लोखंडी पाईप आणि ...

...तर एक लोखंडी पाईप होता, नळाचा. चारेक फूटाचा. पुढे मागे कामाला येईल म्हणून जपलेला. समृद्ध अडगळ सोडून जे काही भंगार असतं माळ्यावरचं, त्यात तो कायम असायचा. दरवर्षी भंगार म्हणून तो बाहेर निघायचा आणि नंतर कामाला येईल म्हणूनच्या सामानात पुन्हा जावून पडायचा. किमान सहासात वर्ष चाललं हे. नंतर प्लंबिंगचं आणखी काम निघालं आणि अजून तीनचार लोखंडी पाईप निघाले. ते आता सगळे एकत्र आहेत.
.......
एकदा एका नातलगाचा कारखाना पाहायला आम्ही काही नातलग गेलो होतो. कारखाना बघून बाहेर पडताना, शेजारच्या रिकाम्या जागेत लोखंडाचे मोठमोठाले पाईप दिसले. अगदी टनावर होते ते. ते स्क्रॅपमधले असल्याची माहिती कुणीतरी सांगितली. आमच्यासोबत ज्या वहिनी होत्या त्याच स्क्रॅपचं काम बघतात म्हणे सगळं. ते भंगार दोन दिवसात विकलं जाणारै असं त्यांच्याकडून कळालं. त्या क्षणी प्रचंड आदर दाटून आला त्या वहिनींबद्दल.
आपण स्सालं, एका पाईपासाठी सहासात वर्ष घालवतोय निर्णयाला आणि या तर केवढं विकून टाकतात, असे काहीसे भाव होते ते. कारखाना वेगळा आणि घर वेगळं हे कळतं मला; पण आपला एक मध्यमवर्गीय माइंडसेट असतो. तो सहज बदलत नाही. कारखाना उभा केल्याचं कौतुक असतं; पण त्यातलं फार डिटेलिंग आपल्याला कळत नसतं. आपल्याला जे कळतं त्यात आपण जास्त कुतूहल दाखवतो, ते आपल्याशी रिलेट करतं. असेल हास्यास्पद; पण आपला माइंडसेट आहे असाच. आहे तर आहे!
....
तर एकदा त्या वहिनींनाच मी हे हसत हसत सांगितलं. त्यांना त्यात वावगं वाटलं नाही. त्याही मध्यमवर्गीयातूनच पुढे आलेल्या. त्यांनीही मग एक अनुभव सांगितला. सुरुवातीचा काळ होता. कुणाला तरी पैशांची गरज होती आणि त्यांना ती तातडीने भागवायची होती. रोख पैसे द्यायचे होते. रक्कम मोठी होती. पैसे कशात द्यावे हा प्रश्न होता. प्लास्टिकच्या पिशवीत एवढे पैसे कसे द्यायचे? पण नवीन काही शोधावं एवढा वेळही त्यांच्याकडे नव्हता. मग एका मोठ्या रुमालात त्यांनी ती रक्कम गुंडाळली आणि पिशवीत घालून दिली. संपला विषय.
....तर कित्येक दिवस तो मोठा रुमाल गेल्याचं दु:ख त्यांना अधिक सतावत होतं म्हणे. खूप वर्षांपासून त्यांनी तो जपून ठेवला होता. त्यावर वेलबुट्टी होती, माहेरच्या कुणा कार्यक्रमात तो मिळाला होता अशी बरीच पाश्र्वभूमी होती त्याला. त्या क्षणी दुसरं काही तरी सापडायला पाहिजे होतं आपल्याला, आपण एवढा आवडता रुमाल कसा जावू दिला याची त्यांना खूप दिवस खंत वाटत राहिली. ज्यांना एवढे पैसे दिले त्यांच्याकडे रुमाल परत द्या असं म्हणायचं तरी कसं? तात्पर्य, रक्कम मोठी असली तरी त्यापेक्षा रुमाल गेल्याची हळहळ त्यांना जास्त होती. लाखो करोडोंचे व्यवहार करणारी माणसंही कधीकधी अशी पन्नास शंभर रुपयांच्या रुमालात मन अडकवून बसतात. एकूण काय तर भावनेला मोल नसतं.
.....
.. तर मूळ विषय भंगारचा होता. काही जण असं भंगार काढून टाकण्यात कमालीचे वेगवान असतात. त्यांना भलतंच टापटीप आणि जागच्या जागी लागतं. रंग उडालेल्या, तडा गेलेल्या वगैरे गोष्टी त्यांच्याकडे तासाभरही टिकत नाहीत. त्यांचं नियोजन भारी असतं. अगदी झोपाळ्याच्या साखळ्या गंजल्या की, दोनतीन वर्षात त्या बदलल्या जातात. त्यांच्याकडच्या लाईटच्या बटनावर छोटासा डागही कधी दिसत नाही. न चुकता त्यांच्याकडची रद्दी महिन्याच्या महिन्याला जाते. त्याबद्दल ते दक्ष असतात. माझी एक बहिण यांच्यापैकीच. तिच्याकडच्या अनेक बाद वस्तू माझ्या बागेत येवून बसतात. तुलनेत आपला पसारा भरपूर, आपण प्रशस्त बेशिस्त. मग तिला नावं ठेवण्यासाठी आम्ही शोधात असायचो. तिच्याकडे एकदा चुकून पोपट आला. कुणीतरी पाळलेला असावा आणि उडून तिच्या गॅलरीत येवून बसला असावा. बरेच दिवस तिच्याकडे तो बिनापिंज-याचाच राहिला. त्या पोपटाची चोच एका बाजूला फेंट झालेली होती. तेवढ्यावरनं आम्ही तिची खिल्ली उडवायचो. तिच्या एकूण शिस्तीत पोपटाची ही रंग उडालेली चोच भलतीच वाईट दिसते, त्या शेडमधला पेंट आणून तेवढा चोचीला रंग देवून टाक म्हणून आम्ही तिच्या मागे लागायचो.

टिप्पण्या