लेखकाची चप्पल!
एक विभागीय संमेलन होतं. तालुक्याच्या ठिकाणी ठेवलं होतं. आम्ही संमेलनाला चाललो होतो. माझ्यासोबत एक तरुण कथाकार आणि कवी होते. ते एका शाळेत इंग्रजीचे शिक्षक होते. मी कॉलेजात शिकत होतो. एकाच गावात असल्याने बसमध्ये सोबतच होतो. बसला गर्दी होती. सरांना जागा मिळाली. मी मागे राहिलो. नंतर एकाने दिली जागा, तो नेमका संमेलनालाच निघालेला होता. आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. मग गप्पा रंगल्या. त्याला बरेच कवी तोंडपाठ होते. त्याने प्रवासभर कविता ऐकवल्या. समवयस्क असल्याने आमच्यात लगेच मैत्री झाली.
संमेलनाच्या गावात गेल्यावर सरांना अजून काही मंडळी भेटली, ते त्यांच्यासोबत गेले. मी आणि तो मित्र मग एकत्र राहिलो. एका मोठ्या हॉलमध्ये आमच्यासारख्या अनेक हौशींची व्यवस्था केलेली होती.
तो मित्र आणि मी मिळूनच कार्यक्रमाला जायचो. जेवायला जायचो. ग्रंथप्रदर्शनात फिरायचो. दोन दिवसाचं संमेलन होतं. दुस-या दिवशी दोन परिसंवाद ऐकून आम्ही जेवणाच्या ठिकाणी आलो. भरपूर गर्दी होती. कूपन घेवून रांग उभी होती. संयोजकांनी चपला बाहेर काढण्याची टूम काढली होती. आम्ही गेलो. जेवणं झाले. बाहेर आलो तर मित्राची चप्पल गायब. ब-याच चपला तिथे आडव्या तिडव्या पडलेल्या. त्याला त्याची चप्पल सापडेचना. कुणीतरी चोरली असणार. आम्ही हौशेने संमेलनाला आलेलो. पैसे मोजकेच. नवी चप्पल घ्यावी एवढे पैसे त्याच्याकडे नव्हते. थोड्यावेळ थांबल्यावर मी त्याला गमतीत म्हणालो, घाल जी दिसेल ती. उन्हाचं अनवाणी कुठं फिरतोस.
थोडा वेळ आम्ही तिथंच थांबलो. गमतीतली गोष्ट वास्तवात येण्याची शक्यता दाट झाली. नंतर मग त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याच्या मापाच्या एका चप्पलेत फटकन पाय घातले. आम्ही क्षणभरही न थांबता भरभर चालत दुस-या एका परिसंवादाच्या मंडपात शिरलो. त्यात रमून गेल्यावर आमची धडधड थांबली. कसंही संमेलन संपणारच होतं. लक्षात येण्याची शक्यता धूसर होती.
दुपारनंतर संमेलनाचं सूप वाजलं. आम्ही संध्याकाळच्या बससाठी स्थानकावर आलो. माझ्यासोबत आलेले सरही दिसले. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना आणि मला एकाच गावी जायचं होतं म्हणून बोलत बसलो. बोलता बोलता मी मित्राची चप्पल चोरीला गेल्याचं सांगितलं. त्यांनी चमकून बघितलं आणि म्हणाले, काय म्हणता? अहो, माझीही चप्पल चोरीला गेली. ब-याच जणांच्या गेल्या असाव्यात. खूपजण जेवणाच्या मंडपाबाहेर घुटमळताना दिसत होते. ते चपलाच हुडकत असणार. शेवटी पाय पोळायले म्हणून मी तडक समोरचं दुकान गाठलं आणि ही पंचवीस रुपायची स्लीपर घेतली, असं म्हणून त्यांनी पाय वर करून स्लीपर दाखवली. मी म्हटलं, तसं कशाला करायचं सर, घ्यायची तिथलीच एखादी पायात घालून. मित्राने तसंच केलं. सर हसले. मग साहित्यिक मंडळी वाङमयचौर्यावरून चप्पलचोरीवर कशी उतरली वगैरे टाईपचे विनोद करत आम्ही हसत राहिलो.
थोड्या वेळात तो मित्र आमच्याकडे आल्यावर मी त्याची आणि सरांची ओळख करून दिली. दोनपाच वाक्य बोलणं झाल्यावर तो बस लागली की काय पाहायला गेला. सर मला म्हणाले, त्याच्या पायात दिसतेय ना अगदी तशीच होती माझी चप्पल. याचीच चप्पल चोरीला नव्हती ना गेली? नाही तर त्याने माझीच पळवलेली असायची, असं म्हणून ते हसू लागले. त्यांचा टोन गंमतीचा होता. मीही टाळी दिली आणि हसलो.
बस लागली का पाहतो म्हणून मग मीही मित्राच्या दिशेने गेलो. त्याला गाठलं. सरांचीही चप्पल कशी त्या मंडपातून चोरीला गेली ते सांगितलं. त्याने मग दोनचार शिव्या हासडल्या चोरांच्या नावाने. नंतर मग मी त्याला नेमकी सरांची चप्पल तुझ्या चपलेसारखीच होती हा योगायोगही सांगितला. त्याने माझ्याकडे एकदम चमकून बघितलं. नंतर चपलेकडे बघितलं. मग जोरदार हसला. मीही हसलो. आम्ही परत सरांकडे आलो. त्याने चप्पल काढली आणि सरांसमोर सरकवली. ते अचंबित होऊन बघू लागले. मी म्हटलं, सर तुम्ही गमतीत म्हणालात; पण ही चप्पल तुमचीच असण्याची शक्यताये. घालून पाहा. त्यांनी ती घालून पाहिली. प्रत्येकाला आपल्या चपलेचे आंगठे पायात बसल्यावर ओळखू येत असतात. त्यांना कंफर्टेबल वाटत असतं. ती त्यांचीच चप्पल असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मग मित्राला म्हणाले, अरे पण मग तुमच्या पायात काय? तसं कसं जाणार? मी म्हटलं, तुमची स्लीपर आहे की. ती तो घालेल. एरवी दोघांचं माप सारखंच आहे. लेदरची चप्पल परत मिळाली हा फायदाचै तुमचा.
....
तो मित्र तेव्हा भेटला ते पहिल्यांदा आणि शेवटचा. आजवर पुन्हा कधी त्याची भेट झाली नाही. सर मात्र भेटतात, ब-याच सांस्कृतिक कार्यक्रमात. ते भेटले की माझं लक्ष नकळत दरवेळी त्यांच्या चपलेकडंच जातं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा