यांना फाईलच सापडत नव्हती. सापडली तर त्यांना आणखी एक झेरॉक्स हवी होती. त्यात त्यांचा शिपाईही नव्हता. म्हटलं मी आणतो तर म्हणाले, येईलच शिपाई इतक्यात, तोवर चहा घेवूत. शिपाई आला, त्यानं झेरॉक्स आणली आणि चहाही सांगितला. तरी नाही म्हणत होतो मी. तर ते म्हणाले मित्रालाही बोलवा. बोलवणार होतो तुला, पण ते तुला आवडलं नसतं.
........
नेहमीची गोष्ट: बायकोला हळदीकुंकाला जायचं असतं. अंतर बरंच दूर. त्यात तिची जवळची मैत्रिण. मग बाहेर कोप-यावरच थांबण्याच्या अटीवर तिला सोडवायला जातो आपण. बायको जाते मैत्रिणीच्या घरात. रस्त्याच्या एका बाजूला अंतर राखून साईडस्टँडवर गाडी उभी करून आपण खिशातून मोबाईल काढतो. चाळा म्हणून कॉन्टॅक्ट लिस्ट खालीवर करत राहतो. नंतर ब-याच बायका येतात, जातात. एखादीचा नवरा बाहेरच गाडी लावून थांबतो तर एखादा बायकोसोबत थेट आत जातो. बाहेर थांबलेला आपली नजर टाळतो आणि आपण त्याची. नजरचोरीचा हा खेळ बराच वेळ चालतो.
शेवटी त्याचीही बायको परत येते आणि ते निघून जातात. आणखी काही येतात, जातात. बायकोचा पत्ताच नसतो. आपण गाडीभोवतीच फेरी मारून आळोखेपिळोखे देतो. कितीतरी वेळाने बायको घाईघाईत येते आणि सांगायला सुरू करते. सांगा बरं कोण भेटलं असेल आज? शॉकिंग! मी हळदीकुंंकू घेवून निघाले होते आणि नेमकी शाळेतली मैत्रिण भेटली. मैत्रिणीची जावूच लागते म्हणे ती. तिच्या नव-याच्या मावशीची सूनै ती. इथंच आलीये म्हणे राहायला. तिच्या नव-याची बदली झालीये. पहिल्यांदा तर ओळखूच नाही आली. तिच्या गालावर मस बघून मला खरं तर वाटलंच होतं; पण म्हटलं असू शकतो दुस-याच्या गालावरही. आम्ही एकाच बाकावर बसायचो. तिची छोटी बहीण हुशार होती, कुठे असते की....... तर हे सगळं ऐकेपर्यंत आपलं घर आलेलं असतं.
निव्वळ साईड स्टँड झालो आहोत आपण!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा