मॉलमधलं जोडपं
मॉल. एक तरणं जोडपं. त्यांच्यासोबत एक गोरं गोमटं गोंडस बाळ. तीन तासात किमान चारदा तरी आम्ही निरनिराळ्या दुकानात योगायोगाने भेटलो. त्यांचं आपसातलं संभाषण अगदी हलक्या आवाजातलं. त्यांना स्वत:ला तरी काही ऐकू येतंय की नाही अशी शंका यावी एवढा हळू आवाज. ते बहुधा अमराठी असणार, बाहेरून शहरात आलेले.
बाळ मस्त होतं. त्यांना पक्कं शोभेसं. जोडप्याचा कपड्याचा चॉईस चालला होता. बाबा ट्रायल रूममध्ये गेले की बाळ किंचित रडायचं. पण त्याचा आवाज 'मला हे आवडलेलं नाही' एवढी जाणीव करून देण्याएवढाच. त्याच्या तोंडावर रडवेले भाव तर दिसायचे; पण आवाज यायचा नाही.
कुणालाही कौतुक वाटावं, हेवा वाटावा असं हे कुटुंब. तर झालं असं की, त्यांची खरेदी आटपली आणि मंडळी बाहेर आली. दुकानाच्या बाहेर आल्या आल्या त्या बाळाचं काय बिनसलं की आणि काही नाही की, त्यानं जो कर्कश्य सूर लावला की बस्स!
नंतर त्यानं खाली बसकण मारली आणि पाय झाडत जे भोकाड पसरलं की पाहायचं काम नाही. मला तर दाटूनच आलं एकदम. म्हटलं, शंभर टक्के हे जोडपं आपल्याकडचंच असणार. पिव्वर मराठी.
त्यानं पप्पातला पा असा लावला की, जोडप्यानं चारेक तास टिकून ठेवलेलं बेरिंग तुटून गेलं. शर्टावर शर्ट चढवून दहाबारा ट्रायल करून कंटाळलेला बाबा बायकोवर ओरडला, दोन मुस्काटात दे त्याच्या.
त्या जोडप्याबद्दल प्रचंड प्रेम दाटून आलंय माझ्या मनात. हेच खरे आपल्यातले लोक!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा