खरंय तुमचं.....

पाव्हणे आले होते. गप्पांचा फड जमला. ते म्हणाले, मोदी येईल असं वाटतं काय पुढच्या वेळी? मला नाही वाटत येईल म्हणून. लोकांना बरेच निर्णय आवडले नाहीत.
मी म्हटलं, खरंय तुमचं! फार ओरड चालूये.
त्यांच्यासोबत आलेले उपपाव्हणे म्हणाले, एवढंही सोपं समजू नका. ऐन निवडणुकांच्या आधी काही तरी मोठा निर्णय घेईल मोदी सरकार. बघा तुम्ही. सगळा देश पुन्हा त्यांच्या पाठिशी.
मी म्हटलं, खरंय तुमचं! त्यांचं काहीतरी नियोजन चालूच असणार. अशा गोष्टी सहजासहजी बाहेर येत नसतात.
.......
नंतर मग जगभरातल्या सगळ्याच विषयांवर घंटाभर आमच्या गप्पा सैर करून आल्या. त्यांचं ज्ञान अगाध होतं. आमचं जेमतेम.
निघतांना ते म्हणाले, तुम्ही फेसबुकवर अॅक्टिव्ह आहात काय?
मी म्हटलं, हो. तुम्हीही आहात? माझं काही वाचनात आलं काय?
ते म्हणाले, छे हो! आम्हाला कुठं तेवढा रिकामा वेळै?
मग कशावरनं गेस केलात?
तुमच्या उत्तरावरनं. फार उद्गारवाचक बोलता तुम्ही .
म्हणजे?
अहो, तुम्ही एवढ्या सगळ्या गप्पांत फक्त, ‘खरंय! हो ना! वा! बेस्टै! बढिया! अप्रतिम! मस्तच! छानै! वगैरे वगैरेच बोलत होतात. एखादं दुसरं वाक्य बोलला असालही पण तेही या शब्दांना लटकूनच!
छे छे! बोललो ना मी पण.
तुमच्या चेह-यावर नंतर नंतर इमोटिकॉनही दिसायला लागतील की काय असं वाटायला लागलं होतं .... असं म्हणून एक डोळा बारीक करीत ते मिश्किल हसले. मीही हसून दाद दिली. करणार तरी काय?
......
हे आणि असले शब्द आता आपल्यापुरते का होईना बोलण्यात बॅन करायला पाहिजेत! पाव्हण्यारावळ्यात बदनामी होते राव!!

टिप्पण्या