कंफर्टेबल बैठक

काही जागा बसण्यासाठी फारच कंफर्टेबल असतात. सोफे, दिवाण किंवा तत्सम फर्निचरपेक्षाही अशा जागांवर बसायला फारच आरामदायी वाटतं.... सोफा सेटचा तर प्रचंड कंटाळा येतो. वर्षानुवर्षे तेच, दोन खुर्च्या, तीन जणांसाठीचा एक सोफा, ज्यावर तिघांना कधीच बसता येत नाही. समोर एक टीपॉय. बस्स! हे फारच टिपीकल वाटतं. यातच जरासे बदल करत आणि टीव्हीला गृहित धरून काही फर्निचर आलं.
खरं तर ज्या लौकीक अर्थाने बैठका नसतात; पण कुठंतरी टेकायचं म्हणून आपण त्यावर विसावतो. तिथं बसायला फारच आल्हाददायक वाटत राहतं.
त्यातल्या त्यात धान्याच्या पोत्यावर तर फारच रिलॅक्स असतो माणूस. एकावर एक असे पोते रचलेले असतात. गावाकडे मित्रांच्या घरी किंवा नातेवाईकांकडे गेले की, त्यांच्या खोल्यात धान्याने भरलेली अशी पोती मांडलेली राहतात. बोलता बोलता त्यावरच काही काळ टेकायला मजा येते. आहा... पण ते घरी कायमस्वरूपी नाही करता येत. एकतर तेवढ्यासाठी धान्य आणणं हा माज झाला, तो आपण नाही करू शकत. बरं, समजा तो केला तरीही त्याला किडे लागतात किंवा उंदरं तरी. अशा पोत्यांत वाळू भरून ठेवण्याचाही मी एकदा प्रयोग केला; पण नंतर पोतं फाटून वाळू बाहेर येते. शिवाय वाळूच्या पोत्यांवर तेवढं आनंददायी वाटत नाही. मग लक्षात आलं, धान्याच्या पोत्यावर बसणं ही सिझनेबल बैठक असते आणि गावाकडेच तिचा लाभ होवू शकतो.
झाडाचा कट्टा तर बेहतरीनच. कितीही तास बसा, सोबत मित्रमंडळ असेल आणि रात्रीची वेळ असेल तर त्याएवढं सुख नाही. गावाकडं यात्रेच्या काळात हे सुख मिळतं. थेट रस्त्यावर उतरणा-या घरांच्या, मंदिराच्या, किंवा बंद दुकानांच्या पाय-या यावर बसून गप्पा हाणण्यासारखा आनंद नाही. मला तर कधी कधी वाटायचं, बैठकीतलं फर्निचर काढून टाकावं आणि तिथे सरळ पाय-या कराव्यात. कितीतरी जण बसू शकतात. शिवाय कुणी खालच्या पायरीवर, कुणी वरच्या पायरीवर काय मस्त मैफल जमू शकते.
नदीकाठावरचा शिळासदृश्य मोठा दगड, ढाब्यावरच्या खाटा, कुंपणाच्या भिंती, बसस्टँडचं खोलगट लांबलचक सिमेंटचं बाकडं, गॅरेजवाल्याचा बुटका स्टूल...( इथं गप्पा मारायला गॅरेजवालाच पाहिजे आणि तोही गाडी उघडी करून, त्यात मान घालून बसलेला.) या मस्त बैठका वाटतात मला.
शाळेत असताना गावाकडे कुणाच्या ना कुणाच्या घरी पत्त्यांचा डाव रंगायचा. तेव्हा टीव्ही नव्हता. मग रात्री उशीर झाला की, तिथल्याच तुरीच्या ढिगा-यावर घोंगडं टाकून लेटायला प्रचंड मजा वाटायची. अजून एक आवडती जागा होती माझी शाळकरी वयात. एक पत्र्याचं घर होतं. त्याच्या शेजारी लिंबाचं मोठं झाड होतं. ते बरचंस पत्र्यावरच झुकलं होतं. त्याची सावली पूर्ण घराचं छत व्यापून राहायची. तिथंच त्या पत्र्यावर कठड्याला टेकून झाडाच्या आणि सावलीच्या बेचक्यात बसून वाचण्यात प्रचंड सुख वाटायचं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा