पर्यावरणातले पोपट

पर्यावरणाची जागरुकता प्रचंड वाढलीये. आणखी वाढत जावो. मात्र कधीकधी एखाद्या अशा काही पोपटाशी गाठ पडते की, आपल्याला अचानकच अपराधी वाटायला लागतं. शरमेने थिजून जातो आपण जागच्या जागी. धरणीने दुभंगून जावं, आपल्याला पोटात घ्यावं आणि आताच्या आता, या क्षणी त्यातून एखादं झाड उगवून यावं असं वाटायला लागतं.
परवा बसलो होतो गप्पा मारत, एका मिठ्ठूशी. तेही माझ्याच घरात. चहाला उशीर होता. मग अर्थातच पावसापाण्यावर विषय आला. मी म्हटलं, पावसाने फारच ताणलं यंदा. तर तो म्हणाला, तुमचाच दोषै त्यात. मग मी म्हटलं, आतापर्यंत तर काही धरणं भरायला पाहिजे होती हो. तर तो म्हणाला, कशी भरतील, तुम्ही धड़ पाहिजे न? नंतर मी म्हटलं, दुसरीकडे नुसता पूर येतोय आणि आपल्याकडे टिपूसही नाही, पाऊस आपल्यालाच का दगा देतोय? तर तो काय म्हणाला माहितेय?
म्हणाला, ‘हे पहा, पावसाने काहीएक दगा दिलेला नाहीयेय. उगाच त्याला कोसू नका. आता तरी जागे व्हा, हे जे झालंय ते सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही पहिल्यापासून जर नीट राहिले असते तर अशी वेळ नसती आली.’
मला कळेचना माझा काय दोषै. मी बावचळल्यासारखा त्याच्याकडे बघू लागलो. मग तोच पुढं म्हणाला, ‘तुम्ही जंगलांवर खटाखट करवती चालवल्या. त्यांच्या सपशेल कत्तली करून त्यांच्या मुडद्यावर ‘हे असे’ घर बांधले. त्यांचे हातंपायं तोडून त्याचं ‘हे असं’ फर्निचर बनवलं. नतद्रष्ट तुम्ही, कशाला पडेल पाऊस झक मारायला?’
त्याच्या वाक्यानं मला घामच फुटला. माझ्या घराचा आणि फर्निचरचा मला तत्क्षणी प्रचंड तिटकारा आला. बरं, एवढंच नाही, चक्क व्हिज्युअल दिसू लागलं. भल्या पहाटे उठून आमचं कुटुंब जंगलात निघालं आहे. प्रत्यक्ष जंगलात पोहोचल्यावर माझ्या मुलानं, मी आणि बायकोने एकेक असे तीन झाडं निवडले. मग आम्ही बॅगेतून कु-हाडी उपसून काढल्या. तिघांनी एकमेकांच्या कु-हाडीने परस्परांना चिअर्स केलं, त्याचा खणखणाट झाला. मग मुलगा गडागडाट करत हसला. नंतर मीही तसाच हसलो. मग बायको हसली. तिघांच्या हसण्याचा आवाज जंगलात घुमला, त्याचा काहींसा प्रतिध्वनीही आला. जंगलाला थरकाप सुटला असावा. आम्ही मग दणादण कु-हाडी हाणायला सुरूवात केली. तिघांपैकी कुणाचं झाड आधी धाराशायी होतं यावर आमच्यात स्पर्धा लागली. असेच मग एकावर एक असे झाडं कापत आम्ही आत आत शिरत गेलो. दुपार झाली तसं आम्ही एका प्रशस्त झाडाखाली बसून डबा खाल्ला. नंतर त्याही झाडाला कत्तलून टाकलं. तर संध्याकाळपर्यंत बरंचसं जंगल आम्ही कापून काढलं होतं. घामबिम पुसून, कु-हाडी म्यान करून मग आम्ही घरी निघालो. दुस-या दिवशी लवकर यायचं होतं. घरापासून जंगल फारच लांब होतं, ते अजून जवळ पाहिजे होतं, म्हणजे जाण्यायेण्याचा वेळ वाचला असता आणि त्यावेळात आणखी झाडं तोडता आली असती अशी आमच्यात मग येता येता चर्चा झाली.
.......
माणसानं झाडांच्या बेसुमार कत्तली केल्या, जंगलं नष्ट केली हे मान्येय. प्रत्येकात आता जागरुकता आलीये त्यालाही आपला सलामै; पण असं थेट ‘तुमच्यामुळंच असं झालंय’ असं दमात घेवून कुणी बोललं की, दचकायला होतं राव. अंगातून अपराधगंड धो धो वाहू लागतो. ‘आपण’ किंवा ‘तुम्ही आम्ही’ वगैरे शब्द आहेत ना आपल्या भाषेत. मग त्या एकूण ‘आपण’ला धरा ना या गुन्हेगारात. तुम्ही माणसांमध्येच येत असाल तर ‘आपण’मध्येही बसताच की. एकट्यादुकट्याला नका घाबरवून सोडू हो!

टिप्पण्या