देवघरातल्या पाली

एरवी माझ्याकडचे देव वर्षभर नास्तिक असतात; पण सणावाराच्या काळात मात्र त्यांना पूजावंच लागतं. कुठल्या ना कुठल्या कारणाने ती जबाबदारी नाईलाजाने माझ्यावर येतेच येते. मग मला भयंकर टेन्शन येतं. अंगावर काटा येतो. देवावर माझी श्रद्धा नाही किंवा घरच्यांसाठी हे करावं लागतं असं काही भंपक कारण त्यामागे नाही. उलटपक्षी देव माझा आळस समजून घेतात आणि माझ्यावर शक्यतो कोपत नाहीत. सबब, मला त्यांची भीती वाटत नाही. माझ्या भीतीचं कारण निराळं आहे.
देवांच्या फोटोमागे दिवसाढवळ्या पाली लपलेल्या असतात. त्या मला प्रचंड घाबरवून सोडतात. छतावरचं, भिंतीवरचं त्यांचं अस्तित्व सवयीचा भाग असतो. त्या दूरवर असतात. देवघरातलं अंतर मात्र फारच जवळचं असतं. अशी एकदीड फूटावर, हिरवी टपोरी, नसा ताणलेली पाल अचानक समोर आली तर कोण बेट्याचा घाबरणार नाही. देव सोडून सगळेच घामाघूम होणार ना. आपण अगदी उत्साहात पूजा करायला गेलो फुलं वहावी, हार घालावा म्हटलं की ही बया गणपतीच्या किंवा रेणुकामातेच्या फोटोमागून अशी सटकन बाहेर येते की, छातीत धस्स होतं. घाम फुटतो. काही क्षण समाधीत जातो आपण.
आधीच तर बालकृष्ण हाताळायला अवघड. त्यात पालीनं असं दचकवलं तर तोल जातो हो.
........
असं म्हटलं जातं की, पालीला माणसाकडून मरण नाहीयेय. तिला मारण्याचा प्रयत्न करू नये. आणि तरीही एखाद्याला वाटत असेल ती आपल्या हातून मेलीये तर त्याने शिवकांचीला जावं. तिथल्या मंदिरात छतावर सोन्याच्या पालीची मूर्ती आहे. पाय-या चढून तिला हात लावून तिचं दर्शन घ्यावं आणि पापमुक्त व्हावं.
काही विज्ञानवादी लोक म्हणतात की, पाल घरात असावी, ते चांगलं असतं. पण त्यांनी घरात म्हटलंय, देवघरात नाही, हे पालीला कोणी समजावून सांगावं?
पाली पळवण्याचं औषध मिळतं; पण त्याचा रॉकेलमिश्रीत वास एवढा भयंकर असतो की, आपल्यालाच भिंतीवर चढून बसावं काय असं वाटायला लागतं.
अंड्याची टरफलं ठेवल्याने जातात म्हणे पाली; पण अंड्याचं टरफलं देवघरात कसं ठेवणार? पंचाईतचै!
......
देवघरातल्या पालीचा बंदोबस्त कधी ना कधी होवून जाईल; पण त्या बाळकृष्णाचं काय? बाळकृष्णावर आपलं जीवापाड प्रेमै; पण त्या मूर्तीचं बॅलन्स साधता साधता जीव मेटाकुटीला येतो राव. शिवाय किती गिल्टी वाटायला लागतं. त्याचं काहीतरी करणं तातडीचै!
देवा, खेळीमेळीनं घ्या!

टिप्पण्या