स्मशानातील खदखद

स्मशानात अंत्यविधीची तयारी चालू होती. ब-यापैकी लोक जमा होते. अजस्त्र लिंबाखालच्या बाकड्यावर दोन वृद्ध एकमेकांना खेटून बसले होते. एरवी अशा वेळी त्यांच्यासोबत, त्या बाकड्यावर बसणारा तिसरा दोस्तयार आज सरणावर असावा.
अंत्यविधी आटोपला आणि जो तो बाहेर पडू लागला. मग त्या दोन वृद्धातल्या एकाने शेजारच्या झाडाचा आधार घेतला आणि उठून दुस-याला हात दिला. दुसरा अर्धवट उठून पुन्हा खाली बसला. पायाला मुंग्या आल्या असाव्यात किंवा कमरेत कळ.
....
काही वेळ गेला आणि पहिल्याने पुन्हा हात पुढे करत त्याला विचारलं,
‘भऊ, निघायचं की थांबायचं?’
दुसरा बोळक्यातून म्हणाला,
‘इथं मुक्काम करतो का काय मग?’
‘विचारतो ना सोय असेल तर!’
पहिल्याने त्याच टोनमध्ये उत्तर दिलं आणि दोघंही खळाळून हसले. मग दुसरा म्हणाला,
‘खरं तर इथंच बसून तिघांनी एखादा पेग मारला असता राव; पण तो पठ्ठ्या काही आता आगीतनं बाहेर येणार नाही. एरवीही साल्याला थंडी फार वाजायची.’
.....
पहिल्याने आता स्वत:च बैठक मारली आणि दुस-याच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला,
‘भऊ, थांबू इथंच. राहिलेतच किती दिवस आता? थोड्याकरता कशाला जा जा-ये ये करायची? उगीच लेकराबाळांची ओढाताण.’
दुस-याचं बोळकं मग खळखळून गेलं आणि तेच बेरिंग पकडत, खोडाला धरून तो झटकन उभा राहिला.
...
धगधगणा-या चितेलाही खदखदण्याचा मोह व्हावा,
अशा जिवंत डायलॉगबाजीला आपला सलामै!

टिप्पण्या