परतीच्या वाटेवरचे आजोबा-आज्जी
सकाळी फिरायला गेल्यावर परतीच्या टप्प्यात मंदिराच्या थोडं मागेपुढे मला एक आजोबा आज्जी दिसायचे. आजोबा किंचितसे वाकलेले होते, आजी ताठ होत्या. आमच्या चौथ्या भेटीच्या वेळी मग आजोबांनी आणि मी एकमेकांना ओळखीचं स्माईल दिलं.
लवकर गेलो किंवा उशीरा झाला की कधीकधी ही भेट हुकायचीही. मधल्या काळात कितीतरी दिवस ते दिसलेच नाहीत. मला वाटलं, त्यांनी रस्ता बदलला असावा किंवा आजारी असावेत. दरवेळी मंदीर जवळ आलं की वाटायचं, पुढच्या वळणावर हे दोघे दिसतीलच. पण नाही.
तब्बल तीन आठवडे लोटले. त्यांना मी हळूहळू विसरू लागलो होतो. आणि अचानकच त्या वळणावर आजोबा दिसले, एकटेच. हातात पिशवी होती, एरवी ती इवलुशी पिशवी आजींच्या हातात असायची. तेवढ्या ओझ्यानेही ते अधिक वाकले होते. मी स्माईल दिलं, त्यांनीही. बस्स!
दुस-या दिवशीही आजोबा एकटेच आणि तिस-या दिवशीही. स्माईल मात्र तेच. चौथ्यापाचव्या दिवशी मला आजींची आठवण झाली. अरे, त्या दिसतच नाहीयेत. मी स्वत:शीच चरकलो. काय झालं असेल? छे! त्या बाहेरगावी वगैरे गेल्या असतील.
दोनपाच दिवसांत तिकडच्या रस्त्याचं काम सुरू झालं आणि तिकडून फिरणं बंद झालं. आणि नंतर एकूणच फिरणं बंद झालं. त्यानंतरही काही दिवस, आजींचं काय झालं असेल? त्यांच्या पश्चात आजोबांचं काय? असा प्रश्न अधून मधून मनात यायचा; पण काही काळानंतर तोही विषय डोक्यातून निघून गेला.
.....
या गोष्टीला दोन वर्षे होवून गेली. अलिकडे पुन्हा नव्याने फिरणं सुरू केलं. चारपाचच दिवस झाले असतील. परवा दूरवरनं एक आजोबा-आजी येताना दिसले आणि त्यांची आठवण आली. आजोबांच्या हातात काठी होती. ते जसे जसे जवळ येवू लागले तशी शंका आली, वाटलं हे तेच तर नव्हेत? पण मग आजी? आणि आजी एवढ्या टकाटक कशा? आधीच्या आजी नववारीवाल्या होत्या. पण मग आजींच्या हातीही तशीच इवलुशी पिशवी कशी? आजोबांनी नव्या आजी आणल्या का काय?
आमच्यातलं अंतर कमी कमी होत गेलं आणि आम्ही समोरासमोर आलो तर खरंच ते आजोबा. आणि आजीही त्याच. मी प्रचंड आनंदात हात केला आणि स्माईल दिलं. त्यांनी आश्चर्याने पाहिलं; पण त्यात ओळखीचे भाव नव्हते. च्यायला, त्यांनी ओळखू नये एवढा चेहरा बदललाय आपला? की आपण जास्तच वयस्कर दिसू लागलो आहोत? तेही फक्त दोन वर्षात? आता माझ्या मनात निराळीच चिंता.
.....
असो. मला आजोबांसोबत आजींना बघून
प्रचंड आनंद झालेलाय.
पण मी आता रस्ता बदलणारै.
त्या दोघांचं, आजचंच चित्र मला कायम
डोळ्यासमोर ठेवायचंय!
.....
आसपासच्या घटना घडामोडी बघून आपलं मन भलतंच निबर होत चाललंय. भलते सलते विचार मनात येतात. आजोबा काही दिवस एकटेच दिसले म्हणून दोन वर्षांपूर्वी नको नको ते विचार आले होते. बरं, तेही एकवेळ गृहित धरताही येतं; पण आता दोन वर्षांनंतरही आजी फिट दिसल्या म्हणून आजोबांनी आजीच बदलल्याचा विचार मनात यावा? छे!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा